Tuesday, October 27, 2026

 

मधु मागसि माझ्या सख्या परी !

 मधु मागसि माझ्या सख्या ……! 

आज कविवर्य भा.रा.तांबे यांचा जन्मदिन. आजच्या ‘भावधारा’ मध्यें आकाशवाणीने तें औचित्य साधून तांब्यांची एकाहून एक सरस भावगीतें ऐकवली आणि आम्हा रसिकांना पुलकित करून सोडले. वास्तविक तांबे आणि रहाळकर हे अत्यंत निकटचे स्नेही आणि तो स्नेह दोघांनीही आपापले देहावसान एकाच तारखेला करून चिरंजीव ठरविला ! सात डिसेंबर हा दिवस ‘तांबे-रहाळकर स्मृतिदिन’ म्हणून कित्येक वर्षें महाराष्ट्र साहित्यसभेने इंदुरांत कसोशीने साजरा केला. मी तांबे आजोबांना कित्येकदा आमच्या घरीं आलेले पाहिले आहे इतकेच नव्हे तर त्यांनी देह ठेवल्यावर माझ्या आजोबां बरोबर ते सांत्वनासाठी गेले असतां मी हट्टाने गाडीत बसून राहिल्याचेही मला स्पष्टपणे आठवतेंय् ! 


आज सकाळीं लताजींच्या गोड आवाजांत तांब्यांची मधुर गीतें ऐकताना भावविभोर झालो मी. यातली बरीचशी गाणी माझी मोठी बहीण खूप छान गात असे नि माणिक मायदेव देखील. आज ऐकलेले शेवटले गीत- ‘मरणांत खरोखर जग जगते ‘ मात्र खूपसे बेचैन करीत अंतर्मुख करून गेले आणि तुमच्याशी संवाद केल्याशिवाय ती तगमग शांत होणार नाही या भरंवशावर हे सगळे लिहून काढले ! 

कसं शांत शांत वाटतंय् आता ! !

रहाळकर

२७ ऑक्टोबर २०२६ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?