Wednesday, November 17, 2021

 

वर्त्कृत्व नि श्रोतृत्व !

 “वत्कृत्व आणि श्रोतृत्व “ ! 

‘आज काय नवीन चऱ्हाट वाचायला लावतोय हा बाबा’ असा विचार तुमचे मनांत येणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र आज मी तुम्हाला दाद द्यायला लावीन ‘हे प्रतिज्ञोत्तर माझे / उघड ऐका ‘ ! 
आधी वरील दोन्ही शब्दांचा भाबडा म्हणजे सोप्पा अर्थ विशद करूं - ‘बोलणे नि ऐकणे’. ( तुम्हाला माहीत नसेल म्हणून आवर्जून सांगितला ! ) असो. 

शाळा कालेजांत असल्या पासून अक्षरश: शेकडो वक्त्यांची काही अप्रतिम वत्कृत्व शैली माझे मनांत घर करून आहे. काहींचे तेच एक अवतार कार्य असावे अशी माझी पक्की धारणा आहे. खूप खूप उत्तम व्याख्याने ऐकली, तितकेच उत्तम परिसंवाद ऐकता आले, मत-मतांतरें असली तरी ते बहुधा अतिशय रोचक, खिळवून ठेवणारे आणि एखाद्या विषयावर चहूं बाजूंनी प्रकाशझोत टाकणारे असत. (त्यामुळेंच माझी प्रज्ञा अधिक प्रतिभावान् झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही ! ) तें असो. 

(हल्ली टीव्ही वर दररोज चालणारे वादंग नि शिवीगाळ पाहतांना खूप खूप वेदना होतात मला. एके काळी ‘प्रतिभा नि प्रतिमा’ सारखे उत्कृष्ट कार्यक्रम नैवेद्यापुरतेही वाढले जात नाहीत आतांशा आणि त्याचे सतत वैषम्य वाटत राहते. अनिलांची एकोणीसशे पन्नास साली लिहिलेली ‘सारेच दीप कसे मंदावले आतां ‘ ही कविता अजूनही किती समर्पक ठरते आहे पहा. ) असू देत, आज काहीही नकारात्मक लिहायचे नाही असे पक्के ठरवून आहे मी. 

तर मला असं म्हणायचंय की ‘वक्ता नि श्रोता’ या दोघांनाही समसमान मान नि स्थान दिले आहे प्रत्येक संताने. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, अविभाज्य आहेत, एकाशिवाय दुसऱ्याला काहीही किंमत नसलेले. आता हेच पहा ना, तुम्ही येथवर माझे सोबत आहांत या खात्रीनेच नाही का मी हे चऱ्हाट वळत ? जाऊ द्या झालं . 

असे म्हणतात की सृष्टी निर्माण केल्यावर परमेश्वराने सर्वात शेवटी माणूस घडवला आणि आपली बुध्दी त्याचे मस्तकांत फिट करून टाकली. मात्र हे करण्यापूर्वीं तो अगदीच एकटा होता, न कुणाशी बोलणें ना कोणाचे काही ऐकणे ! खरेतर याच कासाविसी पोटीं त्याने हा विश्वाचा डोलारा उभा केला. (चाणाक्ष मंडळींचे ध्यानात ‘डोलारा’ शब्द वाचून नक्कीच दाद द्यावीशी वाटली असणार त्यांना ! ) असो. 

तर मी असे म्हणत होतो की बोलणारा नि ऐकणारा या दोहोंत एक जरी नसला तरी जगराहाटी विस्कळीत होईल, नव्हे ठप्प होईल. तथापि, मला जरा अधिक खोलांत घेऊन जायचंय तुम्हाला. असे पहा की आपण येथवर दोन व्यक्तींबद्दलची चर्चा करत होतो. मात्र खरंच दोघांची नेहमीच गरज असते काय ? माझे मतें बोलणाऱ्या पेक्षा ऐकणारा जास्त महत्वाचा, कारण कित्येक वेळा न बोललेले देखील सहज ऐकू येते (पहा - ‘शब्दांच्या पलिकडले ‘ ! ) 
निसर्ग तर आपल्याला सतत खुणावत असतो, बोलवत असतो - न बोलतांही ! आपणच पाहून न पाहिल्या सारखे करतो, ऐकून न ऐकल्यासारखे ! ग्रंथ मंडळी तर आपली चातका सारखी वाट पाहात असतात त्यांतले शब्दभांडार, नव्हे शब्दज्ञान आपल्या कर्णसंपुष्टांत ओतण्यासाठी, केवळ आपली नजर नि अवधान त्यांचेकडे वळावी म्हणून ! प्रत्येक ग्रंथातला प्रत्येक संत सतत बजावित असतो - अवधारिजो जी,   सुनो भाई साधो, ऐका हो ऐका, लिसन् केअरफुली, आधी ऐकून तर घ्या - वगैरे. 
कुणी तरी म्हटलेय् , ‘श्रोतेविण वक्ता नव्हे, वक्त्याविण श्रोता नव्हे ‘ . पहा तुम्हाला कितपत पटतंय् ते. मात्र एखादा खरा दार्शनिक म्हणतो - ‘अंतरात्मा की आवाज सुनो ! ‘ पण त्यासाठी आपला स्वत:चा आवाज ‘म्यूट’ करता यायला हवा ना ! खरेतर आपण मोठ्यांदा जितके बोलतो त्यापेक्षा मनांतल्या मनांत कितीतरी अधिक पटींनी ! त्याच्यावर जितके नियंत्रण आणू तितका अंतर्मनाचा आवाज ‘ऐकतां’ येईल. 

खूप वर्षांपूर्वी ‘साधनेचा अंतर्मुख प्रवास ‘ हे सुंदर पुस्तक वाचले होते. त्यांतला एक शब्द खूप काही सांगून गेला होता नि तो होता ‘मौन’ ! अंतर्बाह्य मौन. (तर मग वक्ता नि श्रोता दोघेही मौन, ‘म्यूट’ ! (मग इतकं सगळं लिहिलेलं व्यर्थ म्हाणायचे की ! ) 

अगदी खरं सांगू ? मला वक्तृत्वावर नि श्रोतृत्वावर खूप काही बोलायचे होतं. कित्येक उत्तमोत्तम वक्त्यांना याद करत त्यांच्या विशिष्ट शैलीचे खुमासदार वर्णन करायचं होतं. मी ऐकलेले अनेक ‘किस्से’ नि प्रसंग त्यांचे शैलींत सांगायचे होते - मात्र आम्ही ठरलो मुखदुर्बळ ! त्यातून सक्तीचे मौनव्रत घेतलेले ‘मौनीबाबा’ ! कुणास ठाऊक पुढे कधी जमेल की नाही. तरीपण माझी खात्री आहे की मी अद्याप न बोललेले तुम्हांस कधीच कळले आहे ! ! 

रहाळकर 
१८ नोव्हेंबर २०२१



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?