Sunday, August 09, 2026
सूटबुटातले ऋषी !
सूटबुटातले ऋषी !
आमची आख्खी पीढीच अतिशय भाग्यवान म्हणायला हवी ज्यांनी आपल्या आयुष्यांत अनेक ऋषितुल्य मंडळी पाहिली, ऐकली नि वाचली देखील. आमच्या आधीच्या पीढ्यांनी कदाचित् पुणेरी पगडी, फेटा किंवा पांढऱी शुभ्र टोपी वापरणारे सानेगुरूजीं सारखी ऋषितुल्य मंडळी पाहिली असतील, हिरवी टोपी परिघान करणारे विनोबा भावे किंवा केवळ कोट नि पॅंट घालणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचेशी संवाद देखील घडला असेल. माझ्या पुरते बोलीन म्हटले तर मी सूटबूट नेक् टाय वापरणारे कित्येक आधुनिक ऋषी पाहिले आहेत, अगदी डझनावारी !
शाळेंत शिकत असतानाचे अतिशय निर्धन, धोतरावर असंख्य गाठी नि कोटावर ठिगळें लावलेल्या बुचडे सरांसारख्या ऋषितुल्य शिक्षकांपासून कॉलेजमधील सूट नि टाय् वापरणारे कित्येक प्राध्यापक अजूनही स्मरणांत आहेत आणि त्यांची नुसती आठवण झाली तरी डोके आपसूक नतमस्तक होते, मनोमन त्यांना वंदन घडते आणि कृतज्ञताभाव सहज उफाळून येतो.
अदमासें पंधरावीस वर्षांपूर्वी लंडनच्या सायन्स म्यूझियम मध्ये अल्बर्ट आईन्स्टीनचे वेषांत एका मस्खऱ्याचा ‘शो’ पाहिला होता ज्याने त्या महान शास्त्रज्ञांचे हुबेहूब व्याख्यान साभिनय सादर केले होते. वास्तविक खरा आईन्स्टाईन पंचावन्न सालींच निवर्तलेला, पण त्याचे सोंग घेणाऱ्यालाही मनोमन वंदन केले होते मी !
होळकर कॉलेजमधील इंग्रजीचे दोन्ही प्राध्यापक, प्रो. गोळे आणि प्रो. सुळे कायम सूटबुटांत असत- एक ‘प्रोझ’ शिकवीत तर दुसरे ‘पोएट्री’ नि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ ! दोघेही मराठी असूनही इंग्रजीवर केवळ प्रभुत्व आणि भाषाशैलीमुळे कदाचित इंग्रजांनाही मागे टाकतील असे होते. मला मराठी वांग्मयावर प्रेम करायला शिकवले ते चौधरी नि पांढारकर मास्तरसाहेबांनी तर इंग्रजीवर या वरील दुकलीने !
मेडिकलला आल्यावर प्रोफेसर एम् एम् माथुर, प्राचार्य बी सी बोस, प्रोफेसर जंगालवाला आणि प्रो. पोहोवाला ही ऋषितुल्य मंडळी अक्षरश: खिळवून ठेवीत त्यांचे व्याख्यानां दरम्यान ! डॉ. मुखर्जी आणि डॉ. कुंटे असेच निष्णात भेषक आणि ऋषी देखील.
पुढे पुण्यात आल्यावर सूटबूट न वापरणारी थोर थोर मंडळी पाहिली ऐकली ज्यांत एस्सेम जोशी, नानासाहेब गोरे, बाळासाहेब भारदे, वि.स.पागे, मोहन धारिया, स्वामी माधवनाथ, गोपीनाथ तळवलकर, कर्नल सोमण, डॉ.चक्रपाणी जोशी प्रभृतींचा आदरपूर्वक उल्लेख अत्यंत आवश्यक ठरतो. अजून कित्येक नावें नि व्यक्ती नजरेपुढून हलायला तयार होत नाहीत ज्यांत अकोल्याचे डॉ.भागवत, सर्वश्री पोहनेरकर काका, देशपांडे काका इत्यादींचा नामनिर्देश अत्त्यावश्यक ठरतो !
मंडळी, सूटबुटातली असोत वा नसोत, वरील सर्व दिग्गज केवळ ऋषितुल्य नव्हेत काय ?
रहाळकर
९ ऑगस्ट २०२६ (ऑगस्ट क्रान्किदिन ) ! !