Sunday, November 07, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक अठ्ठ्याणौ नव्व्याणौ शंभर !

 

९८).        “ओम् अक्रूर : पेशलो दक्षो दक्षिण : क्षमिणावर :         ।
              विद्वत्तमो वीतभय : पुण्यश्रवणकीर्तन :                 ॥९८॥” 

अक्रूर : म्हणजे दयावंत, क्रूर नसलेला. श्रीरामाप्रमाणे शत्रूचेही हित पाहणारा. ‘पेशलो’ म्हणजे सर्वांगसुंदर - मन, वाणी, कर्म आणि शरीराने देखील ! सर्वांना हवाहवासा वाटणारा. 
सर्वच कार्यात अतिशय सावध असणारा तो ‘दक्षो’ आहे, अत्यंत कुशल. विश्वकल्याणासाठी वायूप्रमाणे सर्वत्र संचार करणारा, त्वरित निर्णय घेणारा नि भक्तांना शांती समाधान प्रदायक असा ‘दक्षिण :’ आहे हा. , तर पृथ्वीपेक्षाही क्षमाशील असा ‘क्षमिणांवर :’ देखील आहे. 
बुध्दिमत्तेंत तो सर्वश्रेष्ठ असून कोणत्याही प्रकारचे भय त्याला माहीत नाही ! त्याचे गुणसंकीर्तन, लीलासंकीर्तन करून नि श्रवण करत असताना त्याचा निकट सहवास घडतो आणि मन:शांतीचा अनुभव घेता येतो. 

९९).       “ओम् उत्तारणो दुष्कृतीहा पुण्यो दु:खपनाशन :        ।
             वीरहा  रक्षण : सन्तो जीवन : पर्यवस्थित :        ॥९९॥” 

महाघोर संसारातल्या त्रिविध तापांपासून पोळलेल्या जीवांना तारणहार असा हा ‘उत्तारणो’ होय. साधकाच्या नकळत घडलेल्या दुष्कृत्यांचा बींमोड करणारा हा ‘दुष्कृतिहा’ असून त्यांच्या सत्कर्मांना पुण्यदान करणारा तो ‘पुण्यो’ ही आहे ! 
त्याचे निरंतर स्मरणाने दु:स्वप्नांचा नाश होतो. (देहाला ‘मी’ असे मानून मिथ्या संसारात गुरफटून राहणे हे ते ‘दु:स्वप्न’ ! ! ) 
‘ हा वीर पुरूष रक्षण तर करतोच पण संतांच्या रूपात जीवांचा उध्दार घडवून आणतो. तो संपूर्ण चराचर व्यापून असल्याने त्याला ‘पर्यवास्थित :’  म्हटले आहे. 


१००).         “ओम् अनन्तरूपो अनन्तश्रीर् जितमन्युर्भयापह:          ।
                  चतुरस्तो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिश :     ॥१००॥” 

चराचरातील सर्व जड नि चेतन व्यापून असणारा भगवंत ‘अनंतरूपो’ असून त्याची ‘श्री’ अर्थात ‘पराशक्ती’ सुध्दा अमर्याद आहे, असीम आहे, असा हा ‘अनन्तश्री’ होय ! त्याने क्रोध नि भय यांना जिंकलेले असल्याने ‘जितमन्युर्भयापह :’ असे म्हटले आहे. 
चारही दिशांकडे लक्ष ठेऊन असणारा तो ‘चतुरस्त्रो दक्ष’ असतो, तर प्रत्येक कृती अत्यंत गंभीरपणे करणारा तो ‘गंभीरात्मा’ आहे. 
‘विदिशो’ म्हणजे चारही दिशांच्या पलीकडेही नियंत्रण असणारा, ‘दिशा’ देणारा मार्गदर्शक असा हा ‘दिश :’ आहे ! 

क्रमश : 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?