Saturday, June 06, 2026

 

स्मित आणि हास्य !

 स्मित आणि हास्य

आज गॅलरीत बसलो असताना सहज विचार आला की परमेश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण करताना त्यांत किती किती विविधता भरून ठेवली आहे नै ! कोणतेही दोन चेहेरे कधीही सेम टु सेम नसतात आणि प्रत्येक चेहेऱ्यावरचा भाव किती वेगळा होत असतो क्षणोक्षणी. तथापि काही चेहेरे कायम त्रासलेले, काही दुर्मुखलेले, काही शांत प्रसन्न तर काही उच्छृंकल, हावरट वाटावे असे. काहींवर मंद स्मित कोरलेले तर काही कित्येक अर्थ काढता येतील असे मोनालिसा सारखे ! काही कायम रागीट भासणारे तर काही मातेप्रमाणे स्निग्ध नि सोज्वळ


मला मोटार गाड्यांचा विलक्षण छंद होता बालवयापासूनच हे अनेकवेळा सांगून झाले आहे. त्याचे मूळ कारण आत्तांच लक्षात आले आणि ते म्हणजे प्रत्येक मोटारीचा मुखवटा ! काही गाड्यांची चेहेरेपट्टी मला जास्त आवडायची, त्यातल्या त्यांत हसऱ्या-बुजऱ्या दिसणाऱ्या, जशा मॉरिस मायनर, ऑस्टिन, प्रिफेक्ट फोर्ड, व्हीएट फोर्ड, शेव्हरलेट नि वूल्सले. मात्र डॉज, प्लायमाऊथ, स्टुडबेकर आणि मर्सिडीज काहीशा रांगड्या नि रागीट भासत ! तुम्हाला सांगतो, त्या मोटारींच्या फ्रंट व्ह्यू वरून मी सहज तिचा मेक किंवा ब्रॅंड ओळखायचो. काहींची बॉनेट्स आणि फ्रंटेज विलक्षण गोंडस वाटायचे मला. हीच गोष्ट पाळीव प्राण्यांची. एखाद्या कुत्र्याचं किंवा मांजराची चेहेरेपट्टी खूप गोड वाटायची तर काहींची भ्यासुर ! मात्र एक बाब बालपणीच लक्षात आली तुम्हाला सांगतो की माणसासारखीच जनावरांची पिल्लें देखील लहानपणी खूप गोंडस दिसतात, अगदी कोंबडी किंवा गर्दभाची पण


तरीही, ज्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य झळकत असते त्यावर कुणाचाही जीव जडत असतो. एकेकाळी रघुवीर मुळगावकरांची चित्रें खूप मन-लुभावनी वाटत, मग तीं राम-कृष्णांची  असोत की मारूतीरायांची. मला वाटतं त्यांनी रावण, शूर्पणखा, घटोत्कच किंवा हिडिंबेची चित्रे म्हणूनच काढली नसावीत कारण तिथे स्मितहास्य कसे दाखवणार, तिथे केवळ बीभत्स हास्याचा गडगडाट


तुम्हाला म्हणून सांगतो, ‘एकेकाळीकाही नटनट्या खूप आवडत मलामला स्पष्ट आठवतेय एक नटी कामिनी कदम नावाची जी सिनेसृष्टीत स्मिता म्हणून काही काळ वावरली. तेव्हा रेखाचित्रा, जयश्री गडकर, उषा किरण, उषा चव्हाणपद्मा चव्हाण वगैरे सौंदऱ्यवती असल्या तरी सुलोचना रत्नमाला वगैरे बऱ्यापैकी सोज्वळ चेहेऱ्यांच्या नट्या अस्तित्वात  होत्या, तरी कामिनी कदमचे शॉर्ट पदार्पण लोभस वाटले होते खास ! इंदिरा चिटणीस खाष्ट असूनही आवडायच्या. पुरूष नटांबद्दलही किंचित बोलणे वावगे वाटू नये म्हणून केवळ ! रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर, विवेक अभ्यंकर वगैरे देखणे असले तरी दामुअण्णा, धुमाळ, सूर्यकांत-चंद्रकांत वगैरे मातब्बर आणि मधु आपटे हा तोतरा नट भाव खाऊन जायचा. असो


अखेर प्रत्येक व्यक्तीची चेहेरेपट्टी त्याच्या अंतरंगाचे प्रतिबिंब असते असे म्हटले तरी कित्येकजण जाणीवपूर्वक ते लपवून खोटे हंसू दाखवीत असतातटीव्हीवरच्या  बाबा-बुवांसारखे. अर्थात ते नाटकही फार काळ टिकत नसते हेच खरे


अखंडित प्रसन्नता अंगीं बाणवण्यासाठी खूप मशक्कत करावी लागते बरं का ! मुळात तसा पिंड असावा लागतो. प्रसन्नता कुणी कुणाला देऊ शकत नाही खिरापतीसारखी, ती स्वत:  मिळवावी लागते. तुम्हाला पुन्हा सांगतो, ते प्रयत्नसाध्य आहे


आत्तां अचानक माऊलींची ओंवी आठवली- ‘देखें अखंडित प्रसन्नता / आथी (आहे) जेथ चित्ता / रिगणे नाही (उद्भवत नाही) समस्तां / संसारदु:खां //‘ म्हटलेच आहेप्रसादस्तु प्रसन्नता’ - प्रसन्नता किंवास्मित-हास्यहाच प्रसाद होय


खूप खूप विषयांतर होत गेलंय ना, साहाजिकच आहे, वयं मोठं खोटम् ! !

रहाळकर

जून २०२६


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?