Friday, October 09, 2026

 

एक मुक्त चिंतन !

 एक मुक्त चिंतन !

आज पहाटे आकाशवाणी पुणे येथून प्रसृत झालेले चिंतन हे सदर ऐकले. श्रीमान मकरंदनाथांनी एका ओंवीवर केलेले विवेचन आवडले नि मग सुरू झाले माझे त्यावरील जरासे स्वैर चिंतन ज्याला सुसंस्कृत भाषेंत मुक्त चिंतनही म्हणता येईल. 

वास्तविक ती ओंवी आहे पाचव्या अध्यायातली चौऱ्ह्यात्तरावी. ‘प्राप्ता’ची लक्षणे सांगताना ज्याने कर्मफलाचा अभिलाष सोडला आहे, जो कर्म करीत असूनही नैष्कर्म्य स्थितीत पोहोचला आहे आणि म्हणून आत्मबोधाने युक्त होत्साता ज्याला काहीच करायचे उरलेले नाही कारण त्याचे केवळ दृष्टिक्षेपाने सृष्टीचे सृजन होते, सृष्टी निव्वळ सुखमय होते आणि तो बोलेल तो शुद्ध आत्मबोधच असेल—- - ‘तो जयाकडे वासु पाहे / तेऊती सुखचि सृष्टी होये / तो म्हणे तेथ राहे / महाबोधु //‘ - वगैरे. 


आणि लगोलग झळकत गेल्या अनेकानेक थोर विभूती, ज्यांची आपल्यावर केवळ दृष्टीतून पडावी असे मनोमन वाटत राहावे ! म्यां म्हणितले अनेकानेक थोर विभूती. होय खरे आहे ते कारण बालपणापासून आजतागायत इतक्या थोर विभूतींची मज पामरावर कृपादृष्टी पडत गेली आहे की त्यांची गणना अशक्य आहे. अर्थात त्या थोर विभूती निव्वळ मानवदेहरूपीच नव्हत्या तर तैलचित्रें, पाषाणमूर्ती, मुखवटे आणि निव्वळ भासमान आकृतीही होत्या. यांतील कित्येक नावें तुमच्याही परिचयाची असल्याने तुम्हीही नक्कीच मान डोलवाल ! 


मुळात या ओंवीत कुणाचे दर्शन घडते ? ज्ञानी, कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी, स्थितप्रज्ञ, संत, सत्पुरूष, प्रेषित, अवतार, ईश्वर, सद्गुरू, परमेश्वर  की हे सर्वच ? यांतील प्रत्येकजण वरील ओवी सार्थ करू शकते कारण मुळात ती शक्ती त्यांच्यात अनुस्यूत असते. अशा कृपादृष्टीचा आपल्या प्रत्येकावर जणू वर्षाव झालेला असतो मात्र दैनंदिन धकाधकीच्या जीवनांत आपण त्याची फारशी दखल घेतलेली नसते. 


मी अगदी शाळेत असल्यापासून थेट लग्न होईपर्यंत श्रीरामांच्या एका सुरेख तसबिरीचा नि:सीम भक्त होतो. त्या तसबिरीतल्या श्रीरामाचे डोळे माझ्याशी नित्य संवाद करायचे, काय कर किंवा करूं नकोस हे सुचवायचे ! अगदी असाच अनुभव आला शेगांवच्या गजानन-मुखवट्यावरील नेत्रांचा ! पुढे एकदा स्वामी माधवनाथांचे चरणवंदन करताना त्यांनी ज्या शांत प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे पाहात दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिला किंवा सद्गुरू आगाशेकाकांनी जेव्हा माझ्याकडे खोलवर पाहात हसतहसत आशीर्वाद दिला ते मी कधीच विसरणे शक्य नाही ! अगदी तस्साच अनुभव श्रीसमर्थ, गोंदवले, अक्कलकोट, पंढरी नि साकुरीलाही आला. प्रशांतिसाई नि शिर्डीसाई आमची दैवतें असल्याने तो तर हमखास येतच राहिला.

आणखी एक गुपित सांगू, आपल्या ओळखीच्या काही व्यक्ती नुसत्या आठवल्या तरी तसाच अनुभव येत राहतो. आमच्या शकुताई दात्ये, डॉ. चक्रपाणी जोशी, सबनीस काकू, कर्नल सोमण, पोहनेरकर काका आणि आता परममित्र देशपांडे काका वगैरे मंडळींचे प्रसन्न हसरे चेहेरे आठवतांच त्यांच्या नजरेतील स्नेहार्द आपुलकी सहज जाणवते मनाला शांत शांत करीत. 

मात्र असे सहजगत्या जाणवायचे कारण असते त्यांनी अविरत केलेली साधना, तपश्चर्या ! ही सर्व मंडळी आणि आणिकही, प्रपंचात असूनही मनौनि कशी अलिप्त राहिलीत प्रपंचापासून यांतच ती अमोघ शक्ती दडलेली असावी. 


निमगावच्या दवाखान्यात पेशंट्स येत नसल्याने ज्ञानेश्वरी उघडून पाने चाळत होतो. एक वयस्क शेतकरी दवाखान्याला दोनतीन फेऱ्या मारून आत येऊन बसला आणि मला विचारले काय वाचताय् डाक्टर. ज्ञानेश्वरी म्हणताच कुठली ओंवी वाचली आत्ता असे विचारल्यावर त्या ओंवीतले जेमतेम दोन शब्द उच्चारताच त्यांनी संपूर्ण ओंवी तर म्हटलीच पण मागच्यापुढच्या पाचसहा ओंव्या देखील खणखणित आवाजात म्हटल्या. मी त्यांना वाकून नमस्कार करू लागताच माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि खोलवर माझ्या डोळ्यांत पाहात उद्गारले की डाक्टर या माऊलीला कधीही अंतर देऊ नका ! कुठला कोण शेतकरी, मला का आपलासा वाटावा, काय म्हणून त्यांचे भेदक डोळे मी कधीच विसरू शकलो नाही, कोण होते ते त्या रूपांत आलेले ? सर्वच अनाकलनीय खरे ! 

रहाळकर

९ ऑक्टोबर २०२६।    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?