Wednesday, May 27, 2026

 

योगेश्वर श्रीकृष्ण- ज्ञानदेवांच्या शब्दांत !

 योगेश्वर श्रीकृष्ण

( ज्ञानदेवांच्या शब्दांत ) ! !


आज सकाळी पुणे आकाशवाणीवर एक सुरेख गीत ऐकले जे माझ्या आईला अतिशय प्रिय होते. सुधीर फडके यांनी गायिलेले, पंडित मनोहर कवीश्वर यांनी रचलेल्या गीताचा मुखडा होता - ‘माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा / भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचावगैरे

या गीताने पुन्हा एकदा आठवण करून दिली त्या योगैश्वराची !


 हल्लींपुरूषोत्तम माससुरू आहे आणि विविध लेखक-लेखिका, कवी, गायक, चित्र-शिल्पकार आपापल्या परीने त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाचे अनंत पैलू उलगडून दाखवीत आहेतमलाही वाटलं की त्या पुरूषोत्तमाचे यथार्थ स्मरण श्रीज्ञानदेवांच्या नजरेतून करून पाहावे. फार दूर जावे लागत नाही आतांशा कारण ज्ञानदेवी सतत पुढ्यात असतेच की

श्रीमद्भगवद्गीतेतील शेवटला श्लोक - “यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:’ वगैरें बद्दल बोलण्याआधीं ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णाचे संदर्भात कसे सांगत गेले हे पाहणे औचित्यपूर्ण असेल. त्या निमित्त पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीवर धावती नजर टाकता येईल म्हणा ! असो


वास्तविक भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र आपण अगदी बालवयापासून ऐकत वाचत आलेलो आहोत. त्यातून कथा-कीर्तने, नाटक-सिनेमा इतकेच नव्हे तर टीव्ही आणि इंटरनेटवरही ते सहज उपलब्ध आहे. मात्र ज्ञानदेवांच्याच शब्दांत ते मांडावे असे वाटले, सबब हे निवेदन


रणांगणावर अर्जुनाची विमनस्क स्थिती पाहून, ‘आता यापरी तो वैकुंठनाथु / देखोनि सखेद पार्थु / कवणेपरी परमार्थु / निरूपील //‘  


मग म्हणालेत, ‘दोंवरी दोनी (दोनावर दोन)  / भुजा आलों घेउनी / आलिंगावया लागुनि / तयाचें आंग //‘ 


ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्णाचे दर्शन करायचे असेल तर आपल्याला अर्जुनाच्या पंक्तींत बसणे क्रमप्राप्त आहे. ‘अहो अर्जुनाचिये पांतीं / जे परिसणया योग्य होती / तिहीं कृपा करुनि संतीं / अवघान द्यावे //‘ खूप लक्ष द्यावे लागेल बरे का ! माऊली म्हणतात, ‘हे सलगी म्यां म्हणितले / चरणां लागोनि विनविलें / प्रभु सखोल हृदय आपुलें / म्हणौनियां //‘ 


रणांगणावरील एकूण परिस्थितीचे वर्णन करताना संजय सांगतोय की, ‘जेथ अश्ववाहकु आपण / वैकुंठीचा राणा जाण / तया रथाचे गुण / काय वर्णूं // देखा नवल तया प्रभूंचे / अद्भुत प्रेम भक्तांचे / जें सारथ्यपण पार्थाचें / करितु असे // पाइकु पाठींसी घातला / आपण पुढां राहिला / तेणें पांचजन्यु आस्फुरिला / अवलीळाचि // 


अर्जुन व्यामोहाने ग्रस्त झालेला पाहून आणि सर्पदंशाने जशा वारंवार भ्रांतीच्या ऊर्मी उफाळून येतात ते पाहून आता तोगारुडीविषबाधा दूर करण्यास सरसावेल असे ज्ञानदेव म्हणतात. ‘म्हणोनि सहजें सुनीळु / कृपामृतें सजळु / तो वोळलासे श्रीगोपाळु / महामेघु // तेथ सुदर्शनाची द्युति / तेचि विद्युल्लता झळकती / गंभीर वाचा ते आयती / गर्जनेची // आतां तो उदार कैसा वर्षेल / तेणे अर्जुनाचळु निवेल / मग नवी विरूढी फुटेल / उन्मेषाची // ते कथा आइका / मनाचिया आराणुका (लक्षपूर्वक) / ज्ञानदेवो म्हणे देखा / निवृत्तिदासु //


