Monday, October 12, 2026

 

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं……!

 चातुर्वर्ण्य मया सृष्टं…….! 

भगवंताने चौथ्या अध्यायात म्हटले की गुण-कर्मांनुसार मानवजातीला मी चार वर्णांत विभागले - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. ती विभागणी करत असतानाच प्रत्येक वर्णाश्रमधर्माची कर्तव्यें देखील विशद केली. मला माहीत आहे की हे सर्व तुम्ही जाणताच. तथापि मला आज काही वेगळे मांडण्याची खुमखुमी आली आहे हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नसणार. सबब काहीही पाल्हाळ न लावतां सरळ मुद्यावर येतो, जमेल तेवढे शब्दांत मांडायचा प्रयत्न करतो. 


असं पहा, आपल्यातील प्रत्येकजण आपापल्या वर्णाची आयडी घेऊन जन्माला आला, वाडवडिलांनी आपले कुळ गोत्र आणि संस्कारांची थोडक्यात पण वेळीच माहिती करून दिली आणि तेवढ्या शिदोरीवर आपण आजवर कालक्रमणा केली. काहींनी मुकाट्याने सर्व काही स्वीकारले तर काही मोजक्या मंडळींनी त्यांवर प्रश्नचिन्ह नव्हे तर अधिक जाणून घेण्याची उत्कंठा बाळगली. मला वाटतं आपण सर्व या दुसऱ्या कॅटेगरीतले आहोंत. 


मी जन्माने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र असलों तरी प्रत्यक्षांत किंवा प्रॅक्टिकली मी या चारही वर्णांत चपखल बसतो असा विचार कधी स्पर्ष करून गेलाय का तुम्हाला ? ब्राह्मणांची सर्व कर्तव्य-कर्में, जसे अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह तसेच अठराव्या अध्यायांत विस्ताराने सांगितलेली नऊ लक्षणे शम दम तप शौच शांती आर्जव ज्ञान विज्ञान आस्तिक्य आणि ब्रह्मकर्म ही स्वभावात:च अनुस्यूत लक्षणे मला वास्तविक अथवा खऱ्या ब्राह्मण्याला पात्र करतात. तसेच क्षत्रीय म्हणून शौर्य तेज धृती अर्थात दृढनिश्चय दक्षपण युद्धापासून पळ न काढणारा दानशूर किंवा जनरस, मॅग्नॅनिमस  ईश्वरावर श्रद्धा असणारा असा क्षात्रधर्माचा लौकिक आहे, जो माझ्यातही ठासून भरलेला आहे. 

वैश्य धर्माची लक्षणे सांगताना कृषी गैरक्षण वाणिज्य अर्थात  दैनंदिन व्यवहार हीं स्वाभाविक कर्तव्यकर्मे सांगितलीत तर शूद्रांसाठी परिचर्यात्मक कार्यें अर्थात सेवाकार्यांचा स्वभावत:च पायंडा घालून दिलाय ! 


आतां मला सांगा, आपण सर्वच या चारही कर्तव्यकर्मांचे नकळत आचरण करत असतोच ना, तर मग ते चारही वर्ण आपल्यांत प्रत्यक्ष विराजमान आहेत हेही पटले असेल तुम्हाला. मग आता निव्वळ आडनांवांवरून आपण कधीही भेदभाव तर करणार नाही ना ? करा, विचार करा ! 

रहाळकर

१२ ऑक्टोबर २०२६.   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?