Friday, April 20, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग विसावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग विसावा)
“तत् विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शन:    ॥३४॥”
(ते ज्ञान सद्गुरूंजवळ जाऊन त्यांना दंडवत घालून केलेला नमस्कार, त्यांची सेवा म्हणजेच काटेकोर आज्ञापालन आणि आत्म्यासंबंधी विचारलेले प्रश्न या साधनांद्वारा जाणून घे. ते शब्दप्रभू, तत्वसाक्षात्कारी श्रीगुरू तुला ज्ञानाचा उपदेश करतील.)

अर्जुना, अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचे असेल, मनांत बिंबवून घ्यायचे असेल आणि त्याचा मनांत अनुभव घ्यावा असे वाटत असेल, तर या शब्दज्ञानी संतांची सर्वभावें सेवा करावी. ते संत म्हणजे ज्ञानाचें प्रत्यक्ष माहेरघर होत नि त्यांची सेवा म्हणजे त्या घराचा उंबरठा होय. अर्जुना, तूं सेवा करून संतांना आपलेसे कर. अंत:करणपूर्वक जीवाभावाने संतचरणांना नमस्कार कर आणि कुठलाही अभिमान न बाळगतां त्यांची सर्वप्रकारें सेवा कर. अशी सेवा केली असतां आपल्याला जें आत्मज्ञान मिळवणे अपेक्षित असते त्या संदर्भात प्रश्न केले तर ते संत ज्ञानोपदेश करतील. त्या ज्ञानामुळें तुझ्या मनांतील सर्व संशय कायमचे दूर होतील.
त्या उपदेशरूपी ज्ञानप्रकाशाने मन निर्भय होईल, अंत:करण ब्रह्माप्रमाणें  नि:शंक होईल नि अर्जुना, तूं स्वत:ला समस्त प्राणिमात्रांसह माझ्या स्वरूपांतच अखंडपणे पाहशील.
अरे पार्था, ज्या वेळीं गुरूकृपा होईल त्यावेळेस हे ज्ञान अद्वैत प्रकाशाने उजळून जाईल आणि अज्ञानरूपी अंध:कार सहजपणें नष्ट होईल.
 (मूळ ओव्या अधिक सुंदर आहेत. – “जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । नि:शंकु होय ॥ ते वेळी आपणपेया सहितें । इये अशेषेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥ ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल । जैं गुरूकृपा होईल । पार्था गा ॥” !!

पुढे म्हणतात,
“जरी कल्मषांचा आगरू (महापापांचे भांडार) । तूं भ्रांतीचा सागरू (भ्रमाचा समुद्र) । व्यामोहाचा डोंगरू (संशयाचा पर्वत) । होउनी अससी ॥
“तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें (तुलना केली असतां) । हें अवघेंचि गा थोकडें (क्षुल्लक) । ऐसें सामर्थ्य असे चोखडें (विलक्षण बळ) । ज्ञानी इये ॥

अरे, हे भ्रमरूप विश्व म्हणजे त्या अमूर्त, अव्यक्त परब्रह्माची पडछाया आहे आणि तो भ्रम केवळ आत्मज्ञानानेच नाहीसा होतो. तर मग अशा ज्ञानापुढे मनाचें दोष कितपत टिकतील ? खरें तर असे बोलणेच निरर्थक आहे, कारण या जगांत  ज्ञानाएवढें बलाढ्य दुसरे काहीच नाही.
असे पहा, त्रैलोक्य पेटून जो धूर आकाशात दाटेल त्या वावटळीला मेघ उडवून लावू शकतील काय ? किंवा, जो प्रलयाग्नि सोसाट्याचा वारा नि पाण्यामुळे प्रज्वलित होतो, तो तृणांकुर अथवा लाकडाच्या तुकड्याने दडपला जाईल काय ?

“न हि ज्ञानेश सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिध्द: कालेनात्मनि विंदति ॥३८॥”

(वेदांमध्ये किंवा लोकांमध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. तें ज्ञान कर्मयोग आचरणारा पुरूष कालांतरानें स्वत:च आपल्या अंत:करणांत प्राप्त करून घेतो. )