तिसऱ्या अध्यायांत कर्मयोगावर विवेचन करत असतांना भगवान श्रीकृष्ण स्वत:बद्दल सांगत आहेत

इतरांच्या गोष्टी राहू देत, अर्जुना मी कसा कायम काही ना काही करण्यांत अर्थात सतत कर्म करण्यात मग्न असतो हे लक्षात घे. मला काही अडचण आहे किंवा काही अपूर्ण इच्छा आहे असे नसले तरी मी सतत स्वधर्म आचरीत असतोच ना. खरंतर पूर्णकाम असा माझ्याशिवाय अन्य कुणीच नाही, माझ्यापाशीं सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे हेही तू जाणतोस. मृत झालेल्या गुरूपुत्राला पुन्हा जीवंत केल्याचा प्रसंग तुलाही माहीत आहे ! माझे कार्य शांतपणे चालूच राहते. सतत कर्मरत राहण्याचा माझा मुळी स्वभावच आहे ! आम्ही पूर्णकाम असलो तरी निष्क्रिय असून चालणार नाही कारण मग प्रजा कशी निस्तरेल ?  “म्हणोनि समर्थु जो येथें / आथिला सर्वज्ञते / तेणें सविशेषें कर्मातें / त्यजावें ना //“ 


पुढे पुरूष पाप करायला कां उद्युक्त होतात या अर्जुनाच्या प्रश्नावर - “तंव हृदयकमळ-आरामु / जो योगियांचा निष्काम कामु / तो म्हणतसे पुरूषोत्तमु / सांगेन ऐक //“ …….”ऐसे सकळ सिद्धांचा रावो / देवी लक्ष्मियेचा नाहो (पती) / राया ऐके देवदेवो / बोलता जाहला //‘ 


चवथ्या अध्यायाची अर्थातज्ञानकर्मसंन्यास योगाची प्रस्तावना करताना ज्ञानदेव म्हणतात, ‘आघींचि विवेकाची गोठी / वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी / आणि भक्तराजु किरीटी / परिसत असे //‘ ‘जैसा पंचमालापु सुगंधु / कीं परिमळु आणि सुस्वादु / तैसा भला जाहला विनोदु / कथेचा इये //‘कैसी आगळिक दैवाचेीजे गंगा वोळली अमृताचीहो कां जपतपें श्रोतयांची / फळा आलीं //

जें संगेचि पितया वसुदेवासी / जे संगेचि माते देवकीसी / जे संगेचि बंधू बळिभद्रासी / तें गुह्य अर्जुनेंसी बोलत // देवी लक्ष्मीयेवढी जवळिक / परी तेही देखे या प्रेमाचे सुख / आजि कृष्णस्नेहाचे बिक / यातेंचि आथी // सनकादिकांचिया आशा / वाढिन्नल्या होतिया कीर बहुवसा / परी त्याही येणें मानें यशा / येतीचिना // या जगदीश्वराचे प्रेम / एथ दिसतसे निरुपम  / कैसे पार्थें येणे सर्वोत्तम / पुण्य केलें // 

हो कां जयाचिया प्रीतीं / अमूर्त हा आला व्यक्तीं / मज एकवंकी यांची स्थिती / आवडतु असे // ! 

एऱ्हवीं हा योगियां नाडळे / वेदार्थासी नाकळे / जेथ ध्यानाचेही डोळे / पावतीना // 

तो हा निजस्वरूपु / अनादि निष्कंप / परी कवणेमाने सकृप / जाहला आहे // 

हा त्रैलोक्यपटाची घडी / आकाराची पैलथडी / कैसा याचिये आवडी / अवतरला असे // ! ! ! 


