Sunday, May 19, 2024

 

ताकाचं भांडं !

 ताकाचं भांडं

आमच्या पीढीच्या आधी नि आमच्या पीढीपर्यंत निम्न-मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील स्त्रिया सधन घरांत ताक मागायला जात असत. सधन घरातली स्वामिनीदेखील ते मुबलक प्रमाणात वाटून टाकत असे. आज हे अचानक आठवण्याचे कारण म्हणजे जुन्या काळीं बहुतेक सर्वजण कसे काटकसरीने जीवन जगत यावर विचार करीत होतो आणि त्यांची जीवनशैली आठवत असतानाताकाचं भांडेमनात ठाण मांडून बसले. त्याकाळी नि कदाचित आजही शेजारणी कडून वाटीभर साखर किंवा अर्धा कप दूध मागायला कमीपणा वाटत नसे, लाज तर नक्कीच नाही. मात्र आजचे नवश्रीमंत या प्रकारांकडे कुत्सितपणे पाहातील कदाचित . पूर्वींमधुकरीमागणारी गरीब बामणांची पोरं ऐन बाराचे सुमारास हातांत झोळी नि लंगोटी परिधान केलेली बऱ्याच वेळी दृष्टीस पडत. खरंतर श्रीमंत ब्राह्मणांच्या मुलांना देखील मौंजीबंधनानंतर काही दिवस भिक्षा किंवा मधुकरी मागणे आवश्यक असेमात्र त्यांत त्यांना कमीपणा वाटत नसे वडिलांनी किंवा गुरूजींनी त्याचे महत्व समजावून सांगितले असेल तर.      त्यांतील काही उच्च शिक्षण घेऊन पुढे खूप नावालौकिकास आलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहेत


मी मेडिकलला असताना माझा एक सहाध्यायी खोली भाड्याने घेऊन आमच्या दुसऱ्या मजल्यावर राहात असे. एक दिवस सकाळीच बरे वाटत नाही म्हणून वर्ग सोडून घरी आला. त्यावेळी माझी आई दही घुसळत बसली होती. जिना चढताचढतां त्याने आईला विचारले की मला ग्लासभर ताक पाठवाल काय. आईने लगोलग देवराम करवी ताकाचा ग्लास पाठवून दिला. मात्र ही आठवण त्याने कर्नल म्हणून रिटायर झाल्यावर अतिशय कृतज्ञतापूर्वक मला सांगितली होती


खरोखर, ‘गरीबीहा एक फार मोठा शाप आपला समाज पिढ्यांनपिढ्या सहन करत आला आहे. तथापि मिळेल त्यांत समाधान मानण्या व्यतिरिक्त त्यांना पर्यायही नसे. आणि केवळ समाधानाच नव्हे तर त्यासाठी ती मंडळी हाडाची काडें करीत, पैशाचा सहसा योग्य तो वापर करीत, खूप खूप काटकसरीने राहात. मला माहीत आहे की त्या काळीं सर्वसामान्य माणूस सचोटीने वागत असे, कायदा पाळत आपले कर्तव्यात सहसा चुकारपण करत नसे आणि त्याच बरोबर कळत कळत मानवी मूल्यांची जोपासना करीत असे

वरील सर्व विधानें वरवरची नाहीत, त्यांतील अनेकांचा मी साक्षी आहे. मी सर्वसाधारणपणे असे मुद्दाम म्हटले कारण त्यालाही अपवाद असणे साहाजिक आहे.


गतकालीन दिवस आठवताना या सर्वांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटला मला आज !

रहाळकर

१९ मे २०२४     


Saturday, May 18, 2024

 

काव्य, शास्त्र, विनोदेन……..!

 काव्य शास्त्र विनोदेन……..! 


