Friday, November 27, 2026

 

साधनेचा सोपान !

 साधनेचा सोपान !

पांवसच्या स्वामी स्वरूपानंदांनी अनेक ग्रंथ लिहिले, पद्यें रचली आहेत. अनेक वर्षांनी त्यांचे एक पद पुन्हा नजरेखालून घातले आणि वाटले त्यातील गर्भितार्थ गद्य स्वरूपात मांडून पाहावा, सबब हे प्रयोजन ! 


स्वामींनी ‘साधनाष्टक’ या शीर्षकाखाली साधकांसाठी एक उत्कृष्ठ पद रचले ज्याला आपण साधनेचा सोपान या नावाने ओळखूं शकतो. ते सांगतात, ‘साधकाने आपल्या साधनेत पूर्ण विश्वासाने सतत रमायला हवे, कितीही संकटांत सापडले तरी आपला कृतनिश्चय कदापि सोडूं नये. ‘मीच तो आत्मा’ अर्थात सोsहं स्मरण वारंवार करत राहावे आणि आपले निजांतर म्हणजे स्व-रूपाला सतत भेटत राहावे. 

दुसऱ्या कडव्यांत म्हणतात, आपल्या अंतरंगांत जी विविध स्फुरणें निर्माण होतात त्यांचे मूळ शोधून पाहावे, मात्र हे करत असतांना आपण केवळ साक्षी आहोत, त्यांपासून अतिशय अलिप्त राहून ते घडले पाहिजे. 

तिसऱ्यात सांगतात की आपल्या सर्व इंद्रियांसमवेत मन बुद्धी नि अहंकार आपल्या अंतर्यामी प्रतिष्ठित आत्मारामाला समर्पून आपले आपण निवांतपण भोगीत राहावें ! 

चवथ्यांत म्हणाले, अहो चालतां बोलतां हिंडतां फिरतां, लिहितां वाचतां खातां जेवितां अथवा नाना सुख दु:खें भोगत असतां आपली ‘निजात्म-सत्ता’ अर्थात मीच आहे तें परब्रह्म यांची सतत जाणीव असूं द्यावी, त्याचे भान असूं द्यावें ! 


आता पुढे बजावतात की अशा प्रकारें ‘सोsहं भजनांत’ तल्लीन  होत ज्ञाता ज्ञेय अर्थात जाणणारा नि जाणण्याजोगा या दोहोंनाही एकवट केल्यास आत्मसुखाचा प्रत्यय हमखास येणारच, जे वास्तविक अतींन्द्रिय म्हणजे इंद्रियांनी भोगण्याच्या पलीकडचे असे स्वाभाविक सुख होय.

सहाव्या कडव्यांत म्हणतात की नाद-श्रवण अर्थात अनाकलनीय नादांचे श्रवण किंवा विविध प्रकारच्या प्रकाश-किरणांचे दर्शन घडत असताना त्या ठिकाणी श्रोता कोण नि पाहणारा कोण तर तो मीच आत्माराम हे ओळखून त्याचेच अनुसंधान कायम असूं द्यावे ! 


अशा प्रकारें स्व-रूपानुसंधान राखल्यावर तीच भक्ती आणि तेच ज्ञान या स्वानुभवामुळे सर्व कर्म-बंधने गळून पडतील आणि परमोच्च समाधान लाभेल. 

(मूळ पंक्ती अशा आहेत - 

“साधनाष्टक” 

‘साधनीं असावे तत्पर / संकटीं न संडावा घीर / सोsहं-स्मरणें वारंवार / निजांतर चोखाळावे //१//

‘नाना वृत्तींचे स्फुरण / अंतरीं होतसे कोठून / साक्षित्वें शोधावें आपुले आपण / अति अलिप्तपण ठेवोनियां //२// 

‘सर्वेन्द्रियांसहवर्तमान / मन बुद्धी आणि अहंपण / आत्मारामीं समर्पून / निज-निवांतपण उपभोगावें //३// 

‘चालता बोलतां हिंडता फिरतां / लिहिता वाचितां खातां जेवितां / नाना सुख दु:ख-भोग भोगितां / निजात्मसत्ता  अनुभवावी //४// 

‘होतां सोsहं-भजनीं तन्मय / एकवटोनि ज्ञाता ज्ञेय / येई आत्मसुखाचा प्रत्यय / अतींद्रिय स्वभावें जे //५//

‘नाद-श्रवण प्रकाश-दर्शन / तेथें श्रोता द्रष्टा कोण / तो आत्माचि मी हे ओळखून / तदनुसंधान राखावें //६//

‘सदा स्व-रूपानुसंधान / हेंचि भक्ति हेंचि ज्ञान / तेणें तुटोनि कर्म-बंधन / परम-समाधान प्राप्त होय //७// 

‘क्लेष-रहित संतोषी जीवन / प्रयाण-कालीं सोsहं स्मरण / घडो आवडी परमार्थ चिंतन / आशीर्वचन तुम्हासि हें //८//“ ) 


रहाळकर

२७ नोव्हेंबर २०२६ 

(मु. पो. तळेगांव) 



‘क्लेष-रहित संतोषी जीवन / प्रयाणकालीं सोsहं स्मरण / घडो आवडी परमार्थ चिंतन / आशीर्वचन  तुम्हासि हें //‘

(स्वामी स्वरूपानंद).   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?