Tuesday, June 02, 2026

 

भक्तांची माऊली विठाई !

 भक्तांची माउली विठाई


पांडुरंग विठ्ठल हे लक्षावधी मराठी, तेलुगु आणि कानडी भाविकांचे श्रद्धास्थान ! चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूर येथे स्थापित महाविष्णूचे रूप या पांडुरंगाला मानले जाते आणि समर्पित भावनेने वारकऱ्यांचे अनेक समूह अनेक प्रकारची व्रतें नि उपोषणें सांभाळीत दूरवरचे अंतर कापून या तीर्थस्थानीं पायीं चालत येतात

विठ्ठल हे दीन-दुबळ्यांचे, गरीबांचे, निराश निराश्रितांचे आशास्थान नि श्रद्धास्थान. ‘तोप्रार्थनेला प्रतिसाद देतोच देतो, मग ती व्यक्ती कोणीही अथवा कितीही अपारंपरिक का   असेना - कुंभार, विणकर, सोनार, शेतकरी किंवा भिक्षेकरी - आपल्यापर्यंत भक्तांनी पोहोचावे म्हणून त्यांच्या मार्गांत येणारे सर्व ऐहिक अडथळे किंवा घरगुती वा प्रापंचिक समस्यांचे निराकरण करतो आणि एखाद्याची तीव्र उत्कंठा शिगेला पोहोचली असेल तर हा पांडुरंग विठ्ठल भक्त असेल तिथे प्रत्यक्ष उभा ठाकून दर्शन आणि आपल्या अस्तित्वाची रोकडी अनुभूती देत असतो ! वारकऱ्यांनी किंवा भक्तांनी सोसलेले सर्व कष्ट त्या प्रेममूर्ती अशा विठ्ठलाला पाहताच त्या क्षणीं विरून जातात आणि आतून उफाळून येणारा सौख्य आणि आनंदाचा महापूर त्यांना रोखता येत नाही


कसा आहे हो हा पांडुरंग विठ्ठल ? बाह्यता काळाकभिन्न, ओबडधोबड वाटणारी ही विठ्ठलमूर्ती भक्तांना साजिरी, सुंदर, सुकोमल नि निव्वळ सांवळी का वाटावी ? कारण ती आहे भक्तांची माउली विठाई ! माऊली म्हटले की तें रूपडे मनोहरच असणार ना ! यावर थोडेसे विवेचन नंतर करीन म्हणतो, आधी या पांडुरंगाचे काही गुणविशेष पाहूया

याला कवीनेकानडा' म्हटले, कानडा म्हणजे अगम्य- ज्याचा थांगपत्ता प्रत्यक्ष वेदांनाही कळलाच नाही. आणि हा पंढरीचा राजा कसा आहे तर म्हणायला निर्गुण निराकार पण प्रत्यक्षात उभा आहे विटेवर, कर कटावर ठेवून चक्क अठ्ठावीस युगें


मुकाट्याने उभा असूनही तो चैतन्याचा पुतळा आहे, भक्तांसाठी परब्रह्मस्वरूप आहे

हा नामयाची खीर चाखतो, चोखोबाची गुरें राखतो, पुरंदराचा हा परमात्मा नि दामाजीचा वाली बनतो


किती किती वर्णू याचें रूप, मात्र माझ्या आजोबांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आम्हाला सांगितलेला स्पष्ट आठवतोय्. त्यांच्या उतारवयांत ते एकटेच पंढरपुरीं गेले. विठोबाचे निवान्त  दर्शन घेऊन समोरच्या सभामंडपात बसले आणि जी समाधी अवस्था लाभली ती जवळजवळ तीनचार तास. दरम्यान छातीवरील वस्त्रें आनंदाश्रूंनी चिंब भिजलेली. त्या सुंदर दर्शनाने विलक्षण पुलकित झाले होते ते

खरंतर आपल्यातील प्रत्येकाला असे अनुभव येणे अशक्य नाही. कमालीची भावोत्कटता अंगीं बाणवतां यायला हवी. असा प्रेमभाव केवळ मातेजवळ, माऊलीजवळच असतो ना


मला जरासे तात्विक विवेचन करण्याचा मोह आवरत नाही. अमृतानुभवांत माऊली शिवशक्तीचे एकपण सांगत आहेत आणि इथे आपल्याला पांडुरंग विठ्ठलांत भक्तांची माउलीविठाईदिसते आहे ! एऱ्हवीं विठ्ठलालाकानडा हो विठ्ठलु करनाटकुम्हटले तरी आपण विठ्ठलालामाउली विठाईअसे  म्हणतोच ना


मंडळी, माऊली म्हटले कीमाहेरआठवतेच ना ? नि मग आठवतो एकनाथ महाराजांचा अभंग - ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरीं ’ ! त्यांत आई-बाप, बंधू, बहीण नि सद्गुरूंचाही उल्लेख आहे. म्हणजे पंढरी हे माहेर नि माऊली विठाई माझी आई ! ! 


बोला पंढरीनाथ भगवान की जय ! जय जय रामकृष्ण हरी ! ! ओम् रामकृष्ण हरी ! ! ! 

रहाळकर 

जून २०२६.     


This page is powered by Blogger. Isn't yours?