Friday, July 10, 2026

 

साहित्य सोनियाच्या खाणी !

 साहित्य सोनियांच्या खाणी

मी खरोखर खूप भाग्यवान आहे की या वेळीं मी एका सुसंस्कृत, साहित्यिक वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलों. कदाचित मागील काही जन्मांत ते भाग्य खूप जवळून निसटून गेले असावे पण या खेपेस नियतीने ती गल्लत केली नाही. मीच काय पण माझी मुलें नि नातवंडांनीही हा वारसा पटकन् पटकावला आहे असे दिसते आहे. असो


निव्वळ सोनियाच्या खाणी असतात असे नसून साहित्याच्या कितीतरी ठिकाणी कित्येक नव्हे अनेकानेक सहज आढळतात, अगदी आसनसोल नि टिंबक्टूंत देखील. अशीच एक खाण आम्हालाही लाभली आणि आम्ही तिथे खूप उत्खनन करून अक्षरश: कित्येक टन सोने लुटले  ! होय अक्षरांचीच लयलूट करता आली या जन्मी. खूप खूप श्रीमंत आहे मी अजूनही- एवढी लयलूट करून देखील


आमचे आजोबा नामवंत साहित्यिक आणि प्रतिष्ठित टीकाकार. कित्येक नव्या जुन्या साहित्यिकांचा नित्य वावर असे आमचे घरी, निव्वळ आजोबांकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी अथवा काही त्रुटी समजावून घेण्यासाठी. वडीलही साहित्याच्या दालनांत मनसोक्त भटकंती करीत त्यांत  स्वत:ची बहुमूल्य सेवा रूजूं करीत. त्यांचा मराठी, हिंदी नि इंग्रजी साहित्याचा दांडगा व्यासंग होता मात्र निवृत्तिनंतरच्या काळात संतसाहित्यावर विशेष


मला वाचनाची खरी गोडी लागली आमच्या घरीं दोन वर्षें पाहुणी म्हणून आलेल्या भल्या मोठ्या मराठी पुस्तकांच्या लायब्ररीमुळे. त्या दोन वर्षांत मी तीन कपाटें भरून असलेल्या जवळजवळ सर्व पुस्तकांचा फडशा पाडला होता. नंतर नंतर मला लायब्ररीचे जणू व्यसन जडले. त्यातून होळकर कॉलेज मधील आमच्या प्राध्यापकांचे हे उद्गार, ‘ ॲन एज्यूकेटेड परसन इज वन हू नोज हाऊ टु यूज लायब्ररी’ - माझ्यातील साहित्यिक भूक वाढवीतच गेले . मी कितपत एज्युकेटेड असेन ते मात्र तुम्हीच ठरवा ! ! 


आपल्यालासाहित्य-सोनियाची खाणसापडू लागते जेव्हा आपण विविध साहित्यकारांच्या लिखाणांचे मनापासून नि काळजीपूर्वक वाचन चिंतन करू लागतो. प्रत्येकाची एक विशिष्ठ ढब असते, एक नजाकत, जिच्या आपण सहज प्रेमांत पडतो. त्या व्यक्तीचे अधिकाधिक लिखाण शोघून काढतो, त्याचा मनसोक्त आस्वाद घेतो

बालपणी किंवा पौगंडावस्थेत आपल्या वाचनाची आवड वेगळी असते आणि वयानुरूप त्या आवडीच्या कावडी बदलत जातात. कुणा डुढ्ढाचार्याचे विचार भुरळ पाडू पाहतात तर श्रुंगारिक साहित्याची ओढ वाटू लागते. कालांतराने तेही मागे पडत अधिक धीरगंभीर साहित्याकडे नकळत आकृष्ट होऊ लागतो आपण. अशा वेळी कित्येक कठीण शब्द विनाकारण  मुखीं येऊ पाहतात, जे इतरांना कळत नाहीत हे जाणवल्यावर अघिक प्रकर्षाने मुखरित होऊ लागतात


मात्र खरं सांगू, कठीण शब्दांऐवजी सहज समजतील, भावतील असे शब्दच खरी किमया करत असतात. त्यासाठी आपले शब्दभांडार सोपे, सुटसुटीत नि प्रचलित शब्दांनी परिपूर्ण असणे अगत्याचे होय. एका चांगल्या साहित्यिकाने आपले सोन्याइतके झगमगीत लिखाण सामान्य जनांसाठी मोकळे केले पाहिजे त्यांना कळेल वळेल अशा खुबीने

पटलं तर घ्या, खूप स्वस्त आहे हो हे सोनें

रहाळकर

१० जुलाय २०२६.   



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?