Sunday, July 05, 2026
साधी माणसं !
साधी माणसं !
आज पुन्हा एकदा ‘बचपन के उन दिनों’ की खूप याद येतेय्. त्याकाळीं घरें असत, फ्लॅट किंवा अपार्टमेंच्स् नव्हेत आणि घरांनाही घरपण असे. गल्लीतल्या संवत्सर फडणिस रहाळकरांच्या इमारतींत काही भाडेकरू राहात असले तरी त्यांचीपण घरेंच होती, फ्लॅटसारखी दिसत असूनही. बहुतेकांचे दरवाजे हमेशाच खुल्ले असत, कुणीही कुणाकडेही केव्हाही दरवाज्यावर थाप न मारतांही बिनधास्त एन्ट्री मारत असे. खरंच खूप साधीसुधी माणसं होती सगळीच.
काही मोजक्या घरात चारचाकी वाहने असली तरी घरोघरी एक किंवा अधिक सायकली मात्र नक्कीच असत. टेलीफोन (लॅंडलाइन) वाली मंडळी इक्कादुक्का. मात्र अचानक लाईन (वीज) गेली तर टेलिफोन करताच अर्ध्या तासात पॉवरहाऊसची माणसे हजर होत, अगदी धोधो पाऊस पडत असतानाही ! त्यांचे ओलेचिंब काळे रेनकोट, शिरस्त्राण नि गम् बूट आणि हातांत भली मोठी विजेरी (टॉर्च) चांगला स्मरणात आहे.
त्याकाळीं गल्लीतला रस्ता डांबरी किंवा कॉंक्रीटचा नव्हता. म्युन्शिपाल्टीचा टॅंकर रोज संध्याकाळी या मातीच्या रस्त्यावर पाण्याचा सडा टाकून जायचा उन्हाळ्यात आणि दिवसभर तापलेल्या त्या मातीला ओल्या मातीचा विलक्षनण सुगंध यायचा ! (एका कवितेचा मुखडा आठवला - ‘ओल्या मातीचा वास येताना, अनोळखी पक्षी गीत गाताना, हळव्या निजेंत बुडताना गांव, माझ्यासाठी तू एक दिवा लाव’ ! ) — डोक्यावरून गेली ना ही देखील ? असो.
आमच्या तिन्हीचारी गल्ल्यांत बहुतांश मराठी कुटुंबे राहात, मध्यमवर्गीय सर्वच. काही गर्भश्रीमंत असले तरी राहाणीमान मध्यमवर्गीयच. त्यामुळे कधीही श्रीमंतीचा माज कधीच आढळला नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मात्र धूमधडाक्यात मनवला जाई दरवर्षीं आणि सर्व वयोगटातील स्त्रीपुरूष त्यांत हिरिरीने सहभाग घेत, सहकार्य करीत आणि नवनव्या पायंड्यांची मुहूर्तमेढ करीत, जी गावातील इतर मंडळें नक्कल करीत. दहाही दिवस कार्यक्रमांची रेलचेल असे. या उत्सवा दरम्यान काही जोड्या जमत तर काही तुटतही ! असो.
रविवारी किंवा सुटीच्या दिवशीं मंडई किंवा ‘मार्केट’ ची जबाबदारी बाबू लोकांवर म्हणजे पुरूष मंडळी सांभाळीत. मग सायकलवर चारदोन थैल्या लटकावून मार्केटमधे इतरही मित्रमंडळी भेटली की तिथली चाय-भजीं चापली जात ! आमरसासाठी आंबे खरेदी हा तर एक सोहळा असे.
अतिशय शांत, निवांत होते ते दिवस नि तेव्हाची माणसंही. खूप साधी सुधी, भोळी भाळी, मनस्वी आणि रसिक देखील बरं का !
प्रभु रहाळकर
५ जुलाय २०२६.