अखिल विश्वातली प्रत्येक संस्कृतीकाव्य शास्त्र विनोद, साहित्य संगीत नृत्य, क्रीडा कला नाट्य आणि मुख्यत्वेंमाणुसकीवर अवलंबून नि आधारित असते हे कुणी विद्या-वाचस्पतीने सांगायची गरज नसते. वास्तविक प्राचीन असो वा अर्वाचीन, वर उल्लेख केलेले सर्व किंवा निदान बहुतांश पैलू त्या त्या संस्कृतीचा कणा नि मानबिन्दु असतात. आपण अभिमानाने म्हणतो की भारतीय सनातन संस्कृती या सर्व पैलूंनी परिपूर्ण आहे, इतकी की भारतातील प्रत्येक व्यक्ती त्यांचेशी निगडित आहे, बांघील आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे खरे असले तरी मुळांत हे सर्व पैलू प्रकृतीचा, अर्थात सरस्वती शारदेचे अविष्कार असल्याने प्रत्येकाच्या प्रकृतिनुरूप ते पैलू कमीअधिक प्रमाणात प्रस्फुटित होत असतात. ( लई भारी भारी शब्द वापरले गेलेत मंडळी, पण त्यांतील आशय समजून घ्यावा अर्थ पल्ले पडो पडो  ! ) 


मला असं म्हणायचंय् की प्रत्येकांतच ते कमीअधिक प्रमाणांत विराजमान असतात. अधिक असले की तशी मंडळी समाजात उठून दिसतात, आदर नि सन्मान मिळवतात. मात्र सर्वच पैलूंत करंटे असल्यास त्यांची कींव करावीशी वाटते. इतके कसे अरसिक असतात असे काही लोक. निदान कुठे तरी कधी तरी जराशी का असेनादादका बरे जात नाही यांचेकडून


आम्ही एकदा अभिनेत्री रेखाचानिकाहहा सिनेमा पाहायला गेलो होतो. मागच्या सीटवर माझे तत्कालीन बॉस सहकुटुंब बसले होते. अगदी क्लायमॅक्स गाठत चित्रपट संपला आणि दिवे लागले. मी मागे वळून बॉसकडे पाहिले अन् मला आश्चर्याचा धक्काच बसला. साहेब चक्क गाढ झोपी गेले होते. ‘कसा वाटला सिनेमाहे शब्द मी कसेबसे गिळून टाकले

शास्त्रीय संगीताच्या एखाद्या मैफिलींत कोणी शाहाणा ऐन तराण्याचे वेळी घोरताना ऐकला तर कसे वाटेल

माझ्या आईने जांवई पहिल्यांदाच जेवायला येणार म्हणून खूप मेहनतीने ग्वाल्हेरचा शाही पुलाव केला होता खूपसे काजू बदाम बेदाणे नि खव्याचे गोळे वगैरे टाकून. पण जांवईबापू बोलण्यात इतके रंगले होते की आईने राहवूनकसा वाटला पुलावअसे विचारताचहो हो, मस्त झालीय खिचडीअसे म्हणत सर्व मेहनतीवर बोळा फिरवला होता

खरंतर आपणही असे प्रसंग अधूनमधून अनुभवत असतो आणि तेव्हा असं वाटतं की आपण उगीचच इतरांकडून अपेक्षा करत असतो. ‘गाढवापुढे वाचली गीतासारखा प्रकार होतो तो ! खरंतर आपण सहज केलेला विनोद समोरच्याला कळलाच नाही तर तो समजावून सांगण्याची नामुष्की वैऱ्यावरही येऊ नये ! ! 


काव्य-शास्त्र-विनोदआणि इतरही पैलू जाणकार, समझदार, तोलामोलाच्या व्यक्तींबरोबरचसाझाकरावे हेच भले. काही बाबी विशेष कॅटेगरी साठी राखून ठेवाव्या या माझ्या मताशी तुम्ही कितपत सहमत आहात ? (बहुतेक मंजळीअसहमतम्हणतील या आशेने तूर्त थांबतो. )

रहाळकर

१८ मे २०२४.  


This page is powered by Blogger. Isn't yours?