Wednesday, July 22, 2026

 

अष्टावक्र गीता- सूत्र क्र. १५,१६,१७

 अष्टावक्र गीतासार

सूत्र क्र. १५


नि:संगो निष्क्रियोsसि त्वं स्वप्रकाशो निरंजन: / 

  अयमेव ही ते बन्ध: समाधिमनुतिष्ठिसि    //१५//“ 

तू असंग आहेस, क्रियारहित म्हणजेच अक्रिय, स्वयंप्रकाशी आणि दोषरहित आहेस. मात्र ईश्वर-प्राप्तीसाठी समाधीचे तू जे अनुष्ठान करतोस तेच तुला बंधनकारक ठरते आहे


अष्टावक्र मुनी जनकाला सांगत आहेत की आत्म्याचे सर्व गुणविशेष तुझ्यात अनुस्यूतपणे विराजमान असूनही अष्टांगयोगाच्या सर्व पायऱ्या चढून समाधिसुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहेस. तर मग ईश्वरप्राप्तीसाठी या सर्व खटाटोपाची गरजच काय ? हा सर्वच प्रयत्न तुला कर्मफळ देऊन पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला बाध्य करेल. मुळात तू हे शरीर, मन, बुद्धी नि अहंकार नसून पूर्णब्रह्म आहेस हा बोध झाला की समाधिसारख्या अनुष्ठानाची गरज संपते. हाचबोधमुनी देतात


सूत्र क्र. १६

त्वया व्याप्तमिदं विष्वं त्वयि प्रोतं यथार्थत: / 

  शुद्धबुद्धस्वरूपस्त्वं मा गम: क्षुद्रचित्तताम्.  //१६//“ 


हे सर्व विश्व तुझ्यात सामावलेले आहे, तुझ्यातच गुंफलेले आहे. खरेतर तूं चैतन्यस्वरूप आहेस. म्हणून तू स्वत:ला कनिष्ठ दर्जाचा हीन दीन समजू नकोस


आपण सर्व जाणतोच की अहंगंड जेवढा घातक तितकाच न्यूनगंड देखील खूप नुकसान करीत असतो. साहाजिकच दोन्ही त्याज्य होत म्हणून प्रत्येकाने या दोहोंपासून सुटणे अत्यावश्यक ठरते. या सूत्रांत अष्टावक्र मुनी जनकराजाला त्यांचे खरे स्वरूप अतिशय मोजक्या शब्दांत सांगत आहेत


सूत्र क्र. १७

निरपेक्षो निर्विकारो निर्भर: शीतलाशय: /

  अगाधबुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्रवासन: //१७//“ 


तूं अपेक्षारहित, निर्विकार, आत्म-निर्भर आहेस. तूं शांती आणि मुक्तीचे स्थान तसेच अगाध बुद्धिरूप आहेस. तुझी क्षोभ-शून्यता लक्षात ठेव आणि निव्वळ चैतन्यावरच निष्ठा असू देत


हे सूत्र वाचत असताना भगवद्गीतेतला श्लोकअनपेक्ष: शुचिर्दक्ष….’ सहज आठवतो. वास्तविक अपेक्षा आणि विकार हे तर मन नि शरीराचे स्वभाव आहेत तर तहान-भूक हे प्राणाचे ! त्याचप्रमाणे शोक आणि मोह हेही मनाचेच तर व्यापार आहेत ना, आत्म्याचे नव्हेत. आत्मा हा आत्म-निर्भर आहे, कुणावर किंवा कशावरही अवलंबून नसलेला

आत्म्याचे खरे स्वरूप त्याचा निव्वळ साक्षीभाव असतो हे विसरूं नकोस

क्रमश:…..

२२ जुलाय २०२६



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?