Thursday, October 08, 2026

 

सेवा आणि मेवा !

 सेवा आणि मेवा ! 

अनेक वर्षांपूर्वी संघटनेच्या कामानिमित्त प्रशांतिनिलयम पुट्टपर्थीला चार दिवस गेलो होतो. पूर्वनियोजित दौरा असल्याने जाण्यायेण्याचे रेल्वे आरक्षण कन्फर्म्ड होते. माझे ठरलेले काम संपतांच भजन-दर्शनानंतर माझी झोळी ( होय, तेव्हा ब्याग वगैरे ब्याद नव्हतो बाळगत आम्ही. केवळ एका मोठ्या झोळीत गरजेपुरते कपडेलत्ते असत बरोबर ! ) गणपती मंदिरासमोरील बाकाखाली ठेवून निघण्यापूर्वी पुन्हा मंदिराच्या पायरीवर मथ्था टेकण्यासाठी गेलो. त्या महिन्यांत महाराष्ट्र राज्याच्या स्वयंसेवकांची सेवा सुरू होती. साहाजिकच अनेक स्वयंसेवक ओळखीचे होते. मी परत पुण्याला निघालोय हे पाहून एकाने डॉक्टर तुम्ही आत्तां कसे निघू शकतां, अर्ध्या तासाने स्वामी आंध्रप्रदेशातून आलेल्या डॉक्टरांशी वार्तालाप करणार आहेत, तुम्हाला कोणीच रोखणार नाहीत असे म्हटल्यावर मी माझा कार्यक्रम तात्काळ बदलला आणि चक्क मंदिरांत जमलेल्या शंभर तेलुगु डॉक्टरांच्या समूहात जाऊन बसलो. सर्वच डॉक्टर्स आंध्राईट असल्याने केवळ तेलुगू भाषेत स्वामींचे उद्बोधन झाले - नो इंग्लिश ट्रान्सलेशन ! कदाचित मन लावून ऐकल्यामुळे मला ते व्याख्यान नव्वद टक्के समजले. डॉक्टरांनी ग्रामीण भागात कशी सेवा करायला हवी यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन होते ते. 

व्याख्यान संपल्यावर परिपाठानुसार स्वामी सर्व श्रोत्यांच्या रांगांतून अतिशय संथ गतीने चरणस्पर्ष करू देत फिरत असताना सर्वात मागे बसलेल्या माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे पाहात हिंदीतून विचारले, ‘किधरसे आया’ आणि ‘स्वामी पूनासे’ असे म्हणताच अभयहस्त दाखवीत मला म्हणाले, ‘सेवा करेगा तो मेवा मिलेंगा’ ! 


नंतर लगबगीने झोळा घेऊन बाहेर पडलो त्यावेळी बराच उशीर झाला होता, माझी ट्रेन कधीच निघून गेली होती. मी धडपडत बसेस बदलत बदलत कसाबसा संध्याकाळी गुंटकल् ला पोहोचलो. प्लॅटफॉर्मॉर्मवर मद्रास एक्सप्रेस लागली होती. रिझर्वेशन नसल्याने जनरल बोगी गाठली. बोगींत तुफान गर्दी. मात्र तेवढ्यात एक खेडूत खाली उतरला नि म्हणाला समोरचा वरचा बर्थ रिकामा आहे, इतका वेळ मी झोपून आलो, आता तू तेथे जाऊन झोपू शकतोस मला इथेच उतरायचे होते ! 


मंडळी, एक रिझर्वेशन गमावल्यावर जनरल बोगींतल्या तुफान गर्दींत आख्खा बर्थ मिळणे याला तुम्ही मेवा म्हणाल ना ?

रहाळकर

८ ऑक्टोबर २०२६.    


Tuesday, October 06, 2026

 

चाय चाय चाईsय्य् !

 चाय चाय चाईssय्य् ! 

