Tuesday, April 24, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकविसावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकविसावा)
हृदयातील सर्व संशयांचा नायनाट करून युध्दाला पुन्हा उभे राहण्याची सूचना, नव्हे, आज्ञा भगवान् गोपालकृष्णाने अर्जुनाला केली. हे सर्व वृत्त संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे नि तेच आख्यान माऊली आपल्याला अतिशय रसाळपणें सांगत आहेत. तेच व्याख्यान पुढे सांगूया.

‘तंव या पूर्वापार बोलाचा । विचारूनि कुमरू पंडूचा । कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥ ( श्रीकृष्णाच्या मागील नि आत्ताच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कशाप्रकारें हा प्रसंगोचित प्रश्न विचारणार आहे.)
ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां ॥
जयाचिया बरवेपणीं  । कीजे आठां रसांची वोवाळणी । सज्जनाचिये आयणीं (चातुर्य) । विसांवा जगीं ॥
तो शांतुचि अभिनवेल (प्रकटेल) । ते परियसा मऱ्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ती तेणे पाडें । अनुभवावी ॥ (चिमटींत मावेल इतके लहान सूर्यबिंब असले तरी त्याचा प्रकाश त्रैलोक्यांत मावत नाही. तसेच हे शब्द लहान नि मराठी भाषेतले असले तरी त्यांची अर्थव्यापकता अनुभवून पाहावी !)

ना तरी कामितयाचिया इच्छा (कामना करणाऱ्या) । फळें कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥
जेथ साहित्य आणि शांती । हे रेखा (पध्दत) दिसे बोलती । जैसी लावण्यगुण कुळवती । आणि पतिव्रता ॥
आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदीं जोडे (औषध म्हणून मिळाली) । तरी सेवावी ना कां कोडें (आवडीने) । नावानावा (पुन:पुन्हा) ॥

सहजें मलयानिळु मंदु सुगंधु (मलय पर्वतावरून वाहणारा मंद सुगंधित वारा) । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्त्या ॥

तरी स्पर्षें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानांकरवीं । म्हणवी बापु माझा (वाहवा म्हणवेल) ॥

तैसें कथेचें इये ऐकणे । एथ श्रवणासि होय पारणें । आणि संसारदु:ख मूळवणे (समूळ नष्ट होणे) । विकृतीविणें ॥

जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायांच कां बांधावीं कटारें (हत्यारें) ? । रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ! ॥

तैसा मनाचा मारू न करतां । आणि इंद्रियां दु:ख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजीं ॥

म्हणौनि आथलिया आराणुका (एकाग्र होऊन ) । गीतार्थु हा निका (उत्तम) । ज्ञानदेवो म्हणें आइका । निवृत्तिदासु ॥


भगवद्गीतेच्या पांचव्या अध्यायाच्या प्रारंभींच  अर्जुन पुन्हा आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न करतो.
अर्जुन म्हणतो,
“संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मय ब्रूहि सुनिश्चितम् ॥
(हे कृष्णा, एकीकडे कर्माचा जाणीवपूर्वक त्याग कर असे सांगतोस नि त्याचवेळी पुन्हा कर्म करण्याचेच महत्व सांगतोस. या दोन्हीपैकीं माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल तेवढेच मला सांग ! )

‘मग पार्थु म्हणें श्रीकृष्णातें । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंत:करणें । विचारूंये ॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हीच निरोपिला होता बहुवसु (परोपरीने) । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु (आग्रह) । पोखीतसां (लादत आहांत) ॥ ऐसें द्व्यर्थ (दोन अर्थाचें) हे बोलतां । आम्हां नेणतयांच्या (अज्ञानी) चित्त्ता । आपुलिये चाडें (इच्छेप्रमाणे) श्रीअनंता । उमजु नोहे (कळत नाही) ॥ ऐकें एकसारातें (एक तत्व) बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजें तुम्हांप्रति ॥

खरें तर मी तुला आधीच विनवले होते कीं गहन तत्वज्ञान अधिकच कठिण करून सांगू नका. पण ते असू देत. आतां तरी मला सांग की या दोन्ही पर्यायांपैकीं माझ्यासाठी कुठला मार्ग उपयुक्त आहे ते . असे पहा, जो आचरण करायला सोपा, हितकर नि निश्चित फळ देणारा असेल असा मार्ग मला सांगावा. आपली झोपमोड न होतां जास्त अंतर कापू शकणारे  वाहन असले तर केव्हाही चांगलेच ना ?

