Thursday, October 08, 2026
सेवा आणि मेवा !
सेवा आणि मेवा !
अनेक वर्षांपूर्वी संघटनेच्या कामानिमित्त प्रशांतिनिलयम पुट्टपर्थीला चार दिवस गेलो होतो. पूर्वनियोजित दौरा असल्याने जाण्यायेण्याचे रेल्वे आरक्षण कन्फर्म्ड होते. माझे ठरलेले काम संपतांच भजन-दर्शनानंतर माझी झोळी ( होय, तेव्हा ब्याग वगैरे ब्याद नव्हतो बाळगत आम्ही. केवळ एका मोठ्या झोळीत गरजेपुरते कपडेलत्ते असत बरोबर ! ) गणपती मंदिरासमोरील बाकाखाली ठेवून निघण्यापूर्वी पुन्हा मंदिराच्या पायरीवर मथ्था टेकण्यासाठी गेलो. त्या महिन्यांत महाराष्ट्र राज्याच्या स्वयंसेवकांची सेवा सुरू होती. साहाजिकच अनेक स्वयंसेवक ओळखीचे होते. मी परत पुण्याला निघालोय हे पाहून एकाने डॉक्टर तुम्ही आत्तां कसे निघू शकतां, अर्ध्या तासाने स्वामी आंध्रप्रदेशातून आलेल्या डॉक्टरांशी वार्तालाप करणार आहेत, तुम्हाला कोणीच रोखणार नाहीत असे म्हटल्यावर मी माझा कार्यक्रम तात्काळ बदलला आणि चक्क मंदिरांत जमलेल्या शंभर तेलुगु डॉक्टरांच्या समूहात जाऊन बसलो. सर्वच डॉक्टर्स आंध्राईट असल्याने केवळ तेलुगू भाषेत स्वामींचे उद्बोधन झाले - नो इंग्लिश ट्रान्सलेशन ! कदाचित मन लावून ऐकल्यामुळे मला ते व्याख्यान नव्वद टक्के समजले. डॉक्टरांनी ग्रामीण भागात कशी सेवा करायला हवी यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन होते ते.
व्याख्यान संपल्यावर परिपाठानुसार स्वामी सर्व श्रोत्यांच्या रांगांतून अतिशय संथ गतीने चरणस्पर्ष करू देत फिरत असताना सर्वात मागे बसलेल्या माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे पाहात हिंदीतून विचारले, ‘किधरसे आया’ आणि ‘स्वामी पूनासे’ असे म्हणताच अभयहस्त दाखवीत मला म्हणाले, ‘सेवा करेगा तो मेवा मिलेंगा’ !
नंतर लगबगीने झोळा घेऊन बाहेर पडलो त्यावेळी बराच उशीर झाला होता, माझी ट्रेन कधीच निघून गेली होती. मी धडपडत बसेस बदलत बदलत कसाबसा संध्याकाळी गुंटकल् ला पोहोचलो. प्लॅटफॉर्मॉर्मवर मद्रास एक्सप्रेस लागली होती. रिझर्वेशन नसल्याने जनरल बोगी गाठली. बोगींत तुफान गर्दी. मात्र तेवढ्यात एक खेडूत खाली उतरला नि म्हणाला समोरचा वरचा बर्थ रिकामा आहे, इतका वेळ मी झोपून आलो, आता तू तेथे जाऊन झोपू शकतोस मला इथेच उतरायचे होते !
मंडळी, एक रिझर्वेशन गमावल्यावर जनरल बोगींतल्या तुफान गर्दींत आख्खा बर्थ मिळणे याला तुम्ही मेवा म्हणाल ना ?
रहाळकर
८ ऑक्टोबर २०२६.