भगवंत जेव्हा अर्जुनाला म्हणतात की आपण आत्तां युद्धभूमीवर असल्याने इतर काही बोलण्याऐवजी आधी तुझा व्यामोह आणि अज्ञान दूर करणे आवश्यक आहे, ‘तंव अर्जुन म्हणे श्रीहरी / माय आपलेयाचा स्नेह करी / एथ विस्मयो काय अवधारीं / कृपानिधी // तूं संसारश्रान्तांची साउली / अनाथ जीवांची माउली / आमुतें कीर ( खरोखर ) प्रसवली / तुझीच कृपा // 

पुढे अर्जुन जेव्हा सूर्याला उपदेश केल्याचा वृत्तांत ऐकतो तेव्हा तो साहाजिकच प्रश्न करतो. त्यावर प्रत्यक्ष भगवंत काय म्हणतात ते पहा - ‘तंव कृष्ण म्हणे पंडुसुता / तो विवस्वतु जैं होता / तैं आम्ही नसों ऐसी चित्ता / भ्रांति जरी तुज // तरी तूं गा हें नेणसी / पैं जन्में आम्हां तुम्हांसी / बहुतें गेली परी तिये स्मरती / आपुली तूं // मी जेणें जेणे अवसरें / जे जे होउनी अवतरे / तें समस्तही स्मरें / धनुर्धरा // म्हणौनि हे आघवें / मागील मज आठवे / मी अजुही ( अजन्मा ) / परी संभवे (जन्म घेतो) / प्रकृतीयोगें // माझे अव्ययत्व तरी नसे / परी होणे  जाणे एक दिसे / तें प्रतिबिंबें मायावशें / माझ्यांचि ठायीं // (what a revealition ! ) ‘माझी स्वतंत्रता तरी मोडे / परी कर्माघीनु ऐसा आवडे / तेंही भ्रातिबुद्धी तरी घडे / एऱ्हवीं नाही // कीं एकचि दिसे दुसरें / तें दर्पणाचेनि आधारें / एऱ्हवी काय वस्तुविचारें (वस्तुत:) / दुजें आहे // “तैसा अमूर्तचि मी किरीटी / पैं प्रकृती जैं अधिष्ठी / तैं साकारपणें नटनटीं कार्यालागीं //“ 

जें धर्मजात आघवें / युगायुगीं म्यां रक्षावें / ऐसा ओघु हा स्वभावें / आद्यु असे // म्हणोनि अजत्व परतें ठेवी / मी अव्यक्तपणही नाठवीजे वेळीं धर्मातें अभिभवी / अधर्मु हा // 

ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें / मी साकारू होउनी अवतरें / मग अज्ञानाचें आंधारें / गिळुनी घालीं // अधर्माची अवघी तोडी / दोषांची लिहिलीं फाडीं / सज्जनांकरवीं गुढी / सुखाची उभवी // दैत्त्यांची कुळें नाशीं / साधूंचा मान गिंवशीं / धर्माची नीतीशीं / शेंस भरी //

मी अविवेकाची काजळी फेडुनी / विवेकदीप उजळीतैं योगियां पाहे दिवाळी / निरंतर //“ 

स्वसुखें विश्व कोंदी / धर्मुचि जगीं नांदे / भक्तां निघती दोंदें / सात्विकाची // तैं पापांचा अचळु फिटे / पुण्याची पहांट फुटे / जैं मूर्ती माझी प्रगटे / पंडुकुमरा // 

ऐसेसा काजालागीं / अवतरे मी युगी युगीं / परि हेंचि ओळखे जो जगीं / तो विवेकिया // 

माझे अजत्वें जन्मणें / अक्रियताचि कर्म करणे / हें अविकार जो जाणें / तो परममुक्त ! ! !


अजून खूप काही शिल्लक आहे बरं का, सबब तुम्हीही घ्या जराशी विश्रांती

क्रमश:…….

रहाळकर

२७ मे २०२६.    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?