Tuesday, July 14, 2026
नामजोशी !
नामजोशी !
नामजोशी हे आडनाव उच्चारतांच डझनभर नामजोशी सरसर नजरेपुढून सरकत गेले. मात्र एक व्यक्ती प्रकर्षाने लक्षात राहिली.
कित्येक दशकांपूर्वी माझी आई दररोज कुठल्या ना कुठल्या ‘बटू’ ला न चुकतां मधुकरी वाढत असे. कधी कुणी बटू आला नाही तर ती चक्क त्याची वाट पाहत राही. एका श्रावण महिन्यांत तिने केवळ मधुकरी न वाढता एका बटूला आमच्या समवेत पूर्ण भोजन देण्याचे व्रत पूर्ण केले. श्रावण संपतां संपतां तिने मला पैसे देऊन त्या मधुकऱ्याला नवीन शर्ट-निकर, दप्तर नि वह्यापुस्तकें खरेदी करण्यास पाठवले आणि तें सर्व देताना त्याने खूप शिकून खूप मोठे व्हावे असा आशीर्वाद दिला. मात्र या प्रसंगाची आठवण मला त्याच मुलाने अदमासें पंचेचाळीस वर्षांनी ताजी करून दिली. आम्ही आमच्या मुलांना घेऊन लक्ष्मीरोडवर चालत असतांना समोरून एक उंचापुरा, गोरापान, रुबाबदार पुरूष उभा ठाकला आणि तू प्रभू रहाळकर आहेस ना असा सवाल केला. मी दिंग्मूढ ! त्याला मी काही ओळखले नव्हते. न राहवून तोच म्हणाला की अरे मी तुमच्या घरी रोज मधुकरी घ्यायला येत असे, तुझ्या आईने नवीन कपडे आणि वह्यापुस्तकें घेऊन दिली होती तुझ्याजवळ पैसे देऊन ! आठवतंय् का काही ? मी अजूनही अवाक् ! नंतर धीर करून त्याला विचारलं काय करता आपण, तर हसून म्हणाला की अरे तुझ्या आईने इतका मनापासून आशीर्वाद दिला की मी चक्क एम् ए झालो आणि आता बॅंक ऑफ बडोदाचा झोनल मॅनेजर आहे !
मला यांत अप्रूप असे जाणवले की मधुकरी मागून इतक्या उच्च पदावर पोहोचूनही त्याला कुणीतरी केव्हातरी केलेल्या मदतीची किंमत होती आणि तें ऋण बोलून दाखवण्याइतका प्रांजळपणा ! हॅट्स् ऑफ टु लाइक्स् ऑफ यू मित्रा ! !
प्रभु रहाळकर
१३ जुलाय २०२६.