म्हणून या संबंधांत अधिक काही बोलणे पुरे झाले. त्या पवित्र ज्ञानाने दोष जातात किंवा नाही असा प्रश्नच निर्माण होत नाही कारण ज्ञानासाठी कुठलाच दृष्टांत अपुरा पडतो. एकूणच, ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही एवढे मात्र निश्चित. या जगांत चैतन्यासाठी जशी दुसरी उपमा देता येत नाही, तसे एकटे ज्ञानच उत्तम आहे. ज्ञानासारखे दुसरे काहीही नाही.
महातेजस्वी अशा सूर्याचे प्रतिबिंब जर तितकेच तेज:पुंज म्हणता आले, किंवा आकाशाला जर पुरचुंडींत बांधतां आले. अथवा पृथ्वीएवढा वजनदार पदार्थ जर मिळाला, तरच ज्ञानाला इतर उपमा देणे शक्य आहे !
म्हणून वारंवार विचार करतां असा निष्कर्ष निघतो की ज्ञानाची पवित्रता ज्ञानांतच विहित आहे. अमृताची चव अमृताप्रमाणेच म्हटली जाते तसे ज्ञानांचे उपमा ज्ञानच !
त्यावर अर्जुनाचा पुन्हा एक मार्मिक प्रश्न ! तो म्हणतो की हे देवा, तें ज्ञान कसे मिळवायचें ? खरें तर हा प्रश्न आता येणारच हे आधीच ताडून भगवंत म्हणतात,

“श्रध्दावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेंद्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा अचिरेण परां शान्तिं अधिगच्छति ॥३९॥”

(श्रध्दावान्, ज्ञान साधनेसाठी तत्पर असलेला आणि जितेन्द्रिय असा पुरूष आत्मज्ञान प्राप्त करून घेतो नि मोक्षरूप शांतीचा अनुभव घेतो.)

‘तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाही (प्रतिष्ठा) ॥
जो मनासी चाड (इच्छा) न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे (प्रकृतीने केलेले कर्म आत्म्यावर लादत नाही ) । जो श्रध्देचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥
तयासीचि गिंवसित (शोधत) । हें ज्ञान पावे निश्चित । जयामाजीं अचुंबित (अचूक) । शांति असे ॥
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे (ठसतें) । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥
मग जेउती (जिकडे) वास पाहिजे (पाहतो) । तेउती (तिकडे) शांतीचि देखिजे । तेथ आपपरू (माझेंतुझें) नेणिजे । निर्धारितां (निश्चितपणें) ॥
ऐसा हा उत्तरोत्तरू । ज्ञानबीजाचा विस्तारू । सांगतां असे अपारू । परि असो आतां ॥

“अज्ञश्चाश्रध्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोsस्ति न परो न सुखं संशयात्मन:  ॥४०॥”

(अज्ञानी, अश्रध्द आणि संशयी माणूस नाश पावतो. संशयी माणसाला इहलोक साधतां येत नाही, परलोकही साधत नाही नि सुखही लाभत नाही.)

‘ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानांची आवडी नाही । तयाचें जियालें (जगणे) म्हणों काई । वरी मरण चांग (त्यापेक्षा मरण उत्तम) ॥
शून्य (रिकामे) जैसे कां गृह । कां चैतन्येवीण देह । तैसें जीवित तें संमोह (भ्रमिष्ठ) । ज्ञानहीन ॥

अरे, आयुष्यांत काही कारणाने ज्ञान मिळाले नसले तरी ज्ञानप्राप्तीची जराशी इच्छा मनांत आली तरी तें मिळवणे शक्य असतेच ना ? मात्र ज्याला ज्ञानप्राप्तीची इच्छाच नाही तो संशयाच्या अग्नींत जळत राहतो. अरे, जेव्हा अमृतही गोड वाटेनासे होते तेव्हा त्याचे मरण जवळ आले असे समजणे क्रमप्राप्त ठरते.
अगदीं तसेच, जो विषयसुखांत रंगतो, अल्प ज्ञानानेही माजतो तो संशयाधीन होतो यांत शंका नाही.

‘मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणे नासला (वांया गेला) । तो ऐहिकपरत्रा मुकले । सुखासि गा ॥
जया काळज्वरू आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणे । सरिसेंचि मानी ॥
तैसें साच आणि लटिकें (खरे-खोटें) । विरूध्द आणि निकें (योग्य) । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांही । मना नये (समजत नाही) ॥
म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर (जाळे) । प्राणियांसी ॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा (जिंकावा) । जो ज्ञानाचिया अभावा - । माजि असे ॥
जैं अज्ञानाचें गडद (काळोख) पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥
हृदयीं हाचि न समाये (मावत नाही) । बुध्दीतें गिंवसूनि ठाये (सद्विचाराला व्यापून टाकतो) । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥

मात्र हा प्रबळ संशय एका जालीम उपायाने नेस्तनाबूद करता येतो, जर माणसाच्या हातांत ज्ञानरूप तळपती तलवार असेल तर !

म्हणून अर्जुना, अज्ञानापासून निर्माण झालेल्या आणि अंत:करणांत राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचें आचरण कर आणि युध्दाला सज्ज हो !!

‘याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता (ताबडतोब) । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥
ऐसें सर्वज्ञाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ (क्रमश:……



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?