Thursday, September 17, 2026
आईये पधारिये बिराजिये !
आईये पधारिये बिराजिये !
मंडळी, या वरील शब्दांनी उत्तर हिंदुस्थानांत सहसा पाहुण्यांचे आगतस्वागत केले जाते. आपण नाही का ‘अरे व्वा, या या आत या, बसून घ्या म्हणत त्यांना पाचारण करतो. बंगालींत म्हणतात ‘आशून’ तर इंग्रजींत ‘हाय, वेलकम्, बी सीटेड’ असे स्वागत होते. मुळात पाहुण्यांनी घरात यावे नि त्यांचे स्वागत करावे हा सुसंकृत घरातला परिपाठ असला तरी त्यासाठी आपला दिवाणखाना किंवा बाहेरची खोली नीटनेटकी, टापटिपीची असल्याची काळजी घेतोच ना आपण ! त्यासाठीं शोभेच्या वस्तू, चांगली आसन-व्यवस्था, गरज असल्यास पंखा वगैरे सोपस्कार तर सहज घडत राहतात प्रत्येक घराघरातून.
मुळात पाहुणे घरीं यावेत, त्यांचेशी मनमोकळा संवाद घडावा आणि काही काळ तशा वातावरणांत मश्गूल राहावेसे आपल्याला वाटतेच ना. मात्र काही मंडळी दारात उभे राहून बोलण्याचे पसंत करतात. नाही, आत नाही येत मला लवकर पळायला हवे म्हणत चक्क अर्धाअर्धा तास आपल्यालाही ताटकळत ठेवतात, हे कुणालाच आवडणारे नसते. तथापि आपलाच सुसंकृतपणा आडवा येतो नि आपण तो जुलूम सहन करत राहतो. कित्येकांना घरात शिरताच आपापले फोन पाहण्यांत अधिक स्वारस्य जाणवते नि अशा वेळी तो पाहुणा नकोसा वाटू लागतो खरोखर !
या निमित्त देशपांडे काकांनी सांगितलेला एक किस्सा आठवला. त्यांचा एक जुना परममित्र असलेला शाळूसोबती अचानक दाराशी आला आणि मी आठवडाभर रजा घेऊन आलोंय्, तुझ्याकडेच राहणार आहे असे त्याने म्हणताच काकांना विलक्षण आनंद झाला. दोघांच्या गप्पा जुने सवंगडी नि मास्तरांवर मनसोक्त झाले. आयुष्यात मी कसा यशस्वी होत गेलो ते त्याने आवर्जून कथन केले. साहाजिकच काकांनाही ते सर्व आवडले. मात्र दोनच दिवसात या मित्राच्या एकंदर वावरण्यातून तो अजूनही चांगलाच गावंढळ आहे हे लक्षात आले. वॉश बेसिनवर तोंड धुताना उभ्या उभ्या चूळ टाकणे, जोरजोरात खाकरणे नि शिंकरणे, ओल्या कपड्यांचे ‘ळ’ वगैरेंमुळे घरातले सर्वजण चांगलेच वैतागलेले नि आता हा बालमित्र कधी जातो इकडे सर्वांची भावना झाली. असो.
मात्र आमच्या सदगुरूंची कहाणी अगदी वेगळी होती. ते ज्या ज्या घरांत मुक्कामास जात तिथे ते सर्वांशीच अतिशय मायेने नि प्रेमपूर्वक व्यवहार करीत. पूर्वायुष्यात आदर्श स्वयंसेवक असल्याने त्यांचे राहाणीमान अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि हवेहवेसे असे. घरातील गृहिणींशीही ते अतिशय आत्मीयतेने वागत, स्वयंपाकांत चक्क मदत करायला सरसावत. सुरेख पैकी भाज्या निवडून कापण्यापर्यंत अतिशय सहजपणे वावरत. नवनवीन चटण्या कोशिंबिरींच्या ‘रेसिपी’ सांगत. घरातील सर्वांशीच सौहार्द्रपूर्ण वागत त्यांना आपलेसे करून घेत आणि परत निघण्यापूर्वी एखादे स्व-रचित काव्य किंवा भजन अतिशय शांत मधुर स्वरात गात असत. मुक्कामी पोहोचताच घरीं केलेल्या सरबराईचे नि आतिथ्याचे कौतुक करणारे पत्र धाडीत !
मंडळी, दोन्ही प्रकार तुम्हाला कथन केले. मला सांगा, दुसरा प्रकार केवळ अनुकरणीय नाही काय ?
रहाळकर
१७ सप्टेंबर २०२६
( अजूनही तळेगाव मुक्कामी ! )