अर्जुनाचा हा युक्तिवाद ऐकून देव मनातून प्रसन्न झाले नि त्याला म्हणाले, ठीक आहे, तर मग ऐक. खरोखर, ज्याची आई प्रत्यक्ष कामधेनूच असेल तर खेळणे म्हणून ती चंद्रही सहज देऊ शकेल. त्या उपमन्यूसाठी भगवान् श्री शंकराने  प्रसन्न होऊन त्याचा दूधभाताचा हट्ट पुरवण्यासाठी आख्खा क्षीरसागर नाही का दिला ?
अगदी तसेच, औदार्याचे माहेरघर असलेला श्रीहरी आज पराक्रमी अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यामुळे त्याला सर्व सुखें अनायासें काय म्हणून लाभणार नाहीत ? आणि यांत आश्चर्य तें काय, कारण श्रीलक्ष्मीनाथासारखा धनी असतांना भक्ताने आपली इच्छा बोलून दाखवायला नको काय ? म्हणून अर्जुनाने जे मागितले ते प्रसन्न होऊन भगवंताने दिले.
भगवान् म्हणाले की अर्जुना तात्विक दृष्टीने कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्ष प्रदान करतात. त्यातून ज्ञानी नि अज्ञानी अशा सगळ्यांना कर्मयोगाचे आचरण करणे सोपे आहे, जसे बलहीन स्त्रिया किंवा लहान मुलांना पाण्यावरून जातांना नाव हे सोपे साधन असते.
सारासार विचार करून पाहिले तर कर्मयोग सोपा दिसतो आणि त्यामुळे कर्मसंन्यासाचे फळ सुध्दां अनायासे मिळते.
म्हणून आतां तुला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो, ज्यामुळे फलप्राप्तीच्या दृष्टीने दोन्ही मार्ग कसे एकरूप आहेत ते समजेल.

“ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते   ॥

( कोणाचाही द्वेश न करणारा, कोणत्याही विषयाची लालसा धरत नाही, तो नित्यसंन्यासी होय. कारण अर्जुना, रागद्वेश नि द्वंद्वरहित पुरूष अनायासें संसारबंधनांतून मुक्त होतो.)

आपली आवडती वस्तु नष्ट झाली तर जो त्याची खंत बाळगत नाही, कोणत्याही प्रकारच्या विषयभोगाची इच्छा करत नाही आणि मेरूपर्वताप्रमाणें सुस्थिर असतो ; ज्याच्या मनांत ‘मी’ ‘माझे’ अशी भावनाच नाही तो नित्यसंन्यासी असतो हे समजून घे. तो मनानें अहं नि ममतारहित असतो म्हणून त्याचे सर्व वासनांचे, आसक्तिचे बंध तुटून पडतात. त्याला अनायासें सतत सुखप्राप्ति होत राहते. अशा पुरूषाला मुद्दाम घरदार सोडण्याची गरज नसते, कारण ‘अहं-मम’ चा विचार करणारे त्याचे मन स्वभावत:च अनासक्त झालेले असते.

असे पहा, अग्नि विझून गेल्यावर मागे उरलेल्या राखोंडीला कापसांत सहज गुंडाळतां येते. अगदी तसेच, ज्याला विषयभोगांची इच्छाच नाही तो यिषयांच्या सान्निध्यांत असला तरी त्यांत गुंतून पडत नाही.

‘म्हणौनि कल्पना जै सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणें दोनी सांगडें (सारखे) । संन्यासयोगु ॥ (संन्यासमार्गांत प्रथम संकल्प नाहीसा होणे आवश्यक असते, तरच संन्यास घडतो. म्हणून कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलत: समानच आहेत.)

‘एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ?॥ सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती ते भिन्न । एऱ्हवीं दीपाप्रति काई अनान (वेगळाले) । प्रकाशु आहाती ? ॥ पैं सम्यक् येणे अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोहोंतही ऐक्यभावें । मानिती गा ॥

‘आणि सांख्यीं जे पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥ ( कर्मसंन्याशाला जे फळ मिळते, तेच कर्मयोग्याला ज्ञानमार्गाने मिळवतां येते . म्हणून दोघेही सहजच एकरूप आहेत )

असे पहा, जसे आकाश आणि अवकाश यांत भेद नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि कर्मसंन्यास यांत जो ऐक्य पाहतो, किंवा ज्याने संन्यास आणि योग अभिन्न असल्याचे ओळखले तोच खरा ज्ञानी होय. कारण त्याने आत्मस्वरूपाचे फळ जाणले.

‘जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा (शिखर) । वहिला पावे (त्वरित गाठतो) ॥ ( कर्तृत्वाभिमान आणि फलासक्ती टाकून ईश्वरार्पण बुध्दिने केलेले काम म्हणजेच मुक्तिपंथ होय. त्या मार्गाने मोक्षरूपी पर्वत चढून तो ब्रह्मसुखाच्या शिखरावर त्वरेने पोहोचतो.
मात्र निष्काम कर्मयोगाचें आचरण न करतांच जो कर्मच टाकून संन्यासमार्ग चोखाळतो त्याला संन्यासाची प्राप्ती काही केल्या होत नाही.

खराखुरा योगयुक्त नि विशुध्दात्मा म्हणजे काय, त्याची मीमांसा पुढील भागांत पाहूया !
(क्रमश: ……


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?