Friday, August 14, 2026
कृतिशील संवेदनशीलता !
कृतिशील संवेदनशीलता !
माणसांत एक विलक्षण सद्गुण दिलाय ईश्वराने नि तो म्हणजे संवेदना. इतरांचे दु:ख, कष्ट, अभाग्य पाहून आपल्याला सहानुभूती जाणवते. मात्र तसे होत असताना आपण कधी नुसतेच हळहळतो, कधी धीराचे दोन शब्द वापरतो तर क्वचित् कधी मदतीसाठी पुढे सरसावतो. या तिसऱ्या प्रकाराला मी कृतिशील संवेदनशीलता म्हणेन.
खूप पूर्वीं मी विभागप्रमुख म्हणून कारर्यभाग स्वीकारल्यावर आधीचे काही दिवस निरनिराळ्या ठिकाणीं आकस्मिक भेटी देत तिथली कार्यपद्धती, उणीवा आणि तेथील कर्मचार्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा निरंतर प्रयास करीत असे.
एकदा मुळा नदीतील वाटर-हायसिन्थ अर्थात कर्णफुटीच्या अफाट जंगलाला हातांनी काढण्याच्या महापालिकेच्या बिगारी कर्मचाऱ्यांचे काम प्रत्यक्ष पाहिले. जवळजवळ शंभर बिगारी कामगार पाण्यांत उतरून त्या वेली उपटतांना पाहिले. त्याचवेळीं खरेतर जरासे पुढे आर्मीच्या मेकॅनाईज्ड नावा तेच काम यंत्राच्या साहाय्याने करताना पाहून अचंभित झालो. महापालिकेचे शंभर बिगारी आणि आर्मीच्या दोनच नावा तेच काम आपापल्या हद्दींत करत होते. मी परत ऑफिसात आल्यावर माझा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला, मात्र तो कार्यान्वित होण्यात बराच वेळ खर्ची जाणार हे पाहून त्याच दिवशीं स्टोअर ऑफिसरला भेटून सर्व बिगारी कामगारांसाठी गम् बूट आणि जाड रबरी हातमोज्यांची मागणी नोंदवली. तिसऱ्याच दिवशी सर्व साहित्य त्या कर्मचार्यांत वाटले गेले आणि पुढे त्यांचे काम थोडेसे सोपे झाले.
हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की दुसऱ्यांचे कष्ट पाहून वरवरची सहानुभूती न दाखवतां प्रत्यक्ष कृतिशील संवेदना अधिक महत्वाची ठरते !
आपल्या दैनंदिन जीवनांतही आपण प्रत्यही काबाडकष्ट करणारे, दोन वेळचे पोट भरण्याासाठी वणवण करणारे, शरीराने पंगु किंवा थकलीभागलेली माणसें पाहात असतो. त्यांच्याबद्दल कणव नि सहानुभूती वाटणे साहाजिक असले तरी निदान त्यांचा उपमर्द, अपमान तर कळत न कळत करत नाही ना इकडे लक्ष देणे आवश्यक नाही काय ? स्वामींनी फारच थोडक्या शब्दांत सांगितलंय्, ‘हेल्प एव्हर-हर्ट नेव्हर’ ! मदतीसाठी नेहमी तत्पर असा पण निदान कुणाला दुखवूं तरी नका.
मला वाटतं हीच ती ‘कृतिशील संवेदनशीलता’ ! !
रहाळकर
१३ ऑगस्ट २०२६