Sunday, November 07, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक शाहांण्यौ व सत्त्यांणौ

 ९६).        “ओम् सनातसनातनतम : कपिल : कपिरव्यह :       । 

              स्वस्तिद : स्वस्तिकृत् स्वस्ति : स्वस्तिभुक् स्वस्तिदक्षिण :   ॥९६॥” 

‘सनात्’ हा चिरकालदर्शक शब्द आहे. अनंतकाळ अस्तित्व असणारा शाश्वतब्रह्म असा श्रीमहाविष्णु आहे ! जुन्यातला जुना, ब्रह्मा विष्णु महेश यांचाही निर्माता असा सनात् सनातन पुराणपुरूष ! तो अग्निरूपही असल्याने पिंगट वर्णाचा म्हणजे ‘कपिल’ आहे. 
जल शोषून घेणाऱ्या सूर्यालाही ‘कपि’ म्हणतात आणि अनेक सूर्यमालिकांना तेजप्रकाश देणारा श्रीमहाविष्णु ‘महाकपि:’ आहे. 
प्रलयकालीं सर्व काही नष्ट झाले तरी ‘अव्यय’ राहणारा हा ‘कपिलरव्य:’ आहे ! 
‘स्वस्ति’ म्हणजे शुभ, मंगल, पवित्र. स्वत: तर स्वस्ति :   आणि ‘स्वस्तिकृत्’ तर           आहेच, पण सर्व मंगल करणारा, स्वीकारणारा तो ‘स्वस्तिभुक्’ देखील आहे.  अशा त्या मंगलमय प्रभूचे केवळ मन:पूर्वक स्मरण केल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात असा हा ‘स्वस्तिदक्षिण :’ आहे ! 

९७).      “ओम् अरौद्र : कुण्डली चक्री विक्रम्यूर्जित शासन :           ।
              शब्दातिग: शब्दसह : शिशिर : शर्वरीकर :            ॥९७॥” 

प्रशांतिस्वरू श्रीमहाविष्णु हा पूर्णकाम, सदा संतुष्ट असा रागद्वेष-रहित परमात्मा असल्याने तो ‘अरौद्र :’ होय. 
वलयाकार तेज:पुंज  सूर्यमंडळरूपी कुंडलें धारण करणारा हा ‘कुण्डली’ आहे, तर सुदर्शन-चक्रधारी चक्री आहे ! (संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मर्जीनुसार फिरवणारा चक्री ! ) 
शौर्य, पराक्रम नि पुरूषार्थात विलक्षण असा ‘विक्रमी’ आहे. खरोखर आपल्या विलक्षण ऊर्जेद्वारें विश्वव्यापार चालवणारा तो ‘उर्जितशासन:’ आहे  हे नि:संशय ! 

त्याचे वर्णन करायला कितीही शब्द वापरले तरी ते अपुरे पडतात कारण तो मुळांत शब्दांनी व्यक्त करताच येत नाही, असा ‘शब्दातिग:’ आहे तो ! मात्र असे असले तरी भक्तांच्या आर्त प्रेमळ हांकेला तो प्रतिसाद देतोच देतो, म्हणून ‘शब्दसह:’ म्हटले आहे. 
विश्वातील कोणतीही ‘भाषा’ त्याला सहज कळते, कारण तो तर प्रत्येकाच्या अंतर्यामीं वसत असतो ! (वास्तविक भावना समजायला  दरवेळीं शब्दांची कुठे गरज असते ? )
‘शिशिर’ किंवा शिशिर ऋतू मुळांतच शांतवन करणारा. त्यातूनही त्रितापांनी पोळलेल्या जीवांचे विश्रांतिस्थान दुसरे कुठले असणार ? 
‘शर्वरी’ म्हणजे रात्र किंवा आपण अज्ञान म्हणूया. ज्ञानी पुरूषा साठी प्रपंच ही रात्र नि प्रापंचिकांना परमार्थाला दिवस करणारा हा मिस्किल भगवंत ‘शर्वरीकर:’ आहे ! क्रमश: 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?