Monday, November 08, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकशे सहा, सात व आठ

 


१०६).        “ओम् आत्मयोनि : स्वयंजातो वैखान:    सामगायन :       ।
                 देवकीनन्दन : स्त्रष्टा क्षितीश : पापनाशन :         ॥१०६॥” 

श्री महाविष्णु ला ‘अयोनिज:’ म्हणजेच गर्भवास न सोसतां प्रकट झालेले आपण आधी पाहिले आहे. खरोखर, प्रत्यक्ष परब्रह्म त्याचे स्वरूपात स्वयंभूरित्या प्रकटले आहे. 

पुराण कथेनुसार, वराह अवतारांत हिरण्याक्ष नामक दैत्याला शोधून मारण्यासाठी त्याने पृथ्वी खणून काढली होती असे वर्णन येते. म्हणून ‘वैखान: ‘ ! 

या ईश्वराला (देखील) संगीत फार प्रिय असल्याने तो त्या सूरतालांत निमग्न असावा म्हणून त्याला उपाधी देऊन टाकली ‘सामगायन :’ ! ! (खरे पाहतां ओंकार ध्वनीलाच साम असे म्हणतात, कारण विश्वोत्पत्तीचे वेळी अवकाशात हा भुंग्याप्रमाणे गुणगुणणारा ओंकार अंतराळात दुमदुमत असावा ) असो. 

असे म्हणतात की साधकाची आपल्या उपासनेत जसजशी प्रगती होते तसे अनेक प्रकारचे संकेत त्याला जाणवू लागतात, त्यांत ‘अनाहत नाद’ सामील आहे. (मात्र सदगुरू या संकेतांकडे दुर्लक्ष करून आपली साधना जोमाने सुरू ठेवण्याचा उपदेश करतात ! ) 
‘स्त्रष्टा’ म्हणजे सृजन करणारा, नवी सृष्टी रचणारा आहे, तर ‘क्षितीश:’ म्हणजे पृथ्वीचा स्वामी - (क्षिती म्हणजे पृथ्वी) ! 

‘पापनाशन :’ = पापांचा नाश करणारा ! (पाप नि पुण्य हे दोन्ही शब्द खरे तर हायपोथेटिकल आहेत. एखादे पाप दुसऱ्या संदर्भात पुण्य ठरू शकते किंवा पुण्य पापांत ! मला कशाचेही समर्थन करायचे नाही, मात्र एवढे खरे की जे दुसऱ्याला त्रास देते, पीडा देते ते पाप नि  जे  सुख, शांती, समाधान मिळवून देते तें पुण्य ! ) पुन्हा विषयांतर. असो. 

१०७).        “ओम् शंखभृन्नदकी चक्री शार्गंधन्वा  गदाधर :       ।
                  रथांगपाणिर् अक्षोभ्य : सर्वप्रहरणायुध :  —- ओम् नम : इति ॥१०७॥” 

विश्वातील सर्व प्राणिमात्रांचा अहंकार रूपी ‘पांचजन्य’ नामक शंख धारण करणारा श्रीमहाविष्णु ‘शंखभृत्’ होय. 
विद्येचे प्रतीक असलेली नन्दकी नामक तलवार याचे हातीं आहे.
‘मना’चे निदर्शक असे सुदर्शन  चक्र एका करंगळीवर फिरते आहे, जे संसारचक्राचेही द्योतक आहे . असा हा ‘चक्री’ आहे. ! 
इंद्रियजन्य अहंकाराचे प्रतीक असे शांड्र्ग नावाचे धनुष्य आणि बुध्दितत्व दर्शवणारी ‘कौमुदकी’ नामक गदा हातांत, असा हा ‘शार्गंधन्वा गदाधर :’ आहे ! 

अशा प्रकारें मन, बुद्धी, अहंकार, विद्या आणि पंचमहाभूतें यांची प्रतीकात्मक आयुधें तसेच विश्वरूप निदर्शक पद्म यांनी विभूषित असा हा श्री महाविष्णु होय ! हातात फिरणारे सुदर्शन चक्र गति दर्शक म्हणून हा ‘रथांगपाणी आहे ! 
‘अक्षोभ्य’ म्हणजे कधीही क्षुब्ध न होणारा हे आपण जाणतो, तर अन्याय आणि असत्य यांवर मात करण्यासाठी शस्त्रें धारण करणारा हा ‘सर्वप्रहरणायुध:’ आहे. 

१०८).         “ओम् नमोSस्तवनन्ताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादायक्षिशिरोरूबाहवे  ।
                    सहस्त्रनाम्ने पुरूषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नम :       ॥१०८॥” 

महाभारतातील वर्णनाप्रमाणे शरपंजरी पहुडलेला आणि अंतकाळासाठी उत्तरायणाची वाट पाहणाऱ्या भीष्मपितामहांनी हे स्तोत्र श्रीकृष्णावर दृष्टी ठेवत युद्धभूमिवर सांगितले, त्याची फलश्रुती सांगितली नि श्रीकृष्णाशी एकरूप झाले. 

त्यावेळीं अर्जुनाने श्रीकृष्णाला विनवले की हे स्तोत्र बरेच मोठे असल्याने या स्तोत्राचे सार असा एक श्लोक सांगावा. तेव्हा भगवंताने वरील श्लोक भक्तिपूर्वक गाइला जावा असे उत्तर दिले !  
त्या वरील श्लोकाचा भावार्थ असा —— ‘सहस्त्र रूपें धारण करणाऱ्या, सहस्त्र पाय, सहस्त्र नेत्र, सहस्त्र शिरें नि सहस्त्र बाहू असलेल्या अनंताला नमस्कार असो ! सहस्त्रकोटी युगें धारण करणाऱ्या, सहस्त्रनामाने संबोधलेल्या शाश्वत पुरूषाला नमस्कार असो ! ! 
॥ओम् नम : इति ॥ 
ओम् श्री साईराम ! 
प्रेषक - डॉ. प्र. शं. रहाळकर 
पुणे
लेखन सीमा दि. ८ नोव्हेंबर २०२१ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?