Sunday, October 04, 2026

 

घारींच्या घिरट्या !

घारीच्या घिरट्या ! 

खूप वर्षांपासून घारीच्या (Eagles) आकाशांत उंच उंच भराऱ्या आणि घिरट्यांचे मला कायम कुतूहल राहिले आहे. कॉलेजात असताना ‘Where Eagles Dare’. हा इंग्रजी बोलपट पाहिला होता. नंतर कित्येक वर्षांनी श्रीशने ‘Jonathan Livingstone Seagle’ हे रिचर्ड बाक् चे छोटेसे पुस्तक भेट म्हणून दिल्यावर ते अनेकदां वाचून काढल्यावर त्यातील आशय नीट समजूं शकलो मी. 


हल्लीं आमच्या गॅलरीच्या कितीतरी खालून कित्येक घारींना दररोज उडताना पाहून मनात विचार तरळून गेला की वास्तविक घारींचा नित्याचा मार्ग तर उंच आकाशांत असतो, मग त्या इतक्या थोड्या उंचीवर का उडत असाव्यात. आणि अचानक ट्यूबलाईट पेटली. अहो, पूर्वी घरें ठेंगणी असत नि वृक्षराजी उंच उंच. साहजिकच सर्व पक्ष्यांचे विश्रांतिस्थान ते मोठाले वृक्षच नव्हेत काय ! आतां घरें वीसतीसचाळीस मजल्यांची झालींत. बिचारे वृक्ष तेवढी उंची कशी गाठणार आणि म्हणून गॅलरीच्या खालून घारी उडाल्या तर नवल वाटायला नको ! असो. 


मंडळी, या घारींच्या उंच उंच घिरट्यांना जरा जवळून पाहावेसे वाटले. खरेतर मी त्यांच्या अगदी जवळून त्यांना उंच भरारी घेतांना प्रत्यहीं पाहात असतो, जणू मी त्यांचेबरोबरच आकाशांत त्यांच्या अगदी शेजारून उडत असावा. नावाप्रमाणेच अतिशय तीक्ष्ण भेदक आणि खरेखुरे घारे डोळे डोळ्यांच्या खोबणींत विशिष्ट हालचाली करीत सतत जमीनीवरचे भक्ष्य शोघीत उडत असतात नि सावज टिपतांच खोल भरारी घेत ते उचलून पुन्हा आकाशांत भरारी घेतात. विलक्षण वाटते असे दृष्य पाहताना. 


घारींपेक्षा मोठे पक्षी म्हणजे गिधाडं. मात्र ती कधीच कुणाला आवडणार नाहीत त्यांच्या स्वभावांमुळ्. तथापि त्या जमातींतला एकच अपवाद होऊन गेला नि तो म्हणजे जटायू ! तो मात्र सर्वांनाच वंदनीय वाटतो खरा. सिन्नर-संगमनेर रस्त्यावर जटायूचे समाघीमंदिर पाहण्याचा दोनदा योग आला. तिथे सीतामाईंच्या चरणांचेही दर्शन घडते. अतिशय नयनरम्य परिसर आहे तो, पुष्करिणी आणि गौमुखीतून सतत वाहणारे शुद्ध पवित्र पाणी. अहाहा !


खूप वर्षांपूर्वी डेव्हन नजीकच्या कॅरॅव्हॅन पार्क मध्ये दोन दिवस राहिले होतो अगदी सागरकिनारीं. हजारों घारींसारखेच दिसणारे सीगल् पक्षी खूप जवळून पाहिले होते आम्ही . मात्र त्यांचा सततचा कर्कश चिलचिलाट कानठळ्या बसवणारा. तेही आकाशातून अचानक सूर मारतात सागराकडे आणि सहसा मासा पकडून पुन्हा आकाशात भरारी घेतात. थोडा वेळ करमणूक होते ती दृष्यें पाहताना मात्र कंटाळाही येतो लगेचच. काय, कंटाळलात की नाही अजून ?

रहाळकर

४ ऑक्टोबर २०२६.  


This page is powered by Blogger. Isn't yours?