Monday, June 29, 2026

 

श्रीसंतर्थांचा दासबोध- एक विहंगावलोकन ‘ख’पुष्प तिसरें !

 श्रीसमर्थांचा दासबोध- एक विहंगावलोकन

पुष्प तिसरें

मंडळी, पंधरावीस दिवसांपूर्वी आपण समर्थकालीन सामाजिक नि राजकीय परिस्थितीचा धावता परामर्ष घेतला होता. माझी अशी श्रद्धा आहे की तुम्ही पहिले दोन्ही भाग निवान्तपणं वाचले असतील. खरं सांगूं का, कोणताही आध्यात्मिक ग्रंथ घाईघाईने वाचून संपवायचा नसतो तर थोडे थोडे चावून, रवंथ करीत म्हणा हवे तर, त्या ग्रंथाची खरी लज्जत चाखायची असते. आचरण ? मला वाटतं तो ग्रंथ छानपैकी पचविता आला तर आचरण आपसूक घडत जाते पहा ! वेगळी खटपट करावीच लागत नाही. असो.


श्रीसमर्थांनी शेकडो मठ आणि संन्यासी महंत निव्वळ लोकसंग्रहास्तव उभारले हे आपण मागील भागात पाहिले आहेच. दरम्यान देखील ते उदंड वांग्याची रचना करीत राहिले. करूणाष्टकें, मनाचे श्लोक, आत्माराम, षड्रिपुनिरूपण, जनस्वभावगोसावी, श्रीमत् दासबोध वगैरे तर सुप्रसिद्ध आहेत


दासबोधांतविवेकावर विलक्षण भर देणारे समर्थयत्नअर्थात प्रयत्नांना  देव मानत असत. (यत्न तो देव जाणावा ). मात्र विवेकाला यत्नाची जोड देणारे समर्थ अंत:करणाने किती कोमल, प्रेमळ नि भावोत्कट होते ही बाब त्यांचीकरूणाष्टकेंवाचताना प्रकर्षाने अनुभवास येतात. त्यांच्यापाशीं जबरदस्त प्रतिभा विद्यमान होती हे नि:संशय. त्यांची भाषा सोपी, सुटसुटीत, खरेतर रोखठोक असली तरी मोजक्या शब्दांत नेमका अर्थ नि:संदिग्धपणे सांगण्याची हातोटी त्यांचे विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्व दर्शविणारी अशीच आहे


समर्थांचा दासबोध हा एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. त्यांना जगाला जे काही सांगायचे होते ते सर्व त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे दासबोधांत. एकूण वीस दशकें, दोनशे समास आणि सात हजार सातशे एक्कावन्न ओंव्यांत त्यांनी दासबोधाची गुंफण केली आहे आणिहे वीस दशक आणि दोनशे समास साधकाने स्वस्थपणे सावकाश अभ्यासावेअसे आवर्जून सांगितले आहे


श्रीमत् दासबोधांत जे जीवनदर्शन किंवा तत्त्वज्ञान घडवले आहे त्यांत दोन प्रधान अंगें आहेत असे प्राचार्य के.वि.बेलसरे, सार्थ दासबोधाचे रचनाकार, सांगतात. एक अंग आहेअद्वैतसिद्धान्ताचे, तर दुसरेद्वैतकिंवा व्यावहारिक सिद्धान्ताचे. अद्वैत सिद्धान्त साहाजिकच पारमार्थिक स्वरूपाचा शाश्वत, कालातीत आहे, तो सर्व युगांत आणि देशांत सारखेपणाने सत्यपणे अस्तित्वात राहतो. तर दुसरीकडे द्वैत सिद्धान्त हा व्यावहारिक प्रपंचस्वरूपात असल्याने तो तात्पुरता, कालाधीन नि अशाश्वत होय.


श्रीदासबोध हा गुरूशिष्य-संवाद  असून प्रत्येक समासांत एक किंवा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरें दिली आहेत. तथापि एखाद्या विषयावर सहसा ज्या शंकाकुशंका उठू शकतील किंवा तर्क-वितर्क निघू शकतील त्या स्वत: उपस्थित करून समर्थांनी त्यांचे निरसनही केलेले दिसून येईल.


असा हादासबोधसमर्थांनी काय म्हणून रचला असावा ? खरंतर सद्वस्तु ( ब्रह्म ), परमात्मा, अंतरात्मा, ईश्वर, मूळमाया, गुणमाया, दृष्य विश्व,, कालचक्र, जीव, जीवन्मुक्ती, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि एकूणच मानवी जीवन नि त्यांची जीवन मूल्यें वगैरेंवर सिकवण देण्यासाठी लिहिला असावा असा प्राथमिक अंदाज आहे

पाहूंया शनै: शनै: जमेल तितुके ! ! 

रहाळकर

२९ जून २०२६

वट पौर्णिमा !     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?