Friday, March 02, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तिसरा)

ज्ञानेश्वरी मधील सौंदर्य स्थळें (भाग तिसरा)
अर्जुन विषादाची थोडी झलक आपण मागील भागांत पाहिली. श्री ज्ञानदेव आता अर्जुनाच्या मूलत: अतिशुध्द आणि पवित्र विचारसरणीचे चित्रण प्रभावीपणे करतात. अर्जुन म्हणतो की हे आमचे गोत्रज, गुरू इत्यादिक युध्दासाठी सज्ज होत्साते आले असले तरी माझ्या मन बुध्दीला यांना मारावे असे पटत नाही. “सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्व शरीरें मे रोमहर्शष्व जायते ।।”
“देखें देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विफळता उपजत, गात्रांसीही” ! अर्जुन त्या कल्पनेनेच इतका व्याकुळ झालाय् की त्याला त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य पेलता येईना, घामेजल्य् हातातून ते केव्हा निसटून खाली पडले ते त्यालाही कळले नाही ! वास्तविक वज्राहून कठोर नि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले अर्जुनाचे हृदय करुणेने कसे व्यथित झाले पहा. ज्या अर्जुनाने प्रत्यक्ष शंकराचा युध्दांत पराभव केला आणि निवात-कवच या राक्षसांचा समूळ नायनाट केला तो मोहाने ग्रासला आहे.
इथें एक फार सुंदर उपमा देतात ज्ञानदेव. भुंगा अतिशय कठीण लाकूड सहजगत्या पोखरून काढतो. मात्र तो जेव्हा कमल-कलिकेत मधाच्या नादात अडकून पडतो तेव्हा त्याला ते मऊ मुलायम कमलदल काही प्राण गेला तरी भेदतां येत नाही ! हा मोह म्हणजे प्रत्यक्ष आदिपुरूषाची ‘माया’ होय, जी ब्रह्मदेवाच्यानेही आवरत नाही. अशाप्रकारें तो मोहग्रस्त अर्जुन युध्दापासून परावृत्त झाला. त्याला भलत्याच वेळीं सहृदयता आठवली नि तो कृष्णाला म्हणाला की आपण इथून निघून जाऊंया !
आपल्या या बदललेल्या मानसिकतेचे तो समर्थन करूं लागला. या कौरवबंधूंना जर मारायचे तर युधिष्ठिराला कां नको ? म्हणून आग लागो या लढाईला ! एवढे पाप करायची काय गरज, मला हे मान्य नाही. मला विजय बिजय काही नको. अखेर यांना मारून मिळवलेले राज्यपद व्यर्थ होय. मला तसे राज्य स्वप्नातही नको !
शिवाय पलीकडे भीष्म द्रोण वगैरे आहेत, ज्यांचे उपकार मी कधीच फेडूं शकत नाही. हे सगेसोयरे पण असे आहेत की त्यांना मारण्याची भाषासुध्दा महाभयंकर आहे. शिवाय असे पातक घडलेच तर कृष्णा, तुझे तोंड पाहण्याचे धाडस कुठून आणीन मी ! माझ्या पूर्वपुण्याने तूं मला लाभला आहेस, तो तूही दूर निघून जाशील. वनांत आग लागताच कोकीळ वगैरे सर्व पक्षी प्राणी तेथून पळ काढतात किंवा चिखलाने भरलेल्या पाण्याकडे चकोर ढुंकूनही पहात नाहीत. अगदीं तसाच, माझ्या पुण्यसाठ्याचा ओलावा  संपताच तू मला सोडून निघून जाशील.

म्हणूनच मी हातीं शस्त्र धरणार नाही, हे युध्द करणार नाही.

हे कौरव केवळ गर्वामुळे लढायला आले आहेत. पण म्हणून आपल्याला आपले हित पहायला नको काय ? कुणी जाणूनबुजून काळकूटासारखे विषप्राशन करेल का ; किंवा चालताना अचानक सिंह सामोरा आला तर त्याला चुकवणे श्रेयस्कर नाही का ? देवा, मला सांगा, हातातला पेटता दिवा विझवून अंधारात उडी घ्यावी का ? किंवा धडधडत्या अग्नीपासून दूर पळणेच योग्य नाही काय ?

अर्जुन इथेच थांबत नाही. युध्दामुळे ओढवणाऱ्या सर्व पातकांचा तो पाढा वाचतो. लाकडावर लाकूड घासून प्रज्वलित होणारा अग्नी जसा दोन्ही लाकडांना भस्म करतो, तसे आपसांत भांडून दोन्ही कुळांचा नाश अटळ असतो. अशावेळी कुलवंशाचा लोप होऊन कुळात अधर्म फोफावतो. पेटता दिवा विझवून अंधारात अडखळत राहावे तसा कुलक्षय होताच कुळाचार संपतो नि यमनियमांना डावलून इंद्रियें मोकाट सुटतात आणि स्त्रियांमधे व्यभिचार बोकाळतो. उत्तम अधमांचा संकर होऊन जातीधर्म नष्ट होतो नि चव्हाट्यावर ठेवलेल्या अन्नाप्रमाणे कावळे ताव मारतात. यामुळे नरक प्राप्तीशिवाय पर्याय राहात नाही. वंशवेलच अशी पापी झाल्यावर स्वर्गस्थ पूर्वजही पतित होतात. जिथे नित्य-नैमित्तिक कर्मेच घडत नाहीत तिथे पितरांना तिलोदक देणेसुध्दां दुरापास्त ठरते नि मग त्यांना पुन्हा मृत्यूलोकातील त्याच पतित कुळात जन्म घ्यावा लागतो. अगदी नखाग्राला जरी विषबाधा झाली तरी ते विष सर्व शरीर व्यापते ; तसेच पापाचरणामुळे अवघें कुळ विनाशाकडे वाटचाल करते. जसा अग्नी सर्व काही भस्मसात करतो त्याप्रमाणे या पापांची झळ संगतींत येणाऱ्या प्रत्येकाला लागते.

आणि म्हणून यांचेशी युध्द न करता त्यांचे बाण झेलत मरण आले तरी बेहतर. असे बोलत असतांना त्याला गंहिवर आवरेना आणि त्याने रथातून खालीं उडी घेतली. पदच्युत झालेल्या राजकुमाराप्रमाणे, किंवा राहूने ग्रासलेल्या सूर्याप्रमाणे तो निस्तेज झाला.
अशा त्या निराश नि उद्विग्न झालेल्या रडणाऱ्या अर्जुनाला वैकुंठनायक भगवान् श्रीकृष्ण कशाप्रकारें परमार्थ सांगतील ते सविस्तर पणे पुढच्या अध्यायात सांगू तें लक्षपूर्वक ऐका असे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात.
(क्रमश:……..

जय साईराम
पुणे २ मार्च २०१८


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?