Thursday, July 30, 2026
गावाकडचं जोशी कुटुंब !
गावाकडचं जोशी कुटुंब !
आज समोरच्या वहिनी सज्जनगढ, चाफळ, शिवथरघळला भेट देऊन तिथला सर्व वृत्तांत आम्हाला रसाळपणे सांगत होत्या. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेला सज्जनगढ पुन्हा नजरेसमोरून झरझरत गेला आणि आतां तिथे असलेल्या सोयी-सुविधा ऐकल्यावर तर अधिकच संतोष वाटला. बोलण्याच्या ओघात त्या काळातील खेडोपाड्यांचा ओझरता उल्लेख आला आणि समजले की वहिनी मूळच्या मुदखेड या लहानशा गांवच्या. वडिलोपार्जित जमीनजुमला, मोठे कुटुंब आणि त्या वेळचे एकंदर राहणीमान ऐकताना मी अगदी तल्लीन झालो होतो.
तो सर्व वृत्तांत ऐकताना त्या काळातले सोंवळे-ओंवळे, जातीजातीतील तफावत आणि एकंदर स्पृश्यास्पृश्य वर्णन ऐकतांना अंगावर शाहारे आले, खूप बेचैन वाटले. आमचे बालपण शहरांत गेले असल्याने आणि आमचे एकंदर कुटुंब बऱ्यापैकी शिक्षित दीक्षित नि प्रगतीशील असल्याने वरील वृत्तांत जरासा विषण्ण करणारा निघाला.
तथापि त्या काळी सहज दृग्गोचर होणारी संवेदनशीलता, सौहार्द्र आणि कुणालाही मदतीचा हात देणारे संस्कार खेड्यापाड्यांनी कसोशीने जपले हे आपल्या सांस्कृतिक वारश्याचे ठसठशीत प्रमाण आहे. जोशी आणि चौधरी ही घराणीं त्यामानाने अधिक सुशिक्षित आणि सन्माननीय, तर इतर बहुजनसमाज त्या मानाने बराच मागे राहिला. अर्थात सुविद्य समाजाला शहरांची ओढ वाटणे साहाजिकच होते कारण तिथे खूप संधी उपलब्ध असत. या शहरीकरणाने खेडीं मात्र ओसाड पडू लागली आणि आपले गतवैभव हळूहळूं नष्टप्राय होत नवश्रीमंतांची संख्या शहरांपुरती मर्यादित झाली. हे सर्व तुम्हाला माहीत असूनही मी पुन्हा सांगतोय् कारण त्यामुळे मला वाटणारे वैषम्य थोडेतरी कमी व्हायला मदत होईल मलाच. त्याचं असं आहे की मनात आलेले कुणाला तरी सांगितल्यावर फार हलकं हलकं वाटतं बघा !
रहाळकर
३० जुलाय २०२६.