Saturday, November 20, 2021

 

श्री ४२० !

 श्री ४२०

हा चारशे विसावा ब्लॉग आहे माझा, आणि म्हणून हा मथळा दिला या वटवटीला ! दोन हजार सहा सालीं अचानक एका स्नेह्याने हे दालन उघडून दिले माझ्यासाठी नि पहिला प्रयोग इंग्रजीत केल्याने तो क्षणार्धांतव्हायरल्झाला जगभर आणि अर्ध्या तासांत हवाना होनोलुलू पासून टिम्बक्टू नि आर्जेंटिना सकट कित्येक देशांतून प्रतिसाद यायला सुरूवात झाली. अगदी खरें सांगायचे तर मी चांगलाच गोंधळून गेलो, बुचकळ्यांत पडलो. नंतर कालांतराने कळले की सर्वच ब्लॉग्ज वाचायचे किंवा त्यांना प्रतिसाद देणे बंधनकारक नाही असे ! ! 

आजचा हा सगळा मजकूर पाहताही तुम्हाला दुर्लक्ष करायला भाग पाडेल म्हणूनच नांव दिले आहेश्री चारसौ बीस ‘ ! 

तसे पाहिले तर या आकड्याचे नि माझे जन्मत: सख्य आहे. आयुष्यांत खूप बंडलबाजी केलीय मी - चारसौ बीसी ! अर्थात त्यांत कुणाला फसविण्याचा कधीच इरादा नव्हता, जरी कायद्यातले हे कलम फसवणुकीचे संदर्भात रूढ असले तरी

बंडलबाजी बहुतेक वेळा वेळ मारून नेण्यासाठी असते तर फसवणुकीमागे एक निश्चित धोरण नि स्वार्थ असतो. (या विधानावर दुमत असणे शक्य आहे. कदाचित् यांवरील कोणी अधिकारी बराच प्रकाश टाकू शकेल, बरीचशी वायफळ चर्चासुध्गा करण्याचा हुंकार भरेल ! ) असो.


खरेतर इतक्या फालतू विषयावर हे लिखाण केवळ माझ्या चारशे-विसाव्या ब्लागला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आहे. (एका कवितेची पंक्ती सहज मनीं आली - “हा असत् पणा ही सत्याधिष्ठित् , म्हणून त्याचे मोल प्रतिष्ठित् “ ! व्वा, क्या बात है ! ! 

मी जेमतेम दहा वर्षाचा असताना राजकपूरचा श्री ४२० हा चित्रपट पाहिला होता. लवकरच तो भारतातच नव्हे तर विशेषकरून रशियांत खूप धुमाकूळ घालणारा ठरला. त्यांतली गाणी तर विलक्षण पाप्युलर झाली. एकोणीसशे पन्नास ते साठचे दरम्यान असंख्य शिणेमे पाहिले, मात्र श्री चार सौ बीस ने चांगलीच पकड घेतली होती. चार्ली चॅप्लिन चे अनेक मूकपट देखील पाहिले नि त्यांतील कारूण्य कुठेतरी खोलवर दडून बसले होते. (माणसाची अगतिकता, मग तो कितीही बलाढ्य का असेना, अधोरेखित करण्याची हातोटी चार्ली चॅप्लिन ला विलक्षण साधली होती. तसाच काहीसा प्रकार शेक्सपियरच्या लेखणीतून अवतरत असे. त्याच्या सर्वट्रॅजेडीजअफाट दाद नि कौतुक मिळवून गेल्या. ) 

बरेच विषयांतर होत जाणार हे ओघाने आलेच, कारण मथळ्याला पुरेसे खाद्य तर पुरवले पाहिजेच ना

अजून एक गुपित सांगून हा फापटपसारा आवरतो. मी अजून पर्यंत श्री ४२० हा चित्रपट पाहिलाच नाही कारण त्यावेळेस मला कावीळ झाली असावी नि आता  दृष्टिदोष ! ! 

(आहे ना चारसौ बीसी ! ! ! )


रहाळकर 

२० नोव्हेंबर २०२१


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?