Thursday, June 04, 2026

 

समर्थांचा दासबोध-एक विहंगावलोकन !

 समर्थांचा दासबोध - एक विहंगावलोकन


विहंगावलोकन म्हणजेबर्ड्स् आयव्ह्यूबरं का ! मला ठाऊक आहे की तुमच्यातील प्रत्येकाने या महान ग्रंथाचे नाव ऐकले असेल, तो हातीं घेतला असेल, कित्येकांनी तो एकदाच नव्हे तर अनेकदां वाचला असेल, कित्येकांनी त्याची पारायणे केली असतील तर काहींनी त्याचे अंतरंग पिंजून काढले असेल. तर मग मला आज आकाशांत भरारी घेऊन त्याला तेथून पहावेसे का वाटले असावे असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला नसला तरी मला तो पडलाय् ! असं पहा की आपण कित्येक वेळां काही ग्रंथांच्या प्रेमात पडतो, ते वाचून काढतो- कधी पुन:पुन्हा- आणि नंतर ते नजरेआड करतो. मग एखाद्या भल्या पहांटे त्याची पुन्हा याद येते आणि आपण फडताळ उघडतो. त्याचवेळी लक्षात येतं की कुणीतरी तो आधीच मागून नेलाय्  वाचण्यासाठी ! ती चुटपुट काही स्वस्थ बसू देत नाही नि म्हणून आपणच कधीतरी काढलेली त्या ग्रंथाची टिपणें शोधून काढतो. फार गमतीदार असतो बरं का तो अनुभव, कारण आपण तेव्हा टिपून घेतलेले कित्येक उतारे आज अचानक अधिक रेलेव्हंट किंवा प्रासंगिक वाटूं लागतात


आज अगदी तस्सेच घडले. पुस्तक तर मिळालेच नि त्यावरील टिपणें देखील. तरीही वाटलं की काहीतरीमिसिंगआहे त्यांतम्हणून तेच पुन्हाकनेक्टकरावे म्हणून हा खटाटोप


तरविहंगावलोकनश्रीदासबोधाचे


खरंतर अखिल भारतात रामायण महाभारत भागवत आणि गीतेचे वाचन, अध्ययन, अध्यापन आणि परिशीलन शतकानुशतकें चालू आहे. वेद उपनिषदें आणि गीता या संस्कृत ग्रंथांनी निखळ आध्यात्माची जोपासना केली आहे. मात्र महाराष्ट्रांत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, एकनाथांचे भागवत, समर्थ रामदासांचा दासबोध या ग्रंथांनी शुद्ध अध्यात्म जीवंत ठेवले आहे. ही सर्वच मंडळी भक्तोत्तम् होती, साक्षात्कारी होती आणि नि:संशय ब्रह्मज्ञानी देखील. त्यांचे जीवन आध्यात्मिक अनुभवांनी अतिशय समृद्ध, श्रीमंत होते आणि म्हणूनच त्यांनी आपापल्या ग्रंथांतून ते सर्व भांडार आपल्यासारख्यांना मुक्तहस्तें वाटून टाकले


आपल्यातील प्रत्येकजणमीम्हणजे हा नश्वर देह या भ्रामक समजुतींत जगत असतो. आपल्याला हे दृष्य जग सारखेपणाने अनुभवास येते. आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी पुरूष अयम् आत्मा- ‘मी ब्रह्म आहेया निश्चित मताने आपले जीवन व्यतीत करतात ; त्यांना एकच एक परमात्मवस्तु सारखेपणाने विश्वांत भरली असल्याची प्रचीती येते. ते स्वत: संत असल्याने सर्वच संतांचे परब्रह्मस्वरूपाचे अनुभव मूलत: समान असतात, अगदी सारखे असतात. तथापि परमात्म-स्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेले हे संत आत्मसाक्षात्कारा नंतरही स्वस्थ बसत नाहीत. आपल्या सभोवार पसरलेल्या लहानमोठ्या सर्व मानव समूहांनी सुखमय जीवन जगावे, परब्रह्मवस्तूचे प्रत्यक्ष दर्शन आणि अनुभव घ्यावा आणि आपल्यासारखेच कृतार्थ व्हावे म्हणून ते आयुष्यभर झटत राहतात. लोक-कल्याणाच्या, लोक-संग्रहाच्या या पवित्र कार्यासाठी ही संतमंडळी आपले शरीर, वाणी नि लेखणी अक्षरश: अहोरात्र झिजवतात


हे संगळे दैवी गुण श्रीसमर्थांच्या जीवनात उत्कटपणे दृग्गोचर होतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि मग त्यांनी आघ्यात्मिक नेतेपणाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभिला. लोकांमध्यें समूहभावना, सामाजिक कर्तव्यें निर्माण करण्यासाठी कितीतरी मठ स्थापन केले आणि प्रत्येक मठात लोकशिक्षणाचे काम नि:स्वार्थपणे करणारे संन्यासी महंत तयार केले. त्या सगळ्या महंतांचे महंत म्हणून समर्थांचा अफाट व्याप होता. अक्षरश: हजारो स्त्रीपुरूष त्यांना भेटून गेले असणार. त्यांपैकी कित्येकांशी ते कितीतरी अध्यात्म बोलले असणार. अनेकांना त्यांनी साधनेमध्ये, राजकारणात, व्यवहारात आणि व्यक्तिगत समस्यांमधे यथार्थ मार्गदर्शन केले असणार. त्यांची ती संभाषणें निरूपणे विनोदवचनें आणि समस्या-समाधान काळाच्या उदरांत गडप झालीत. तथापि आपल्या सुदैवाने श्रीसमर्थांनी विपुल साहित्य-वांग्मय लिहूनही त्या सर्व खजिन्यात श्रीमत् दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो. आध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे जे जीवन-तत्वज्ञान त्यांचेपाशी होते ते दासबोधामध्ये एकत्र गुंफलेले दिसून येईल. त्या ग्रंथराजाचा अतिशय विनम्रपणे आढावा घेऊंया ( मनातल्या अवकाशातून ! ! )

क्रमश:………

रहाळकर

जून २०२६     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?