Thursday, November 19, 2026
गुरूवतीचा ठावो !
गुरूवतीचा ठावो…….!
मंडळी मघाशीच मी ‘गुरूवतीचा ठावो’ हे शब्द लिहून गेलो खरा मात्र त्या शब्दांचा संदर्भ शोधल्याशिवाय ‘चैन पडेना आम्हाला’, सबब पुन्हा स्मरणशक्तीला अजिबात ताण न देतां ती ओंवी झरझर नजरेपुढे आलीच !
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज ‘महाभारत’ या ग्रंथाची थोरवी गाताना म्हणतात, ‘म्हणोनि हा काव्यांरावो / ग्रंथ गुरूवतीचा ठावो / एथुनी रसां झाला आवो / रसाळपणाचा //‘ - म्हणून हा ग्रंथ सर्व काव्व्यांचा सम्राट आहे, महत्व आणि थोरवीचे आश्रयस्थान असून येथूनच सर्व नवरसांच्या रसाळपणाला डौल प्राप्त झाला आहे.
श्रीज्ञानदेव जसे आपल्या सदगुरूंबद्दल बोलताना त्यांची स्तुती करत सर्व शब्दभांडार खुले करतात तसेच महाभारत या महान ग्रंथाबद्दस देखील विस्ताराने सांगतात. आपण सर्वच रामायण-महाभारत इत्यादि ग्रंथांविषयी बालपणापासून ऐकत वाचत आले आहोत मात्र त्यांचे सखोल चिंतन करावेसे अनेकांना जमत नाही, मला तर ते कधीच जमले नाही. तथापि असे काही शब्द उद्युक्त करीत राहतात हेही नसे थोडके !
रहाळकर
१९ नोव्हेंबर २०२६.