Sunday, April 15, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अठरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अठरावा)
एकाच मानवजातीला चार प्रमुख वर्णांमध्यें त्यांच्या गुण कर्मानुसार विभागणी करून ईश्वर स्वत: त्या सर्वांपासून अलिप्त राहिला.
‘एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहलें गा चहूं वर्णीं । ऐसी गुण-कर्मीं कडसणी । केली सहजें ॥ म्हणोनि आइकें पार्था । हे वर्णभेद संस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचि लागीं ॥’
हे सर्व माझ्यापासून झाले ; पण मी केले नाही, असे ज्याला आकळले तो प्रपंचाच्या राम-रगाड्यातून सुटला (आणि मुक्त झाला) असे समजावें. या आधीं जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी देखील माझे ‘अकर्ता’ नि ‘अभोक्तापण’ जाणून यथोचित कर्में केली. ज्याप्रमाणें आधी भाजलेले बियाणे जमीनींत रुजत नाही, तसे त्यांची निष्काम कर्में त्यांना कर्मबंधनांत न लोटतां मोक्षदायी ठरतात. अजून एक गोष्ट लक्षांत ठेव अर्जुना, की कर्म-अकर्म हा विचार आपल्या लहरीप्रमाणे करून चालत नाही कारण कर्म कशाला म्हणावे नि अकर्म म्हणजे काय याचा उहापोह करतांना चांगले चांगले विद्वान देखील गोंधळून जातात. कधीकधी खोटे नाणे खऱ्यासारखे दिसून शहाणा माणूस सुध्दां फसतो. अगदी तसेच, केवळ आपल्या संकल्पाने प्रतिसृष्टि निर्माण करू शकणारे दिग्गज देखील ‘नैष्कर्म्य’ या संज्ञेबाबत अनभिज्ञ असतात. जिथे स्वत:ला ‘क्रान्तदर्शी’ म्हणवणारे शाहाणे सुध्दा मूढ ठरतात तिथे मूर्खांची काय कथा? म्हणून त्याच विषयावर काही सांगतो, ते नीट ऐक.

“कर्मणो ह्यपि बोध्दव्यं बोध्दव्यं च विकर्मण: ।
 अकर्मणश्च बोध्दव्यं गहना कर्मणो गति: ॥४/१७॥”
(कर्म म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे, तसेच विकर्म म्हणजे काय ते कळले पाहिजे. निषिध्द कर्म तर कळायलाच हवे. खरोखर कर्माची व्याप्ति दुर्बोध आहे.)

अरे, ज्यामुळे अवघें जग निर्माण होते त्या कर्माविषयीं सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातही वर्णाश्रमाप्रमाणे उचित असलेले विहित कर्म समजून घेणे तर अधिकच महत्वाचे ठरते. शिवाय शास्त्रानुसार जे काही निषिध्द कर्म सांगितले आहे तेही यथार्थपणें जाणून घ्यायला हवेच.
अशा प्रकारें या जगांत कर्माची व्याप्ति प्रचंड आहे आणि अखिल विश्व कर्माधीन आहे हे एव्हाना तुझ्या लक्षांत आले असेलच.

पण ते असू देत. आता मी तुला ‘प्राप्तांचे’ म्हणजे सिध्द पुरूषांची लक्षणे सांगतो.
“कर्मण्यकर्म य: पश्येद अकर्मणि च कर्म य: ।
स बुध्दिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ॥४/१८॥”
(कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, तो सर्व माणसांत बुध्दिवान्, योगयुक्त आणि सर्व कर्में करणारा आहे.)

