Tuesday, April 17, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकोणीस)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकोणीस)
या पुढचे दोन श्लोक आपण दररोज भोजनापूर्वीं म्हणत असतोच. मात्र त्यातील भावार्थ ध्यानात ठेवून म्हटले गेले तर ते अधिक चांगला परिणाम देतात ही वस्तुस्थिती अनुभवण्याजोगी आहे.

“ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना ॥२४॥
आणि
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रित: ।
प्राणापान समायुक्त: पचानन्यम् चतुर्विधम् ॥

आत्मज्ञानी पुरूषाला  हे हवन, हा हवन करणारा किंवा हा या क्रियेचा भोक्ता असे भेद त्याच्या अंतर्यामी टिकतच नाहीत. तो जे जे इष्ट यज्ञ करतो त्यांतील हवनद्रव्यें म्हणजे सर्व साहित्य, मंत्र वगैरे केवळ ब्रह्म आहे असे आत्मस्थितींत रमलेला पुरूष जाणून असतो आणि म्हणून कर्म म्हणजेच ब्रह्म असे जाणणारा पुरूष निष्कर्मी असतो अर्जुना ! (‘म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥)’
त्याचे अविवेकरूपी बाल्य संपले,  विवेकरूपी तारूण्य बहरले ,  विरक्ति रूपी वधूशीं लग्न लागले आणि त्याने योगरूप अग्निची उपासना स्वीकारली  असते !

‘जें यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसी । गुरूवाक्य हुताशनीं । हवन केलें ॥’ (त्यांनी हा योगयज्ञ अहोरात्र करून मनाबरोबरच अज्ञानाची आहुती गुरू-उपदेशाच्या मंत्राग्नींत जाळून टाकली.)

‘तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञ म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ (अर्जुना, आत्मसुख प्राप्त करून देणाऱ्या या यज्ञाला दैवयज्ञ असे नांव आहे.)
आतां मी तुला जे सांगणार आहे ते खरोखर विस्मित करणारे आहे. या यज्ञांत ब्रह्मरूप अग्नीची सेवा अग्नीनेच केली जाते, म्हणजेच तो याज्ञिक यज्ञाद्वारें यज्ञ करत असतो !
दुसरे काही याज्ञिक इंद्रियांवर कठोर संयमरूपी अग्निहोत्र धगधगत ठेवतात, म्हणजेच पराकाष्ठेचा इंद्रिय-निग्रह करून त्या पवित्र यज्ञांत विषय-वासना भस्म करून टाकतात. वैराग्यरूपी सूर्याचा उदय होतांच संयमरूपी यज्ञकुंडांत सर्व इंद्रियजन्य अविवेकी वासनांचा लोप होतो नि पांचही इंद्रियरूपी कुंडांतून आशारूपी धूर गायब होतो !
अशा प्रकारें गुरू-आज्ञेनुसार सर्व विषयवासनांच्या कित्येक आहुतींचे यजन केले जाते.
पार्था, यामुळे कित्येकजण आपले  सर्व दोष तर धुतातच पण त्यांचा विवेक खडबडून जागा होतो. विवेकपूर्ण विचाराला शांतीची समर्थ साथ मिळते आणि धैर्य अधिकच बळकट होते. या सर्वाचें पर्यवसान ज्ञानाग्नि प्रकट होण्यात असते.

अशा ज्ञानप्राप्तीच्या साधनेबरोबर योगाभ्यासही चालू असतो, त्यामुळें ऋध्दि-सिध्दिरूपी भ्रमाचा धूर केव्हाच निघून गेलेला असतो आणि मग ज्ञानाग्निची लहानशी ठिणगी निर्माण होते. यम-नियमांच्या चिंतन नि अभ्यासामुळे मन कोरडे ठणठणीत होते आणि हे शुष्क झालेले मन ज्ञानाग्नीला अधिकच प्रज्वलित करते. ब्रह्मलोकापर्यंत पोहोचणाऱ्या त्या ज्वाळांत स्त्री-पुत्रादिकांच्या  आसक्तीसह  नाना विषयवासनांच्या समिधा आहुति म्हणून जाळल्या जातात.

त्या वेळीं आत्मसाक्षात्कार आणि निकोप समाधिसुखात रमणारे ‘दीक्षित’ “सोहं-हंस:-अस्मि”  या प्रत्येक श्वासागणिक चालणाऱ्या अजपा-जपांत रंगून जातात. प्राणकर्मरूप अखेरची आहुती पडतांच त्यांना ब्रह्मसाक्षात्काराचा, समरसतेचा, थोडक्यात एकात्मभावाचा प्रत्यय येतो. तोच ब्रह्मानंद ते पुरोडाश म्हणजे प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

