Tuesday, July 14, 2026
मोहन रेगे !
मोहन रेगे !
माझा होळकर कॉलेजमधला मित्र मोहन रेगे. तो नर्मदेचे नाभिस्थान म्हणतात त्या नेमावर नजीकच्या खातेगांवचा. त्याची आई तो खूप लहान असतानाच निवर्तली मात्र वडिलांनी दुसरा विवाह न करता त्याला वाढवले. ते स्वत: खातेगांवच्या पोस्टऑफिस बाहेर बसून लोकांची पत्रें मनिऑरडरी लिहून देण्याचे काम करीत. साहाजिकच विलक्षण दारिद्र्यात दिवस काढले होते मोहनने. मात्र शाळेत खूप हुषार असल्याने त्याला नादारी, शिष्यवृत्ती वगैरे मिळून त्याने इंदूरच्या होळकर महाविद्यालयांत प्रवेश मिळवला होता.
माझी त्याची ओळख पहिल्याच आठवड्यात झाली आणि त्याचा विलक्षण अंतर्मुख स्वभाव पाहून आमची लवकरच दोस्ती झाली. कॉलेज सकाळी आठला सुरू होई, सबब मी बरेच वेळा नाष्टा कॉलेजच्या कॅन्टीन मधे घेत असे. मोहनजवळ पैसे नसतात हे ध्यानांत येताच माझी आई मला जादा पैसे देऊन मोहनलाही कॅन्टीनमधे नेत जा असे म्हणाली. मग जवळजवळ दररोज चहा नि पोहे हा नाष्टा आम्ही दोघे घेत असूं.
हा मोहन विलक्षण अभ्यासू आणि शांत प्रकृतीचा, मात्र तो लायब्ररींत जगाचे नकाशे आणि विविध देशांवरील पुस्तकें वाचण्यांत खूप रस घ्यायचा. मला एकदोनदां म्हणालाही की प्रभू, मी जग फिरून येणार आहे !
होळकर कॉलेज सुटल्यावर आमची फारकत झाली, दोघांनीही वेगवेगळे मार्ग निवडले. खूप वर्षांनी मी पुण्यात आल्यावर एकदा त्यांची माहिती मिळाली. त्याने कॉलेज सोडल्यावर एका ट्रॅव्हल कंपनीत कारकून आणि कुरिअर बॉय म्हणून काम केले. मात्र त्याच कंपनीचा तो कालांतराने मालक झाला. इंदौर-मुंबई अशी दररोजची टॅक्सीसेवा त्याने सुरू केली. दोन ॲम्बॅसेडर कार्स दररोज संध्याकाळी सहाला इंदोरहून निधत आणि पहाटे सहाला मुंबई ‘टच्’ ! (कुणीतरी त्याचेपाशी तक्रार केली की तुमचे ड्रायव्हर्स फार रॅश चालवतात गाड्या तर तो त्यांच्यावरच डाफरला होता, ‘ए, वो ड्रायव्हर नही, पायलट् हैं मेरे’ !
त्याने आपल्या ‘पवन ट्रॅव्हल्स्’चा खूप विस्तार केला, चाळीस पन्नास बसेस आणि तितक्याच टॅक्सीज देखील. त्याने जगप्रवास केला असणारच, मात्र खूप खूप वर्षांनी त्याच्या पळशीकर कॉलनीतल्या बंगल्यावर त्याला भेटल्यावर कडकडून मिठी मारत म्हणाला, प्रभू वो चायपोहे का नाष्टा अभीतक भुला नहीं पाया मैं ! !
रहाळकर
१४ जुलाय २०२६.