Saturday, July 18, 2026
धर्मावरम् !
धर्मावरम् !
मज शब्दवेड्या माणसाला काही शब्द पुन्हा पुन्हा अधिकच पिसें करून सोडतात पहा. अगदी दूरचे कन्नड किंवा तेलुगु तर अधिकच. तथापि मला ठाऊक आहे की मुळात ते मायभवानी संस्कृत मधूनच उत्पन्न झाले असणार. अगदी तसेच ‘धर्मावरम्’ हे आंध्रातल्या ‘अनंतपूरम्’ जिल्ह्याचे तालुका मुख्यालय नि साऊथ-सेन्ट्रल रेल्वेचे एक महत्वाचे जंक्शन स्टेशन.
एकोणीसशे शहात्तर सालीं आम्ही प्रथमच दक्षिणेकडील मोहीम हातीं घेतली होती झुकझुक गाडीतून. सोलापूर सोडतासोडतां अशी काही स्टेशनं लागत गेली ज्यांच्या निव्वळ नावांनीच मी घायाळ होऊ लागलो होतो. होट्टगी, टिकेकरवाडी, अक्कलकोट, गाणगापूर रोड, शाहाबाद, गुलबर्गा, वाडीवाडी नि पुढे मंत्रालयम् रोड, कृष्णा, रायचूर, अदोनी, गुंतकल, गुत्ती, कल्लुरू, अनंतपुरम् नि अखेर धर्मावरम् ! धर्मावरम् पुढे येते ‘हिंदुपूर’ !
इतर मार्गांनी दक्षिण सर करताना ‘घटप्रभा’, गोकाक, चित्रदुर्ग वगैरे नांवें भुरळ घालतात मला. पुट्टपर्थी हे नांव उच्चारायला सुरवातीस कठीण होते मात्र नंतर प्रशांति-निलयम् हे मोठे नावही जिभेवर सतत येऊ लागले. तिथल्ली ‘चित्रावती’ नदी आणि नजिकचे ‘बुक्कापट्टनम्’ नि ‘कोथ्थाचेरूवू किंवा ‘कोच्चेरू’ ही नांवें सहज जीभवळणीं पडलीं !
दक्षिणेकडील या काही नावांनी जितके वेड लावले तितकेच यातील काही गावें प्रत्यक्ष भेटल्यावर झाले. हा भागसुद्धा भारतीयच असल्याने तिथले सांस्कृतिक वातावरण आणि बऱ्यापैकी स्वच्छ परिसर मनांत ठसला. भाषा कळत नसली तरी त्यांचे आपसातले संभाषण ऐकताना कुतुहल जागे होई. सगळीकडे चहाऐवजी कॉफीच्या टपऱ्याच अधिक. फिल्टर कॉफ़ी आणि सहसा ‘ब्रू’चा वापर जास्त. एक मात्र खरं, टपरीवरची ती काasपी पिल्यावर ‘कटिंग चाय’ची याद धूसर होते.
मी वर मायना दिलाय् ‘धर्मावरम्’ असा, सबब त्यावरच बोलीन काही.
हे इटुकले शहर सततच्या गोंगाटाने केकाटत असते कायम जणूं. लाऊडस्पीकर वर लावलेली तेलगु सिनेमातली गाणी ठणाणा करत असतात. ट्रक-टेंपोंचे कर्कश हॉर्न त्यात भर घालत असतात नि बस आणि टॅक्सींचे जोरजोरात आवाहन सुरू असते प्रवासी मिळवण्यासाठी ! तथापि हा कोलाहल अंम्मळ पचवूं शकलात तर आवडेल तुम्हालाही हे शहर. कुणास ठाऊक का, पण मला काळ्या माती इतकीच लाल माती अधिक प्रिय आहे. सभोवतालचे गडद हिरवेपण त्यामुळे जास्तच ठसठशीत आणि मनोवेधक होते. फारशा मोठाल्या बिल्डिंगा नव्हत्या तेव्हा, छोटी छोटी टुमदार घरं, स्वच्छ परिसर नि दारापुढे भल्यामोठ्या रांगोळ्या ! पुरूष मंडळी सहसा धोतर- म्हणजे लुंगी कुर्त्यांत तर महिला रंगबिरंगी सिल्क साड्यांत ! ( अरे हो, धर्मावरमच्या सिल्क साड्या जगभर जातात बरं का ! )
ऑथेन्टिक साऊथ इंडियन नाष्टा किंवा जेवण दर दहा पाऊलांवर भेटत असल्याने काहीच चिंतेचे कारण नाही. तसेही आपल्याला कुठे आमटीभात हवा असतो रोजरोज ! मात्र जरा जपून हो, इथले सांबार लई जळजळीत असते बरे का. त्या साबारांत मात्र दुनियाभरच्या भाज्या टाकतात, अगदी कोहळा देखील !
एकेकाळी खूप सधन असलेले हे शहर ( आमच्या शेगांव-खामगाव सारखे ) आता मात्र बकाल होऊ पाहतेय का अशी भीती वाटते. भारतातील कित्येक शहरें आतां आपला सांस्कृतिक वारसा तर विसरत नाहीत ना या शंकेनेही मन अस्वस्थ होते खरे. माझ्यासारख्या ‘जुने ते सोने’ मानणाऱ्या बुढाऊला ते खटकते अधूनमधून. तरीही, जुन्या रम्य आठवणी सहसा विसरतां येत नाहीत हे माझे सौभाग्य मानतो मी.
( आज सकाळी चहाबरोबर ‘गुड डे’ बिस्किट खाताना उषाने आठवण करून दिली की धर्मावरम् स्टेशनवर रात्री बारा वाजतां ट्रेनची वाट पाहतांना हे बिस्किट प्रथम चाखले होते पन्नास वर्षांपूर्वी ! )
रहाळकर
१८ जुलाय २०२६.