Saturday, August 01, 2026
इंटीरियर डेकोपेशन ! आतली सजावट !
इंटीरियर डेकोरेशन - आतली सजावट !
माझ्या तीर्थरूपांना घरातली सजावट अधून मधून बदलण्याची हौस होती. अगदी दौऱ्यावर असतांना देखील तेथील डाकबंगल्यात ते सर्वप्रथम पूर्व-पश्चिम अशी भिंत किंवा कोपरा पाहून तिथे एक टेबल लावायला सांगत, त्यावर स्वच्छ शुभ्र टेबल क्लॉथ अंथरून आधी गणपती, दत्तात्रेय आणि त्यांच्या मातोश्रींचा सुरेख नक्षीकामाची लांकडी फ्रेम असलेली तसबीर जमवून ठेवीत. तिथल्या बागेतील सुंदर फुलें वेचून या तिन्ही तसबिरींना छानपैकी सजवत असत आणि मगच चहाफराळ वगैरे सोपस्कार सुरू होत.
मला आणि ताईला आमच्या घरीं स्वतंत्र खोल्या होत्या आणि आपापली खोली स्वच्छ नि नीटनेटकी ठेवण्यावर वडिलांचा कटाक्ष असे. आम्ही दोघे आपापल्या खोल्या अधूनमधून ‘स्वॅप’ किंवा अदलाबदल करत असूं. कपाटे मात्र वह्यापुस्तकें आणि कपड्यांनी चक्क ‘कोंबलेलीं’ ! असो.
माझ्या मुलांनाही घराची छान सजावट करण्याची जणू चढाओढ असते. मी मात्र हल्ली हल्ली ते वरचेवर करीत असतो हे तुम्ही पाहिले आहेच. माझा तो सांप्रतचा विरंगुळा म्हणा हवं तर !
तथापि मला आज या ‘इंटीरियर डेकोरेशन’ किंवा आतली सजावट यावर जरासे वेगळे भाष्य करायचे आहे. मंडळी, मागे मी ‘मिल्यू इंटीरियर’ किंवा शरीराच्या अंतरंगातल्या वातावरणाचे शरीर-शास्त्रानुसार केलेले वर्णन तुम्हाला कदाचित् आठवत असेल. आज जरा शरीराच्याही कितीतरी आंत, अगदी प्राणमय मनोमय विज्ञानमय नि आनंदमय कोषांच्याही पलीकडे जे काही ‘असेल’, त्यावर विचार करीन म्हणतो. वास्तविक या पंचकोषांच्या अलिकडे, पलीकडे आणि सबाह्यअंतरंग व्यापून असलेले एकुलते एक परब्रह्मच वसत असले तरी ते पंचकोष सुद्धा समजून घ्यायला हवेच ना !
डोन्ट वरी, त्यांवर खूप काही सांगायची माझी पात्रता नाही म्हणून त्यांना चक्क बगल देऊन मी असे म्हणेन की जेवढी बाह्य सजावट महत्वाची त्याहून कितीतरी पटींनी अधिक अंतर्गत सजावट विशेष महत्वाची.
काही अतिशय जुजबी, किरकोळ बाबी असतात पण त्यांचेकडे जाणीवपूर्वक पाहता आले तर आपले व्यक्तिमत्व हवेहवेसे घडू शकेल. कोणालाही प्रसन्न हसरा चेहराच पाहावासा वाटतो, दुर्मुखलेला त्रासिक रागीट चेहरा कुणालाच आवडत नाही. मात्र चेहऱ्यावर विलसणारे प्रसन्न हास्य हे आतल्या सजावटीचे प्रतिबिंब असते हे विसरून चालणार नाही. बळेबळें हंसणे हे निव्वळ नाटक होय हे कुणाच्याही सहज लक्षात येते. माऊलींची एक झकास ओंवी आहे - ‘देखें अखंडित प्रसन्नता, आथि जेथ चित्तां, तेथ संसार-दु:खां समस्तां, ठाव नाही’ ! दुसरे कुणी म्हटलंय्- ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सुखासी कारण’ ! मनाची प्रसन्नता हेच ते इंटीरियर डेकोरेशन !
आतां, ही ‘प्रसन्नता’ कशी मिळवायची, कुठे मिळेल ती ? नो, ती मिळवायची नसून ती आपसूक प्रकट होईल, जेव्हा माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या सहा शत्रूंना एकएक करीत हद्दपार करीन तेव्हाच ! त्या बेट्यांना नेस्तनाबूत करण्यासाठीच तर आपण विविध साधनांच्या मागे लागतो ना ! ते सर्व एकेक करीत बाहेर पडत गेले की प्रसन्नता, शांती, प्रेमाचा घडा हळूहळू भरूं लागेल जो निव्वळ चेहऱ्यावर न दिसतां आसमंत व्यापू शकेल !
त्या षडुरिपूंचा कबाडा बाहेर टाकून आपापले अंतरंग छानपैकी सजवणे, एम्बेलिश करणे हाच मूळ परमार्थाचा भक्कम पाया होय.
रहाळकर
१ ऑगस्ट २०२६