‘जो सकळ कर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥’
‘आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी (चांगली) । बोधला असे (ज्ञानाने ओतप्रोत) ॥’
अशा रीतीने जो जाणीवपूर्वक निष्काम कर्म करतांना दिसतो तो ज्ञानी म्हणून ओळखावा. असे पहा, तळ्याशेजारी उभा असलेला माणूस आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब पहात असतांना स्वत: त्यापासून वेगळा आहे हे जाणून असतो. किंवा, नौकाविहार करत असतांना काठावरची झाडे झपाट्याने मागे जात असली तरी ती झाडें अचल आहेत हे जाणून असतो. अगदी तसेच, स्वत: कार्यमग्न असतांनाही ज्याला आपल्या स्व-स्वरुपाची कायम जाणीव असते तो निष्कर्मीच असतो.
किंवा, सूर्योदय वा सूर्यास्तप्रसंगीं सूर्य काही ‘चालत’ नसतो, तसाच निष्काम कर्म करणारा नैष्कर्मी म्हणून ओळखावा. तो सामान्य माणसांसारखा दिसत असला तरी त्याच्या नैष्कर्म्य स्थितिमुळे तो मनुष्यत्वाच्या पलीकडे असतो, जसे पाण्यांत सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी ते काही बुडत नाही !
असा पुरूष न पाहतांही विश्व पाहतो, काहीही न करता सर्व काही तटस्थपणे करतो आणि अवघें भोग न भोगतांही त्याने भोगलेले असतात. एकाच ठिकाणी बसून तो सर्वत्र फिरून येतो. खरे तर तो स्वत:च विश्वरूप झालेला असतो !

‘जयां पुरूषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु (तिरस्कार) नाही । परी फलापेक्षा कहीं । संचरेना ॥ (फलाची आसक्ती कधीच शिरकाव करीत नाही).
‘आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरीलें (सुरूं केलेले) सिध्दीस नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळे ना ॥
‘ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें (सर्व) । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें (मनुष्य रूपांत) । वोळख तूं (ओळखावा) ॥
‘जो शरीरीं उदासु (अलिप्त) । फळभोगीं निरासु (निरीच्छ) । नित्यता  उल्हासु (कायम प्रसन्न) । होऊनि असे ॥
‘जो संतोषाचां गाभारां (गर्भगृहांत) । आत्मबोधाचिये वोगरां (पक्वान्न) । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां (सेवन करताना) ॥

गीतेतील पुढचें दोन श्लोक महत्वाचे आहेत निष्काम-कर्मयोगाचे मूलतत्त्व समजून घेण्यासाठी…..

“निराशीर्यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह: ।
 शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥२१॥
“यदृच्छलाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर: ।
 सम: सिध्दावसिध्दौ च कृत्वाsपि न निबध्यते ॥२२॥

‘कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी (ओवाळून) । अहंभावेंसीं ॥
‘म्हणोनी अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे । जया आपुलें आणि परावें (परक्याचे) । दोन्ही नाहीं ॥
तो दिठी (दृष्टीने) जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आइकें तें आहे । तोचि जाहला ॥
चरणीं हन चाले । मुखें जें जे बोले । ऐसे चेष्टाजात (सर्व व्यापार) तेतुलें (तेव्हढे) । आपणचि जो ॥
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवाचून (आपल्याशिवाय) नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥
म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाही ॥ (तो सर्व तऱ्हेने मुक्त, कर्म करूनही कर्मरहित नि गुणांनी वेढलेला असूनही गुणांच्या पलीकडचा असतो हे नि:संशय)

“गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस: ।
 यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥

‘तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ( देहधारी असला तरी चैतन्याने सळसळणारा, परब्रह्माच्या कसोटीला पुरेपूर उतरणारा असतो)
त्याने यज्ञादि कर्में केली तरी तीं सगळी त्याच्यातच विलीन होऊन जातात. अकालीं जमून आलेले मेघ जसे न बरसतांच विरून जातात तशी त्याने केलेली सर्व शास्त्रोक्त विधिविधाने त्याच्यातील एकात्म भावामुळे त्याच्याच स्वरूपांत विलीन होतात.
(क्रमश: ….
         


Comments:
आपण केवळ विद्वान नव्हेत तर सिद्धवस्थेला गेलेले आहांत. आपले सारेच लेखन माऊलीची कृपा वाटते.
कृपया आपला इये मेल आय डी कळवून उपकृत कराल काय?
सध्या मी आपल्या इंग्रजी भाष्याधारे अनुभव अमृत मराठीत काव्यमय आशय उतरवीत आहे. आपले आशीर्वाद हवेत,

धन्यवाद माझा इये मेल - msonavane@hootmail.com

कृपया उत्तर अपेक्षित आहे.
धन्यवाद.

अण्णा
[मधुकर वि. सोनवणे. नाशिक-पंचवटी ]
28/05/2020.
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?