Tuesday, October 06, 2026
चाय चाय चाईsय्य् !
चाय चाय चाईssय्य् !
मुंबईहून इंदोरला जाताना देहरादून एक्स्प्रेस पहाटे पहाटे रतलाम नागदा ही स्टेशन्स घेत असे नि सर्वप्रथम जाग येई ती वरील आरोळ्यांनी. धडपडत उठून आधी त्या चायवाल्याला हाक मारून गरमागरम मसाला चाय ओठीं लावल्याशिवाय प्रवास पूर्ण झालाच नाही कधी ! होय, मला सर्व प्रकारच्या चहाचे कौतुकच नव्हे तर चक्क क्रेझ आहे. खूप मागे एकदा डॉक्टर कल्याणपुरकरांनी गीतेतला एक श्लोक म्हणत श्रीकृष्णालाही चहा कसा प्रिय होता हे त्यांच्या विशिष्ट विनोदी शैलींत सांगितले होते. त्यावेळी मला गीतेचा गंधही नव्हता तरी पण कदाचित् म्हणूनच तो श्लोक मला चहामुळे भावला होता. ‘सर्वस्य चाsहं विधि संन्निविष्टो’ वगैरे ! श्रीकृष्णाला माझ्यासारखाच सर्वांना चहा अतिप्रिय आहे असे त्यांनी केलेले भाषांतर मला तेव्हा पटले होते. त्या डॉक्टरांना कोणीही कधीही भेटायला आले की चहाची ऑर्डर ठरलेलीच. ते सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही त्यांना पन्नास कप चहा मावेल एवढी स्टेनलेस स्टीलची तोटीवाली कोठी भेट म्हणून दिली होती ! असो.
मंडळी, आजचे निरूपण निव्वळ चहावर असणार आहे सबब आपापले कप सज्ज ठेवावे ही विज्ञापना !
इंदौरला पारशी मोहल्याच्या नुक्कडवर जीपीओ समोरच्या एका भल्या मोठ्या दुकानांत चायवाले मास्टरजींनी ‘चाय की दुकान’ थाटले होते. पांढराशुभ्र लांब बाह्यांचा शर्ट नि पायजमा, चेहरा कायम हंसतमुख नि येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाइकाचे तोंड भरून स्वागत ही मास्टरजींची खासियत होती. त्या मोठ्या दुकानांत किमान दहाबारा पाठीची बांकडी होती जी सहसा गिऱ्हाइकांनी भरलेली असत. मास्टरजी दुकानाच्या मधोमध बसत, समोर मोठ्या प्रायमस स्टोव्हवर मोठी केटली नि शेजारीच तयार चहाची दुसरी मोठी केटली. एकच प्रकारचा नि एकाच चवीचा चहा मोठाल्या पांढऱ्या शुभ्र कपबशींत स्वत: ओतून देत मास्टरजी. खारी, बिस्किटें वगैरे काहीही नाही, निव्वळ फक्कड चहा. किंमतही अतिशय वाजवी, केवळ चार आणे. मात्र चहा पिऊन होताच त्वरित बांक रिकामा करणे ही अलिखित शिस्त होती. राजकारण आणि सिनेमाच्या गप्पा नकोत असा ताकीदवजा बोर्ड ठळकपणे असायचा तिन्ही भिंतींवर. तेथून आमचे कॉलेज हांकेच्या अंतरावर असल्याने तिथे आम्हा विद्यार्थ्यांचाही कायम भरणा असे.
सिनेमाचा सेकंड शो पाहून आल्यावर मला सहसा अभ्यास करण्याची सुरसुरी येई. मात्र त्याआधी कडक मीठी चाय तो बनतीही थी !
पुण्यात आल्यावर दुसऱ्याच दिवसापासून ‘अमृततुल्य’ ची चटक लागली पण इवलेसे जस्ट अर्धेअधिक भरलेले कप पाहून भ्रमनिरास देखील होई. इतर रेस्टरांमध्ये इंदौरसारखे ‘ट्रे-टी’ क्वचित् दिसत मात्र टपरीवरचा नाशिकचा ‘कटिंग चहा’ नेहमीच भाव खाऊन जाई. आतां पुण्यात ठिकठिकाणी विविध गावांच्या नि ब्रॅंडच्या चहांची जणू स्पर्धा लागलेली दिसते, मात्र ‘किवळकरांचा’ चहा किंवा सीटीसी वा ‘पिको सुचांग’ची सर कुठल्याच चहाला नाही. पूर्वीं फक्त ब्रूकबॉंड नि लिप्टन ही नावाजलेली नांवं पण आतां ‘वाह ताज’, ‘वाघबकरी’ वगैरेही भाव खातात म्हणे.
‘डिप डिप’ व्हरायटीत मला तरी ‘टेटली किंवा पीजी’ भावतात, तथापि गरमागरम वाफाळणारा चहा कुठलाही असला तरी हवाच असतो बरं का, त्यातून कुणी परस्पर तयार करून आणला असेल तर !
रहाळकर
६ ऑक्टोबर २०२६