Sunday, November 08, 2026
हॅट्स ऑफ !
हॅट्स ऑफ !
आज कुणाचं कशावरून तरी कौतुक करताना उषा सहज म्हणून गेली - ‘हॅट्स ऑफ टु यू’ आणि आधी कित्येक वेळा ऐकलेल्या त्या शब्दांत मी चक्क गुरफटून गेलो. वास्तविक तिने कधीच डोक्यावर हॅट ठेवलेली निदान मला तरी आठवत नाही. नो, बहुतेक समुद्र किनाऱ्यावरच्या काही सहलींत तिने घातली असेलही पण आजच्या त्या उद्गाराचे नवल वाटत राहिले खरे.
मुळात हॅट हा प्रकार इंग्रजांनी इकडे रूजवला आणि माझ्या आधीच्या पिढ्यांनी तो शिरसावंद्य केला. आमच्या इंदोरला सिखमोहल्याच्या अगदी कोपऱ्यावर ‘दयाल भांडार शू स्टोर’ होते जिथे पादत्राणांबरोबरच विविध प्रकारच्या हॅट्स मिळत. माझे वडील खाकी कापडाने वेढलेली एक भली मोठी वेताची हॅट वापरीत, पूर्वी शिकारी मंडळी वापरीत तशी. अर्थात त्यांच्या संग्रहांत फेल्टहॅट्स सुद्धा असत मात्र त्यांनी कधी कॅप वापरलेली आठवत नाही. हॅट्स ठेवायला सुरेख हॅट-स्टॅंड्स असत. मी सुद्धा फेल्टहॅट्स बऱ्याच वापरल्या पण माझे आवडते शिरस्त्राण होती ‘बेरी कॅप जी सहसा आर्मीतले सोजीर वापरीत. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळेत टोपी अनिवार्य असे नि सगळ्या टोप्या टोपीवाले केळकरांच्या विकानातून खरेदी होत. असो.
आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षांपासून इंग्लंड वाऱ्या करत आहोत पण हल्लीचे इंग्रजसुद्धा हॅटचा वापर क्वचित् करताना दिसतात.
पूर्वी राजकपूरची सतत हॅट उतरवीत अभिवादन करायची खोड आणि भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या राणीला अभिवादन करताना आधी हॅट काढून हस्तांदोलन , आणि नंतर नंतर केवळ हॅटला हात लावायचा शिरस्ता पाळत असे मात्र आता ते सर्व कालबाह्य झाले आहे.
अर्थात वेस्ट इंडीज किंवा श्रीलंकेच्या काही खेळाडूंना कॅपकडे हात नेतांना मी टिपले आहे.
खरंतर ‘हॅट्स ऑफ टु यू’ असे म्हणत भरभरून कौतुक करायचा हा छान पायंडा आहे, त्याने कसे मनापासून कौतुक केल्याचे समाधान मिळते नाही !
रहाळकर
८ नोव्हेंबर २०२६.