Wednesday, June 10, 2026
‘ख-पुष्प’ दुसरें (दासबोध’
‘ख-पुष्प’ दुसरे……!
प्रत्यक्ष दासबोध या महान ग्रंथाचा मागोवा घेण्याआधी तत्कालीन लोकस्थिती कशी होती हे जाणून घेणे सयुक्तिक ठरेल. खरंतर तो काळ अतिशय आणिबाणीचा होता. भारतीय समाज आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झाला होता. एक भिन्न संस्कृती असलेली परधर्मीय (मोगल) राजसत्ता पाय रोवून उभी होती. वास्तविक पाहतां ब्राह्मणवर्ग परंपरेने भारतीय समाजाचा बौद्धिक पुढारी होता, मात्र तोच आचारभ्रष्ट आणि विचारभ्रष्ट झाला होता. त्याग, नि:स्पृहता आणि तपश्चर्या विसरून ते अतिशय स्वार्थी बनले होते. क्षत्रिय समाज शौर्य, वीर्य, पौरूष आणि पराक्रम यांचे प्रतीक असायचा. मात्र शूर क्षत्रीय धर्मश्रद्धा विसरले नि यवनांच्या सेवेद्वारें स्वार्थ साधण्यांत धन्यता मानूं लागले. समाजातील धनिक व्यापारी वर्ग अघिकारी व्यक्तींशी अत्यंत लाचारीने वागून स्वत:ची तुंबडी भरत होता. त्याचप्रमाणे सर्व समाजांत अनेक प्रकारची सोंगे ढोंगे, नास्तिकपणा, वाह्यात तर्कटीपण आणि बुवाबाजीला तर जणू ऊत आला होता. खरा धर्म आणि परमार्थ लोपल्यासारखा झाला होता. समाजात अनेक प्रकारच्या दुष्ट आणि विध्वंसक प्रवृत्ती प्रकट झाल्या आणि त्यांना रोखणे दुरापास्त झाले होते. तीर्थक्षेत्रें भ्रष्ट करणे, बायका-पोरांना बाटवणे, बायकांना पळवून नेणे नि त्यांना भ्रष्ट करून गुलाम बनवणे, व्यापाऱ्यांना लुटून मारून टाकणे ; चोऱ्या दरोडे, जाळपोळ, भयंकर क्रूर शिक्षा, गांवेच्या गांवे बेचिराख करणे, सामुदायिक कत्तल अशा मानवतेला लाज आणणाऱ्या घटना रोज कानांवर आदळत. शिवाय वारंवारच्या दुष्काळांनी त्यांत भर घातली. लोक कसेतरी जगून कालक्रमणा करत होते.
जनतेची अशी हीनदीन अवस्था पाहून समर्थांचे दयामय अंत:करण कळवळले, म्हणून एकान्तांत राहून आत्मचिंतन करण्याची विलक्षण आवड असलेला हा महात्मा आपली आवड बाजूला सारून लोकसंग्रहार्थ, लोककल्याणासाठी जनतेमध्ये मिसळला.
श्रीसमर्थांनी ‘राज्य-क्रांतिशिवाय समाजक्रांती नाही आणि समाजक्रांतीशिवाय धर्मक्रांती घडवून आणता येणार नाही’ अशी खूणगाठ आपल्या मनाशी बांधली. सुदैवाने त्याच सुमारास महाराष्ट्रामध्ये शिवाजीराजे मोठ्या हिंमतीने आणि नि:स्वार्थपणे राज्यक्रांती घडवून आणण्याच्या धाडसी उद्योगात गुंतले होते. त्यांच्या कार्याला शंभर टक्के जनतेची साथ मिळावी म्हणून श्रीसमर्थ एक नवा ध्येयवाद घेऊन पुढे सरसावले. त्यांत त्यांचे दोन हेतू - एकतर आपल्या राज्यातील लोकांना सुखासमाधानाने, निर्भयपणे जगतां यावे यासाठी राजाने राज्य चालवावे आणि प्रजेला सुखी ठेवण्यासाठी राजा एका अर्थाने ‘बैरागी’ असायला हवा, राजा ‘राजर्षी’ हवा, तो उत्तम पुरूष असावा आणि दुसरे - स्वराज्यामध्ये निर्भयपणे नि सुखाने जगण्यासाठी लोकांनी आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करायला हवी ; जीवनांतील उच्च मूल्यें आणि परमार्थ साधण्याच्या दृष्टीने समाजासाठी समर्थांनी एक नवा ‘संन्यासी संप्रदाय’ सुरू केला. त्यांचा ‘महंत’ हा प्रथम भक्त आणि नंतर समाज-नेता बनतो. त्याचे ‘पुढारीपण’ ‘समाजकारण’ आणि ‘राजकारण’ आध्यात्माच्या म्हणजेच धर्म आणि नीतीच्या भक्कम पायावर उभे असल्याने त्याच्या जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुरेख संगम आढळतो.
आणि याच हेतुने श्रीसमर्थांनी ठिकठिकाणीं मठ-स्थापना केली. समर्थांचा मठ म्हणजे लोकसंघटनेचा केंद्रबिंदू बनला ; प्रत्येक रामदासी महंताच्या जीवनाला एकीकडे आध्यात्माचे आणि नीतीधर्माचे अंग होते, तर दुसरीकडे समाजसेवेचे आणि प्रसंग पडल्यास राजकारणाचे अंग होते. त्यांच्या हातून समाधानकारक ‘लोकसंग्रह’ झाला आणि भारतीय समाज संकटमुक्त झाला ! ( लोकसंग्रह म्हणजे निव्वळ कित्येक लोकांना एकत्र आणणे नसून त्यांना आध्यात्मिक, समाजाभिमुख, सक्रिय स्वयंसेवक बनवणे होय, हे जाताजातां नमूद केलेले बरे ! समर्थांचा महंत हा ‘आधी केले मग सांगितले’ या कॅटेगरीतला बरे का ! ) असो.
पुढील भागात श्रीसमर्थांच्या अमाप उदंड वांग्मय-निर्मितीचा थोडक्यात आढावा घेऊं, तोंवर क्षणभर विश्रांती !
रहाळकर
१० जून २०२६