Sunday, October 11, 2026
मुरावि आणि उसंडु !
मुरावि आणि उसंडु !
मंडळी, हे दोन शब्द आहेत नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘अमृत’ नावाच्या नियतकालिकातील नियमित येणाऱ्या दोन सदरांचे !
मुरावि म्हणजे मुद्राराक्षसाचा विनोद तर उसंडु हा उपसंपादकाच्या डुलक्याचा शॉर्ट फॉर्म ! अमृत हातात पडताच आधी ही दोन सदरें नजरेखालून घालायचे कारण ती विनोदाची मेजवानी असे जणू.
अर्थात इतरही छापील पेपरांत किंवा मासिकांत तत्सम स्फुटें असत जी पाहायला आम्ही आतुर असूं. ॲलेम्बिक या गुजराती औषध कंपनीच्या जाहिरातींत ‘लिमेरिक्स्’ या नावाखाली मजेदार चुटकुले किंवा व्यंगचित्रें असत तर ब्लिट्झ मधील बोकेट्स् ॲंड ब्रिकबॅट्य हे सदर आणि ऑर्गनायझर मधील इंद्रप्रस्थ कॉलिंग हे सदर लक्षवेधक असे. ‘नईदुनिया’ दैनिकातले ‘सुनो भाई साधो किंवा राजेंद्र माथुरचा ‘पिछला सप्ताह’ मी कधीच चुकवला नाही. टाईम्स ऑफ इंडियातील ‘स्पीकींग ट्री’ हे सदर खूप वेगवेगळ्या आध्यात्मिक किंवा तत्वज्ञान विषयक विचारांना चालना देणारे असे तर ‘सत्यकथे’तील दिलीप पुरूषोत्तम चित्रे किंवा बा. सी. मर्ढेकरांच्या गहन गूढ नवकविता वाचाव्याशा वाटत. इंग्लंडांत असताना दि गार्डियन किंवा तत्सम दैनिकें अधूनमधून चाळली असली तरी भारतीय बनावटीचे साहित्य अधिक जवळचे वाटत असे. शेक्सपियर तर कधी कळलाच नाही हे कटु सत्य असले तरी ‘यस् मिनिस्टर’ सारखे व्यंगात्मक चित्रण खूप मनोरंजन करत असे. अर्थात विलक्षण सुपरफास्ट उच्चारांमुळे त्यातील आशय समजून घेतल्यावर तिसऱ्या कॅटेगरीतल्या श्रोत्यांत चपखल बसत असे मी. अर्थात आता संवईमुळे तेही उच्चार हळूहळू अंगवळणी पडू लागलेत. यावरून माझ्या वडिलांचे स्मरण होते. त्यांना इंग्रजी चित्रपट भारी आवडत. एकदा अप्पा मायदेव त्यांचेसोबत मुंबईच्या मेट्रो सिनेमाला गेला होता आणि परत आल्यावर एखाद्या विनोदावर संपूर्ण थिएटरमधून सर्वप्रथम अण्णासाहेबांचा मोठ्याने हंसण्याचा आवाज घुमत राहिल्याचे त्याने कौतुकाने सांगितले होते ! हे सांगण्याचा उद्देश एवढाच की विनोदाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची कला आम्हा सर्व भावंडांना वारसा हक्काने मिळाली नि ती आम्ही जोपासलीही आहे !
बॅक टु मुरावि आणि उसंडु ! या मुद्राराक्षसाचे विनोद नेहमीच विनोदी असले तरी ते कधी कधी जीवघेणे असतात. कधीमधी हा मुद्राराक्षस जाणूनबुजून उभा केला जाई. आर के किंवा रूसी करंजियाने ब्लिट्झ मध्ये आचार्य कृपलानींची कृपलानी ऐवजी कृपलूनी ( लूनी म्हणजे ल्युनॅटिक - वेडसर ) अशी संभावना केली होती आणि त्यासाठी त्यांचेवर संसदेंत इम्पीचमेंट मोशन आणली गेली होती.
आजच्या जमान्यातही मुद्राराक्षसाचे विनोद आपले लॅपटॉप्स प्रत्यहीं देत राहतात आणि म्हणून एका गंभीर आगळिकीनंतर लिहिलेले पाठवण्यापूर्वी पुन्हा पुन्हा तपासून पाहायचा मी कसोशीने प्रयत्न करतो. एकदा ‘वहिनींना नमस्कार’ हे इंग्रजीत लिहिल्यावर त्या बेट्याने वहिनी ऐवजी चक्क व्हजायनायटीस हा शब्द लिहिला हो आणि तो मेसेज पाठवल्यानंतर ती चूक ध्यानांत आली ! साहाजिकच पुन्हा पुन्हा क्षमा मागूनही ‘बूंद से तो इज्जत निकलही गई थी’ ! !
रहाळकर
११ ऑक्टोबर २०२६.