मुंबईहून इंदोरला जाताना देहरादून एक्स्प्रेस पहाटे पहाटे रतलाम नागदा ही स्टेशन्स घेत असे नि सर्वप्रथम जाग येई ती वरील आरोळ्यांनी. धडपडत उठून आधी त्या चायवाल्याला हाक मारून गरमागरम मसाला चाय ओठीं लावल्याशिवाय प्रवास पूर्ण झालाच नाही कधी ! होय, मला सर्व प्रकारच्या चहाचे कौतुकच नव्हे तर चक्क क्रेझ आहे. खूप मागे एकदा डॉक्टर कल्याणपुरकरांनी गीतेतला एक श्लोक म्हणत श्रीकृष्णालाही चहा कसा प्रिय होता हे त्यांच्या विशिष्ट विनोदी शैलींत सांगितले होते. त्यावेळी मला गीतेचा गंधही नव्हता तरी पण कदाचित् म्हणूनच तो श्लोक मला चहामुळे भावला होता. ‘सर्वस्य चाsहं विधि संन्निविष्टो’ वगैरे ! श्रीकृष्णाला  माझ्यासारखाच सर्वांना चहा अतिप्रिय आहे असे त्यांनी केलेले भाषांतर मला तेव्हा पटले होते. त्या डॉक्टरांना कोणीही कधीही भेटायला आले की चहाची ऑर्डर ठरलेलीच. ते सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही त्यांना पन्नास कप चहा मावेल एवढी स्टेनलेस स्टीलची तोटीवाली कोठी भेट म्हणून दिली होती ! असो. 


मंडळी, आजचे निरूपण निव्वळ चहावर असणार आहे सबब आपापले कप सज्ज ठेवावे ही विज्ञापना ! 


इंदौरला पारशी मोहल्याच्या नुक्कडवर जीपीओ समोरच्या एका भल्या मोठ्या दुकानांत चायवाले मास्टरजींनी ‘चाय की दुकान’ थाटले होते. पांढराशुभ्र लांब बाह्यांचा शर्ट नि पायजमा, चेहरा कायम हंसतमुख नि येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाइकाचे तोंड भरून स्वागत ही मास्टरजींची खासियत होती. त्या मोठ्या दुकानांत किमान दहाबारा पाठीची बांकडी होती जी सहसा गिऱ्हाइकांनी भरलेली असत. मास्टरजी दुकानाच्या मधोमध बसत, समोर मोठ्या प्रायमस स्टोव्हवर मोठी केटली नि शेजारीच तयार चहाची दुसरी मोठी केटली. एकच प्रकारचा नि एकाच चवीचा चहा मोठाल्या पांढऱ्या शुभ्र कपबशींत स्वत: ओतून देत मास्टरजी. खारी, बिस्किटें वगैरे काहीही नाही, निव्वळ फक्कड चहा. किंमतही अतिशय वाजवी, केवळ चार आणे. मात्र चहा पिऊन होताच त्वरित बांक रिकामा करणे ही अलिखित शिस्त होती. राजकारण आणि सिनेमाच्या गप्पा नकोत असा ताकीदवजा बोर्ड ठळकपणे असायचा तिन्ही भिंतींवर. तेथून आमचे कॉलेज हांकेच्या अंतरावर असल्याने तिथे आम्हा विद्यार्थ्यांचाही कायम भरणा असे. 

सिनेमाचा सेकंड शो पाहून आल्यावर मला सहसा अभ्यास करण्याची सुरसुरी येई. मात्र त्याआधी कडक मीठी चाय तो बनतीही थी ! 

पुण्यात आल्यावर दुसऱ्याच दिवसापासून ‘अमृततुल्य’ ची चटक लागली पण इवलेसे जस्ट अर्धेअधिक भरलेले कप पाहून भ्रमनिरास देखील होई. इतर रेस्टरांमध्ये इंदौरसारखे ‘ट्रे-टी’ क्वचित् दिसत मात्र टपरीवरचा नाशिकचा ‘कटिंग चहा’ नेहमीच भाव खाऊन जाई. आतां पुण्यात ठिकठिकाणी विविध गावांच्या नि ब्रॅंडच्या चहांची जणू स्पर्धा लागलेली दिसते, मात्र ‘किवळकरांचा’ चहा किंवा सीटीसी वा ‘पिको सुचांग’ची सर कुठल्याच चहाला नाही. पूर्वीं फक्त ब्रूकबॉंड नि लिप्टन ही नावाजलेली नांवं पण आतां ‘वाह ताज’, ‘वाघबकरी’ वगैरेही भाव खातात म्हणे. 

‘डिप डिप’ व्हरायटीत मला तरी ‘टेटली किंवा पीजी’ भावतात, तथापि गरमागरम वाफाळणारा चहा कुठलाही असला तरी हवाच असतो बरं का, त्यातून कुणी परस्पर तयार करून आणला असेल तर ! 

रहाळकर

६ ऑक्टोबर २०२६ 


This page is powered by Blogger. Isn't yours?