Thursday, July 16, 2026
दिसणारं आकाश !
दिसणारे आकाश !
आज गॅलरीत बसून चहाचा कप ओठीं लावताना विचार तरळून गेला की हे ग्यालरीतून दिसणारे आकाश प्रत्यक्षात किती किती विशाल असते नाही ! मागे एक मराठी सिनेमा आला होता- दिसतं तसं नसतं; आज जाणवतंय् दिसतं तितकं नसतं. खरंतर म्हणूनच जग फसत असतं !
कैद्याला गवाक्षातून दिसणारं आकाश, आपल्या खिडक्यांतून दिसणारं, बाल्कनीत बसून दिसणारं, सर्वात वरच्या मजल्यावरील गच्चीवरून दिसणारं, महाबळेश्वरच्या सन्-सेट् पॉइंटवरचं, विमानातून दिसणारं नि कदाचित अवकाश-यानातून दिसणारं आकाश कसं मोठं मोठं जाणवूं लागतं पहा. आत्तां या क्षणीं कॉर्नवॉलचा जायगॅन्टिक ॲटलॅन्टिक महासागर आठवला. त्या महासागराहूनही कितीतरी पटींनी विशालतम असतं आकाश !
मात्र एक गुपित सांगूं ? आपल्या अंतर्मनांत डोकावून पाहिलं तर जाणवेल की गवाक्षातून दिसणारं किंवा महासागराहूनही विशाल असतं आपल्या आत दडून बसलेलं प्रत्येकाचं वेगळं असं अगदी प्रायव्हेट आकाश ! याची खुबी अशी की या आकाशांत झेप घेण्याची किंवा रादर डुबकी मारण्याची चाबी किंवा कुंजी प्रत्येकाचीच अगदी वेगळी असते. कोणताही गुरू, ग्रंथ वा बाह्य साधन इथे निरुपयोगी ठरते. त्या आतल्या अवकाशांत भरारी घेण्यासाठी आपल्यालाच ती कुंजी ( किल्ली ) वापरावी लागते. त्यासाठी आपण आपले अगदी एकटे असणे गरजेचे ठरते. नव्हे, लोकांना टाळून नव्हे तर लोकांत असूनही, सर्व गलबल्यांतून क्षणार्धात आपल्या अंतर्मनांत डुबकी मारण्याची कला साधली पाहिजे. कान बंद करणे शक्य नसले तरी अम्मळ डोळे तर मिटता येतातच ना, तसेच एक दीर्घ श्वास घेत आपण आपल्यात बुडी मारू शकतो. ( पाण्यांत डुबकी मारताना कसा दीर्घ श्वास कोंडतो आपण, अगदी तस्साच )
अशा त्या क्षणीं अगणित प्रसंग, आठवणी, संभाषणें, मान-अपमान उफाळून येत ‘मी आधी, मी आधी’ करत पुढ्यात येतात. त्यांना मात्र डावलतां आले पाहिजे. आज मला खोल, अजून खोलांत उतरायचे आहे या जिद्दीने मनाचे पंख मारत राहावे लागले तरी अखेर त्या मनाच्याही कुबड्या फेकून द्यायला हव्या. जेव्हा मनाची सर्व लुडबुड शमेल तेव्हाच त्या अथांग आकाशाचा आवाका लक्षांत येईल. अरे, पण तो आवाका कळायला तरी मन कुठेय् शिल्लक असायला, ते तर त्या अवकाशात कधीच गडप झाले असणार ना !
मंडळी, आतल्या आकाशाचा ठाव घेता घेता कुठल्याकुठे भरकटत गेलो ना मी, सबब पुन्हा स्वत:ला शोघायला बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे लगेचच !
रहाळकर
१६ जुलाय २०२६.