Saturday, September 26, 2026

 

आडक्याला तीन !

 आडक्याला तीन ! 

हे शब्द आहेत श्रीसमर्थांच्या दासबोधातले. गुरूलक्षणें वर्णन करताना गुरूच्या महत्तेबद्दल सांगतासांगतां गुरूसुद्धा कसा पारखून घ्यायला हवा ते आपल्या मिश्किल शैलीत सांगतात श्रीसमर्थ ! कदाचित् तेव्हाही भोंदू गुरूंचे पेंव फुटले असावे आणि म्हणूनच असे भोंदू गुरू आडक्याला तीन अर्थात दमडीमोलाने किंवा जवळजवळ फुकट मिळत असले तरी त्यांना चक्क डावलावे, असा श्रीसमर्थांचा रोख आहे ! 


आजच्या जमान्यांत आपण दररोज नवनवीन उपचारांचा सुळसुळाट होत असलेला प्रत्यहीं अनुभव घेत असतो ‘सोशल मीडिया’ पोस्टांवरून. त्याचप्रमाणे व्यापारी मंडळी ‘बाय वन्, गेट वन् फ्री’ अशी आमिषें दाखवत असतात ते वेगळेच. शिवाय ‘सेल’, ‘मेगासेल’ या मथळ्याखाली खुली लूट सुरू असते तेही वेगळेच ! असो. 


‘आडक्याला तीन’ या शब्दांवर जरा अधिक गंभीरपणे बोलावेसे वाटतेंय आज. श्रीमत् शंकराचार्यांनी आपल्या एका श्लोकात माणसाला कशी तिहेरी लॉटरी लागते ते सांगताना मनुष्यत्वं, मुमुक्षत्वं आणि महापुरूष-संश्रय: अशी तीन लक्षणें विशद केली. त्याचप्रमाणे गुरू कसा असावा आणि कसा नसावा याचे विवेचन समर्थांनी अतिशय परखडपणे केलेले आढळेल. मला वाटतं आपल्या सर्वांना हे सत्य जाणून जागरूक राहणे आवश्यक आहे. 


श्रीसमर्थांची मुळात ओंवी अशी आहे- ‘शिष्यास न लावती साधन / न करविती इंद्रियेदमन / ऐसे गुरू आडक्याचे तीन / मिळाले तरी त्यजावे //२१- दशक पाचवा, समास दुसरा’ 


मात्र त्याआधी गुरू आणि सद्गुरू यांतील फरक स्पष्ट करतात. काही गुरू निरनिराळ्या करामती, चमत्कार करतात, काही विविध रसायनें किंवा वनस्पतींचा वापर औषधें म्हणून सांगतात, काही सभांमधून लोकांवर आपल्या पांडित्याची भुरळ घालतात, काही हातचलाखीने इतर गौण धातूंना सोन्यांत परावर्तित करतात, तसेच साहित्य संगीत रागज्ञान गीत नृत्य तान मान किंवा अनेक वाद्यें शिकवतात तेही ‘गुरू’ म्हटले जातात. काही मंडळी मंत्र तंत्र ताईत गंडेदोरे यांचा वापर शिकवतात तर काही पोट भरण्यासाठीची विद्या शिकवतात किंवा जातीजातीतील व्यवहार शिकवतात त्यांनाही गुरू म्हणतात, मात्र ते सद्गुरू नव्हेत !

वास्तविक प्रत्येकाचे मातापिता हेही ततत्वत: गुरू म्हटले जात असले तरी पैलपार नेऊ शकणारा सद्गुरू वेगळाच असतो. गायत्री मंत्राचा उच्चार शिकवणारा कुलगुरू असला तरी ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान करून देणारा एक सद्गुरू असतो ! असा सद्गुरू ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंध:कार दूर सारतो, जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो तो सद्गुरू !

मुळात देव आणि भक्त यांचा वियोग झाला असल्याने द्वैत निर्माण होते. सद्गुरू तो वियोग आणि द्वैतभाव मोडून दोघांचे पुन्हा ऐक्य घडवून आणतो. एक छान दृष्टांत देतात श्रीसमर्थ - भवरूपी वाघाने गाय-वासरावर झडप घालून दोघांची ताटातूट केली तर अतिशय दया उत्पन्न होऊन जो त्या दोघांनाही वाघाच्या जबड्यातून सोडवितो तो सद्गुरू होय ! हा दृष्टांत एवढ्यासाठी अर्थपूर्ण की गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे जीव आणि वाघ म्हणजे अशाश्वत संसार किंवा प्रपंच ! खरंतर जीव हा कायम ईश्वराच्या सान्निध्यांत राहायला हवा, पण माया किंवा अविद्येच्या जाळ्यांत तो स्वत:ला गुरफटून टाकतो. अविद्येच्या तडाख्यातून सोडविणारा एक सद्गुरूंचं असतो !

‘प्राणी मायाजाळीं पडिले / संसारदु:खें दुःख:वले / ऐसें जेणें मुक्त केलें / तो सद्गुरू जाणावा //‘ …….

…..’फोडुनि शब्दाचें अंतर / वस्तु दावी निजसार / तोच गुरू माहेर / अनाथांचे //‘

‘जीव एकदेसी बापुडे / त्यासी ब्रह्मचि करी रोकडे / फेडी संसारसांकडे / वचनमात्रें //‘ 


पुढे काही फालतू गुरूंचाही उल्लेख करतात समर्थ, पण आपल्याला त्यांत अजिबात रस नाही, सबब थांबतो !

(वाटल्यास इच्छुकांनी हा समास दुसरा दशक पाचवे  स्वत: नजरेखालून घालावा ही विनंती ! ) 

रहाळकर

२६ सप्टेंबर २०२६.    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?