कित्येक साधक अशा प्रकारें यज्ञ करून मुक्त झाले आहेत. या यज्ञक्रिया वेगवेगळ्या दिसत असल्या तरी यांचे साध्य एकच असते. कांहींना द्रव्य-यज्ञ म्हणतात तर काही तपोयज्ञ या नावाने ओळखले जातात. एकाला तर योग-यज्ञ अशी संज्ञा आहे. कित्येक यज्ञांत शब्दांनी शब्दांचे हवन करतात. गुरुने उच्चारलेल्या वेदमंत्राचा शिष्याने पुनरूच्चार करणे, म्हणजेच यथाविधी वेदाध्ययन करणे याला वाग्यज्ञ म्हणतात.
अर्जुना, हे सर्व यज्ञ अवघड आहेत खरे, कारण त्यांचे अनुष्ठान करणे मुळात कठीण असते. तथापि, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला असेल अशांना त्यांच्या अधिकार नि योग्यतेनुसार हे यज्ञ करणे शक्य असते. असे यज्ञकर्ते त्या क्षेत्रांत प्रवीण असून योगसामर्थ्यामुळे ते स्वत:ला परमात्म-स्वरूपात विलीन करू शकतात.
काही योगी अपान-वायूरूपी अग्नींत प्राणवायूचे हवन करतात तर काही योगी अपान-वायूला प्राणवायूंत हवन करतात, तर काही प्राण-अपान या दोन्ही वायूंचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी असे संबोधलें जाते.

कित्येक योगी आसनाच्या हटयोगाद्वारें सर्व प्रकारच्या आहारावर नियंत्रण ठेवीत कुंडलिनीचे प्रयत्नपूर्वक हवन करतात.

असे सर्व यज्ञकर्ते मोक्षमार्गाचे प्रवासी असतात. मनोमळ धुऊन टाकल्यामुळे त्यांचे अज्ञान समूळ नाहीसे होते. अशा वेळीं अग्नि नि हवनकर्ता हे द्वैत संपून केवळ निखळ अद्वैतस्थिती शिल्लक राहते आणि यज्ञकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्याने यज्ञविधिची सांगता होते.
‘ऐसें अनादिसिध्द चोखट (शुध्द) । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहं मंत्रें ॥ (असे हे अनादिसिध्द, शुध्द नि पवित्र ज्ञानमय ब्रह्म ब्रह्मनिष्ठ मंडळी “अहं ब्रह्मास्मि” या मंत्राने सेवन करतात.)
‘ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जहालें । अनायासें ॥ (असे यज्ञांतील ज्ञानरूपी शेष अमृताने ते संतोषले आणि जन्म-मरण विरहीत मोक्षाचे धनी झाले, ते सहजपणे ब्रह्म झाले.)

मात्र ज्यांना आत्मसंयम साधतां येत नाही, योग आणि यज्ञ जमत नाहीत त्यांना विरक्ती कधीच माळ घालत नाही. अर्जुना, ज्यांचें ऐहिकच धड नाही त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलूंया नको !

अर्जुना, अशा प्रकारें मी तुला अनेक यज्ञ प्रकार सांगितले आहेत, ज्यांचा वेदांमध्ये सविस्तर उहापोह झाला आहे. मात्र त्या विस्ताराशी आपला काही संबंध नाही. हे सर्व यज्ञ कायिक, वाचिक नि मानसिक कर्मांपासून होतात, आपल्यापासून नव्हेत. असे यज्ञ फलाच्या अपेक्षेने केले तर बंधनकारक होतात हे तुला समजले तर तू त्या बंधनांत अडकणार नाहीस.

“अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जयां नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ ते द्रव्यादि यागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेज संपत्ती । दिनकरापाशीं ॥ देखें परमात्म सुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥” (अर्जुना, वेद ज्यांचा आधार आहे, ढोबळमानाने जे बाह्यकर्माशीं निगडीत आहेत आणि जे स्वर्गसुख प्राप्त करून देतात असे अनेक द्रव्य-यज्ञ सांगतां येतील. मात्र ज्ञानयज्ञाची सर यांपैकी कुणालाच नाही. खरें तर परमात्म-सुख मिळवण्यासाठी साधक मंडळी डोळ्यात तेल घालून आपली साधना करत असतात.)

हे ज्ञान सांप्रत केलेल्या कर्माची अंतिम फलश्रुति असून, नैष्कर्म्याची जणूं खाण आणि पोटतिडकीने केलेल्या साधनाचे पूर्ण समाधान होय. हे ज्ञान प्राप्त होतांच प्रवृत्ती लुळी पडते, तर्क आंधळा होतो आणि इंद्रियांना विषय-वासनांचा विसर पडतो ! मनाचें मनपण संपते, बोलणे खुंटते नि ज्ञेय म्हणजेच जाणून घ्यायचे तें ब्रह्म प्रत्यक्षात  गंवसते. वैराग्याची वानवा संपते नि विवेकाचाही सोस कमी होतो. आणि प्रत्यक्ष न पाहतानाही स्वत:ला स्वत:ची भेट सहजपणें  घडून येते !

आतां येणारा श्लोक अतिशय महत्वाचा नि माझा आवडीचा आहे. त्याचा विचार पुढील भागांत !


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?