Monday, April 09, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सतरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सतरावा)
श्रीकृष्णाने सांगितलेली विवस्वान सूर्याची कथा बहुधा अर्जुनाच्या पचनीं पडली नव्हती, म्हणून प्रारंभीं थोडी स्तुति केल्यानंतर तो परखडपणे प्रश्न करेल.
अर्जुन म्हणतो, ‘देवा, आई आपल्या बाळावर जिवापाड प्रेम करते यांत काही नवल नाही. त्याचप्रमाणे तूं संसारात श्रमलेल्यांसाठी सावली नि अनाथांची माउली आहेस. आमच्यासाठी तर तूं कृपेचा सागर आहेस. एखाद्या पांगळ्या मूकबधिर मुलाकडे त्याच्या आईचे विशेष लक्ष असते नि त्यासाठी ती खूप कष्ट देखील सोसते. तसाच तूंही आपल्या भक्तांसाठी कायम तत्पर असतोस.
मात्र आता मी जें विचारीन ते कृपया लक्षपूर्वक ऐक आणि त्यावर रागावू नकोस. हे अनंता, तू नुकतेच जे विवेचन केलेस ते काही मला फारसें पटलेले नाही. हा जो कुणी विवस्वान होता त्याला आमच्या वाडवडिलांनीही कधीं पाहिलेले ऐकीवात नाही. मग तू त्याला कधीं उपदेश केला ? तो असलाच तर अति पुरातन असावा नि तूं तर सांप्रतचा. म्हणून तुझे बोलणें विसंगत वाटते. खरे तर मला तुझे पूर्वायुष्य फारसे माहीत नाही, म्हणून तूं खोटे बोलतोस असे एकाएकी म्हणणे हेही अयोग्य आहे. तरी पण तूं सूर्याला कधी उपदेश केलास ते जाणून घेण्याची मला उत्कंठा आहे.

श्री भगवान् उवाच –
“बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप     ॥५॥

भगवंत म्हणतात की तुझे नि माझे अनेक जन्म होऊन गेले. त्या सर्वांना मी जाणतो; पण अर्जुना तू मात्र जाणत नाहीस. अरे, जेव्हा विवस्वान सूर्य होता तेव्हा आपण नव्हतो असे जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. आपले अनेक जन्म होऊन गेलेत पण तुला ते आठवत नाहीत.
धनुर्धरा, मी जेवढे अवतार निरनिराळ्या प्रसंगीं धारण केले ते सगळे मला स्पष्टपणे आठवतात. शिवाय, मी अजन्मा असूनही प्रकृतीच्या योगानें पुन:पुन्हा अवतार घेत असतो. मात्र त्यामुळे माझे अविनाशत्व कोणत्याही कारणाने संपत नाही. अवतार धारण करणे किंवा माझ्या स्वस्वरूपांत म्हणजेच निजस्वरूपात परत जाणे असा प्रकार मायेमुळे भासतो. यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर कधीच गदा येत नाही. मी कर्माधीन आहे असे विपरीत बुध्दीच्या भ्रांतीमुळे भासते.
असे पहा, एखाद्या वस्तूचे आरशात प्रतिबिंब दिसले तरी ती वस्तू एकच असते ना ? मी अमूर्त असलों तरी मायेमुळे निरनिराळ्या धर्मकार्यासाठी मूर्तस्वरूपात एखाद्या नटाप्रमाणे नटत असतो.

“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे    ॥८॥”

अशा वेळीं मी स्वच्छेने पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो आणि अज्ञानरूपी अंधाराला नेस्तनाबूत करून टाकतो. अधर्माचे कुंपण मोडून दोषयुक्त ग्रंथांची पानें फाडून टाकतो नि सज्जनांकडून सत्कर्मरूपी गुढ्या उभारतो. दुष्ट दुर्जनांची कुळे नष्ट करतो. साधूसंतांचा हरवलेला सन्मान त्यांना पुन्हा मिळवून देतो. अविवेकाची काजळी पुसून विवेकरूपी दिवा प्रज्वलित करतो, नि त्यामुळें योगी मंडळींना दिवाळी असल्यासारखा निरंतर प्रत्यय येत राहतो.
त्या वेळीं अखिल विश्व आत्मानंदांत निमग्न होते. अधर्माचा नाश झाल्यामुळें एकटा धर्मच जगात नांदत असतो. सगुण भक्तिमुळे भक्तमंडळी अष्टसात्विक भावाने परिपूर्ण होतात. अर्जुना, मी सगुण-साकार रूप धारण करताच पापांचे डोंगर नष्ट होतात नि पुण्यरूपी पहाट होते. अशा महत्त्वाच्या कार्यासाठीच मी प्रत्येक युगांत अवतार घेत असतो आणि ज्याने हें रहस्य जाणले तोच या जगातला विवेकी किंवा शहाणा पुरूष म्हणून ओळखावा.

“माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणे । हे अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा ना कळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥” (मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही कर्म करतो असे माझे अविकार स्वरूप ज्याला समजले तो श्रेष्ठ आणि परम मुक्त म्हणून ओळखावा. असा माणूस प्रपंचात असूनही कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही आणि देहधारी असूनही देहभावांत गुंतत नाही. त्याचा देह जेव्हा पंचमहाभूतांत विलीन होतो तेव्हा तो माझ्याच निरूपाधिक स्वरूपाशीं एकरूप होऊन जातो.)

“वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता:  ॥१०॥”
(ज्यांची विषयासक्ति, भय, क्रोध नाहीसे होऊन जे माझ्या स्वरूपाशीं एकरूप झाले आहेत; ज्यांनी माझा आश्रय केला आहे; जे ज्ञानरूप तपानें शुध्द झाले आहेत असे अनेक मुक्त जीव माझ्या निरूपाधिक रूपाशीं एकरूप झाले आहेत. )
एरव्हीं परापर (मागील-पुढील) न शोचिती (शोक करीत नाहीत) । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया (क्रोधाकडे कधीही फिरकतसुध्दा नाहीत) ।। जे सदा मियांचि आथिले (कायम माझ्यामुळे संपव्न झाले) । माझिया सेवा जियाले (माझ्यावरील भक्तीवर जगले )
। कां आत्मबोधें तोषले (आत्मानंदांत निमग्न झाले) । वीतराग जे ( निर्विकार असलेले) ॥ जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन (घर) ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थासी । तीर्थरूप ॥ ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनी ठेले (राहिले) । जे मज तयां उरलें । पदर नाही ॥ ( जे माझ्या स्वरूपात सहजपणे प्राप्त झाले ते मीच म्हणून राहिले. त्यांच्या नि माझ्यात भेदाचा कुठलाही आडपडदा राहात नाही. )
असे पहा, हिणकस सोन्यातून पितळ नि गंज काढून टाकला तर दुसरे शुध्द सोने शोधण्याची गरज राहते काय ? अगदीं तसेच, जे यमनियमांत निपुण झालेत नि काया-वाचा-मनाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यामुळे जे शुध्द आणि पवित्र झालेत, ते माझ्याशीं एकरूप झाले तर त्यात नवल ते  काय ?
एरव्हीं जे साधक माझी भक्ति करतात त्यांना मी देखील त्यांच्या भक्तीचे फळ म्हणून त्यांचे ईप्सित देतो.
‘देखें मनुष्यजात सकळ । हे स्वभावत: भजनशीळ । जाहले असे केवळ । माझांचि ठायीं ॥
‘परी ज्ञानेंविण नाशिले । जे बुध्दिभेदासि आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥
‘म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया ‘अनाम्या’ नामें ठेविती । देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥
‘जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्त्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिति ॥ !’
आणि मग विविध प्रकारच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळ्या देवी-देवतांची उपचारपूर्वक पूजा करतात. त्यांना त्याचे यथायोग्य फळ मिळते देखील ; पण ते फळ केवळ त्यांनी केलेल्या कर्माचे असते एवढें मात्र तू नीट ध्यानांत ठेव.
म्हणून अर्जुना, या एकंदर व्यवहारांत फल देणारे कर्म आणि ते फळ भोगणाऱ्या कर्त्याशिवाय दुसरे काहीच असत नाही. खरोखर, कर्म असेल तर त्याचे फळ असणारच. परंतु अर्जुना, मी स्वत: या सर्वांचा केवळ साक्षी असतो. समस्त मानव जात आपापल्या कर्माची फळें भोगतात.

एक अतिशय महत्वाचा श्लोक आपण पाहणार आहोत,
“चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
 तस्य कर्तारमपि मां विध्द्यकर्तारमव्ययम ॥१३॥”
(गुण आणि कर्मानुरूप चार वर्णांचे लोक मी निर्माण केले आहेत. व्यवहारिक दृष्टीने मी त्यांचा कर्ता असलों तरी पारमार्थिक दृष्टीने मी अकर्ता आणि अविनाशी आहे, हे तूं नीट समजून घ्यावेस.)

‘जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें (तारतम्याने) । कर्में तदनुसारें । विवंचिलीं (योजिली) ॥ एथ एकचि हे धनुष्यपाणी (अर्जुन) । परी जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं-कडसणी । केली सहजें ॥ म्हणोनी आइकें पार्था । हे वर्णभेद संस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥”

(क्रमश:…..



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?