Thursday, November 26, 2026

 

बहिर्मुख नि अंतर्मुख !

 बहिर्मुख नि अंतर्मुख ! 

काल परवां वेरूळ नजीकच्या टाका परिसरात स्थायिक झालेल्या टाकास्वामी या मूळच्या तेलगु सत्पुराषाचे दर्शन आणि सत्संगाचा छान योग जुळून आला. त्याचे असे झाले की बऱ्याच वर्षांनंतर खामगावीं सद्गुरू आगाशेकाकांच्या समाधीला  प्रत्यक्ष वंदन करण्याचे ठरले आणि सुरुवातीलाच संभाजीनगर जवळील टाकास्वामींचे दर्शन घडले. या वारीचे सर्व नियोजन आणि कार्यान्वयन लेकीने केले आणि आमचा इतका दीर्घ प्रवास निर्विघ्न आणि विलक्षण आरामांत झाला.  छत्रपती संभाजीनगरला धाकट्या बंधूंबरोबर रात्री मुक्काम केला आणि गतजीवनातील कित्येक आठवणींना उजाळा मिळाला. खामगावीं पोहोचताच सायंकालीन करुणात्रिपदीचे दैनंदिन पठणांत सहभागी होतां आले. दुसरे दिवशीं भल्या पहांटे समाधीवर षोडशोपचारें अभिषेक घडला नि मनसोक्त दर्शनाचा अनुभव घेत काल संध्याकाळी लेकीकडे मुक्कामास येऊन पोहोचलो. 

आता हे प्रवासवर्णन आटोपते घेऊन प.पू.टाकास्वामींकडे काय सत्संग झाला यावर थोडक्यात……….! 


आपण त्यांचे दर्शनार्थ गेल्यावर प्रारंभीचे नमस्कार वगैरे झाल्यावर स्वामीजी आपण होऊन हजर व्यक्तींचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्या अनुषंगाने सहज बोलके होतात. सहसा हिंदीतून बोलत असताना मायमराठीतल्या दासबोध ज्ञानेश्वरी आणि नाथ-भागवतातील  कितीतरी दाखले सहज बोलून जातात. परवांच्या वार्तालापांत त्यांनी बहिर्मुख नि अंतर्मुखता यांवर अप्रतिम मार्गदर्शन केले जे अगदी पाच वर्षीय बालकाला आणि पंच्यांशीतल्या बुजुर्गाला देखील सहज समजून घेता आले ! 

आपल्यातील प्रत्येकाची दृष्टी कायम बाहेर काय चालले आहे तिकडे भरकटत असते, फार क्वचित् तिला आपल्या आत वळवून अंतर्मनांत काय चाललेंय् इकडे पाहण्याची गरज किंवा इच्छासुद्धा नसते. स्वामीजींनी यावरच अदमासे दीड तास प्रबोधन केले. बाहेरच्या जगातील प्रत्येक घडामोड जाणून घ्यायला आपण सर्व तत्पर असतो किंवा अनेक प्रकारच्या चिंतांनी व्याकूळ, जिथे आपण काहीच करू शकत नसतो. स्वामीजींनुसार दर थोड्या वेळाने अंम्मळ थांबून आपल्या अंतर्मनात काय चाललेय् याचा शोध घ्यावा, किंचित थांबून सर्व चिंता बाजूला साराव्या आणि आपला स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. निदान झोपण्यापूर्वी काही काळ स्वस्थ राहून आपल्यातच रमावे. शांत झोप लागणे हीच खरी समाधिस्थिती होय- ‘निद्रा समाधि स्थिती:’! !. तिथे सर्व इंद्रियें गुडीगुप असल्याने त्यांची लुडबुड नसते. शांत झोप झाल्यावर जसे ताजेतवाने प्रसन्न वाटते अगदी तसेच थोडा वेळ शांत बसून आपले आपण निरीक्षण केले तर तोच अनुभव प्रत्येकाला येऊ शकेल. 

त्यांचे हे वाक्य की अम्मळ थांबून जरा अंतर्मनांत दृष्टी वळवा मला फार भावलें. कदाचित तुम्हालाही ते आवडेल म्हणा ! 

रहाळकर

२६ नोव्हेंबर २०२६.   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?