Tuesday, November 03, 2026

 

कुछ और भावभीने पल !

 कुछ और भावभीने पल ! 

आज बहुत दिसांनी किंबहुना महिन्यांनी प्रिय ताईशी वार्तालाप घडला दूरध्वनीवरून. तिच्या नि माझ्या कित्येक आठवणी समसमान आहेत म्हणून साहाजिकच एकाच वेळी आम्हाला ते प्रसंग हुबेहूब आठवतात. मला खरंच खूप बरं वाटलं की तिचीही याददाश्त अजून खूप छान आहे. 

सहज विषय निघाला आमच्या नाकाच्या जडणघडणी वरून. आणि साहाजिकच आई आणि सुधीच्या नाकांची तुलना झाली ! त्या दोघींची अगदी चाफेकळी नसली तरी बऱ्यापैकीं सुबक होती नि आहेत. मात्र त्यावर मी ताईला सुचवलं की मी कसा माझ्या समोसा नाकावर रहाळकरी नाक म्हणत गर्व करतो, तसा तिने अतिशय तलम नि गोड लता मंगेशकरांसारखा छान गळा मिळवला आहे. अगदी सुमन कल्याणपुरकरां सारखाच. तिने त्यावर फारशी मेहनत घेतली नाही हे खरे असले तरी त्याने नाकाचे वैगुण्य सहज झाकले गेले. माझ्या दोन्ही बहिणींना अतिशय बुद्धिमान, सुसंकृत आणि सधन पती आणि कुटुंब मिळाले आणि दोघींनीही आपापले संसार यशस्वी केले. 

मी सांगत होतो कुछ भावभीनी पलकों के बारे मे ! खरंच मी वेळोवेळी वर्णन केलेले गत-वैभव आम्ही प्रत्यक्ष पाहू-अनुभवूं शकलो. आजोबांचा स्नेह, आई-अण्नांनी न बोलता केलेली अपार माया नि कौतुक आता अघिक प्रकर्षाने आठवू लागले आहे. 

खूप खूप आधी आम्ही सेगांवला राहात असताना ताई एकटीच इंदोरला आजोबा आणि मोठीकाकू बरोबर शाळेच्या निमित्त काही महिने राहिली होती. एकदा तिनेच आईअण्णांची खूप खंत काढल्याने बाबांनी तिला ड्रायव्हर बाबूलालसोबत सेगांवला बसने पाठवले. बसचा थांबा आणि आमचा बंगला जेमतेम दीड फर्लांग. मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात पायांत बूट चप्पल न घालताच ती घराकडे धावत सुटली आणि आईने दार उघडेपर्यंत तिच्या पायांना भाजल्यामुळे खूप फोड आलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. साहाजिकच अण्णा तिला खूप रागावले होते असे अनवाणी उन्हात पळत आल्याबद्दल. मात्र तिची मनस्थिती आम्हाला तेव्हाही कळली होती. कधी एकदा आईअण्णांना भेटते असं झाले होते तिला ! 


अमेरिकेतील तिचे वास्तव्य आणि वैभव आम्हालाही मिळावे म्हणून तिने जंगजंग प्रयत्न केले. निव्वळ आईअण्णा नि भावंडांच्या ओढीने ती किमान साठसत्तर वेळा भारतात येत राहिली. तिलाही साहित्यांत विलक्षण रूची आणि जाण देखील. कॅलिफोर्निया भागातून तेव्हा नियमित प्रसिद्ध होणाऱ्या ‘एकता’ या मराठी नियतकालकाचे अनेक वर्षें तिने संपादकत्व यशस्वीपणे सांभाळले. तिच्या नि माझ्या आवडीनिवडी खूपशा सारख्या. तिला क्लासिकल बरोबरच हिंदी मराठी गीतें, विशेषत: दर्दभरे, खूप आवडत. तिचा आवडता गायक होता तलत महमूद. 

खूप खूप दिवसांनी आज ताईशी गप्पा मारल्यावर मला गप्प बसणे शक्यच नव्हते, सबब हे छोट्टेसे निवेदन ! त्यातून आज तिचा अठ्ठ्यांशियावा वाढदिवस ! मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे ताई !

प्रभु रहाळकर

३ नोव्हेंबर २०२६.   


This page is powered by Blogger. Isn't yours?