Sunday, August 16, 2026
पॉकेट कॅफे !
पॉकेट कॅफे !
गेले पाचसहा दिवस लेकीकडे जाऊन, तूपरोटी खाऊन, (अधिकच) धष्टपुष्ट होऊन आज पुन्हा बावधन महानगरांत स्थानापन्न जाहलो. तळेगाव नजिकचे तिचे ‘सुकून’ निवासस्थान खरोखरच खूप खूप सुकून देणारे, चित्तवृत्ती उल्हसित करणारे आणि जगातल्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे आहे. विश्वास बसणार नाही कुणाचा पण तिथे चक्क बोचरी थंडी होती अगदी पाचगणी महाबळेश्वर सारखी. सतत पावसाळी हवामान, सर्वदूर हिरवेगार, नव्हे हिरव्याच्या कित्येक छटा पाहून मन नि डोळे तृप्त तृप्त झाले. घरीं ददुकल्ल्या मदुकल्ल्या चरणे चालू असतानाच नजिकच्या कित्येक नवीन फूड-जॉईंट्सवरही चांगलाच डल्ला मारला गेला. किती किती आठवडे आम्ही घराबाहेर पडत नसल्याने जांवईबापूंनी पवनेच्या खोऱ्यांत मनसोक्त फिरवून आणले. दुपारी अस्सल गावरान पिठलंभाकरीचा लुत्फ उठवल्यावर संध्याकाळी गेलो ‘पॉकेट कॅफेत, या लेखाच्या शीर्षकस्थानीं ! ओह, दॅट हॅपन्न्ड टु बी दि आयसिंग ऑन केक. सुपर्ब, खूप खूप आवडली ही कॅफे. मुळांत माझ्या आवडीची सगळी सगळी कॉन्टिनेंटल व्यंजने, शुद्ध शाकाहारी आणि विलक्षण चविष्ट ! खरंतर म्हणूनच तुम्हाला चिथावणी देतोय् या छोट्याशा स्फुटातून, पहा जमलं तर घ्या तुम्हीही तो अनुभव. कुठेसं आहे विचारताय् ? अहो, तळेगाव शहरात शिरण्यासाठी जी मोठी कमान लागते ना, त्याच कोपऱ्यावर. लहानशी टुमदार पण उत्तम ॲम्बियन्स भेटेल तुम्हाला आत शिरताच. तिचा मालक आहे एक अतिशय उमदा, मनमोकळा, उच्चशिक्षित तरूण, पाच वर्षें अमेरिकेत वास्तव्य करून आलेला. कॅफेतील व्यंजनांचा आनंद तर मिळालाच पण या तरूणाशी झालेले अल्प संभाषणही सुखावून गेले ! यस्, मी मनापासून शिफारस करीन या कॅफेची ! !
रहाळकर
१६ ऑगस्ट २०२६