Wednesday, July 15, 2026
मित्रांची मांदियाळी !
मित्रांची मांदियाळी !
हरिभक्तांना जशी वैष्णवांची मांदियाळी तशी मला मित्रांची मांदियाळी अतिशय प्रिय होती. आमच्या घरच्यांना हे कधीच जाणवले नसेल की पटले नसेल. आता पत्नीचाही त्यावर विश्वास बसणे अवघड असले तरी माझ्या मित्रांची संख्या शेंकडोंनी होती. त्यांतली काही मोजकीच घरीं येत कारण घरात मला दोन सुस्वरूप बहिणी होत्या आणि त्यांचेवर कुणाही तिऱ्हाइताची दृष्टी पडू नये हा माझा अट्टाहास होता. ते असो.
मी म्हटले तसा माझा मित्रपरिवार खूप मोठा असला तरी त्यांतील बहुतांश मुलें विलक्षण हुन्नरी होतीं ( मला कधीच मैत्रिण नव्हती हे मागेच सांगून झाले आहे ! ) असो असो.
त्यातल्या अजून काही मित्रांशी तुमची ओळख करून द्यावीशी वाटली म्हणून सांगतो. -
उल्हास हरिभाऊ पुराणिक हा अतिशय देखणा, मिश्कील, कायम हसतमुख आणि विलक्षण संगीतप्रेमी. आमच्या घरची ‘ऑर्गन’ - ( पायपेटी ) तो दोन्ही हातांनी लीलया वाजवायचा. त्याने तयार करून वाजवलेल्या काही ‘धूनी’ आणि नाट्यसंगीत भल्याभल्यांना चकित करणारे असे. त्याकाळी नुकतेच प्रचलित असलेले ‘जाझ’ आणि पाश्चात्य संगीत देखील हुबेहूब वाजवायचा तो. त्याने जुनी मोडकी खोकीं जुळवून त्यांवर मोठाल्या झांजा लावून एकीकडे पायाने ठेका धरीत हातांनी ऑर्गन वाजवण्यात नैपुण्य मिळवले होते. अरूण दाबके झकास सतार वाजवायचा. हिमालय पंतवैद्य बांसुरीवर शास्त्रीय चीज फुंकायचा तर व्हेटर्नरीतला पंकज वाघ अप्रतिम माऊथ ऑर्गन ! पायाने पंगू असलेला जाधव पाहता पाहतां सुरेख रेखाचित्रें रेखाटायचा तर तोच व्यंगचित्रें देखील सहज काढायचा बोलता बोलतां !
काही मित्र काव्यप्रेमी होते आणि त्यांचेबरोबर मी चक्क बा.सी. मर्ढेकरांच्या कविता वाचायचों ! रमेश खांडेकर असाच कवितेवर प्रेम करणारा. हा शाळूसोबती आणि मी म्हणूनच चौधरी मास्तरांचे आवडते विद्यार्थी. पुण्याचा श्रीनिवास तपस्वी उत्कृष्ठ बास्केटबॉल खेळाडू तर काकीर्डे क्रिकेटपटु. नरेंद्र मेननने अंपायरी केली कसोटी सामन्यात तर बंडू देवल, आनंद ठाकूर, भाऊ टिल्लू नाट्यक्षेत्रीतले मित्र. जनू खांडेकर, प्रफुल्ल देसाई वगैरे ‘स्कॉलर’ मंडळी माझे जिवलग मित्र होते. प्रमोद खिरवडकर, उल्हास पुराणिक, जनू खांडेकर वगैरें बरोबर मला मेडिकलचा बराच अभ्यास करता आला. खरंतर पुस्तकांपेक्षाही मी त्यांचेकडून जास्त शिकूं शकलो !
माझ्या काही ज्येष्ठ आणि अतिश्रेष्ठ सुहृदांचा नामोल्लेख करणे माझे कर्तव्य ठरते. स्व. पोहनेरकर काका, डॉ. चक्रपाणी जोशी, कर्नल पी. के. सोमण, श्रीमान पां. द. देशपांडे इत्यादि गुरूतुल्य स्नेह्यांनी माझी आध्यात्मिक बाजू संपन्न केली हे निर्विवाद. या सर्वच मांदियाळीचा मी शतश: ऋणी राहणेच पसंत करीन !
मंडळी, तुम्हाला एव्हाना कळलेच असतील माझ्यातील गुणग्राही पैलू ! अर्थात ते सर्वच श्रेय माझ्या हरहुन्नरी मित्रांचे, नव्हे मांदियाळीचे नव्हे काय ?
रहाळकर
१५ जुलाय २०२६.