Saturday, February 20, 2021

 

प्रपंचाच्या गोष्टी

 परपंचाच्या गोस्टी.....".! 


लई लई दिसांपासून मन म्हनत हुतं की तुमच्या बरूबर चार गोस्टी करीन परपंचाच्या. पन काय करावं बाप्पा, येळच गावंना ! अखेरच्याला ठरिवलंच पक्कं की आता तरी ठान मांडून बसकन मारायचीच

तर काय म्हंतय् गावाकडचं पीकपानी ? बरं हाय् ना ? आमच्या इथ्थल्ल काय सांगू राव, या कुरूनानी तर वैतैग वैताग आनलाय न्हुस्ता ! लई कटाळवानं जालंय् पघा ! काई बी क्रून टायम तर जायाला पाइजे ना . म्हून तर तुमास्नी हे लिवलेलं पाठ करिवतोय म्यां


(मला नम्र जाणीव आहे की तुम्हाला हे वाचायलाही किती कष्ट पडताहेत ते. पण धिर्धरा धिर्धरा, मज्जा येईल तुम्हाला या गोस्टी, सॉरी गोष्टी वाचतांना. अनेक वर्षांपूर्वी माझी लेक नि साडू किती किती वेळ अस्सल गावरान ठसक्यात संभाषण करीत आणि ते ऐकतांना सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळत असे. अर्थात ऐकण्या पेक्षा हे वाचणे खूप क्लेषकारक आहे याची तुम्हाला एव्हाना खात्री पटली असेल ! ) 


तर म्यां काय म्हनत हुतो ? हां, पीकपानीनव्हंतर मंग तो कुरूनान्हाई ? मंग कसली चरचा करीत हुतो आपननाय बा, राजकारन नको बाप्पा ! माथं सटकतंच आतांशा ! किरकेट ? अजून चार दीस वाट पाह्यची बाप्पा. बाकी काई बी म्हना, तो रिशभ पंतोजी, वाशिंगटन सुंदऱ्या, सिराजभाई , अक्षा पटेल आनि बुम्रा, आस्विन हे लोक तर लई भारी हायेत म्हना ! राहाने आनि रोहित्याने ब्याट फटकारायला पाइजे आता तरी. चेंडूला कसले झेलतात आता सगलेच आनि वाट बी रोकतात बौंड्रीलाईनच्या अगुदरच ! पर माजी योक तकरार हाय. लेकाचे विंग्रजीत किंवा धेडगुजरी हिंदीतून बोलत्यात टी वी वर. निदान म्हाराष्ट्रांत तरी मायबोलीत सांगा की राव ! मस्नी माहीतााय् कुनी कुनी लेकाचे ऐकायचे नाहीत


बरं, आता म्हातारपनीं निदान देवळात जाऊन बसू म्हनल तर तिथ बी जायची मनाई केली सर्कारने ! म्हने पोरसोरं नि म्हाताराड्यांना मज्जाव ! आता मला सांगा, पोट्ट्यासोट्ट्यांनी तिथं धुडगुस घालायचा नाही आणि म्हाताऱ्यांनी देवळात आलेल्या बायाबापड्यांकडे बघायचं नाही तर आनखी कुनी

ते बी जाऊ दे, निदान पावभाजी नि भज्जे खाऊ द्यायला सर्कारच्या बापाचं काय जातं ? म्हने आईस्क्रीम खाऊ नका, घसा धरेल म्हने. (कंदी कंदी वाटतं सर्कारचाच गळा दाबावा !) कुठे कथा-कीर्तन नाही, चांगल्या चांगल्या हुश्शार मानसांची भासनं ऐकता येत नाही, नाटक सिनेमा नि तमाशा बी बंद ! म्यां म्हंतो करायचं काय मानसानं ? तरण्यात्ठ्यांचं बरं हाय, ते हपिस घरून चालवित्यात नि अधूनमधून वाट्सॲपवर दंगामस्ती ! आम्ही म्हाताऱ्यांनी काही जोक मारले तर ते म्हनेपिज्जे’ ! पिज्जेवरून ध्यानात आलं की पिझ्झा नाही चापला खूप दिसांत ! नको, पाठवू बिठवू नका, पचत नाही आतांशा ! ! 

एवढी सगलीमनाईपाहून मी म्हंतो, ‘उध्दवा, अजब तुझे सर्कार !’ 

ते जाऊ दे, घरी बसून बसून तुमाला कांटाला नै आला ? अरे किती शिनेमे पाह्यचे टीवीवर ? नि ते बी तेच ते, बोरिंग ! गप्पा मारायला फकस्त म्हातारा म्हातारी अमोरासमोर ! जुन्या जुन्या आठवणीमंदी रमून कधी सुस्कारे तर कधी तीन मजली गडगडाट करून हसायचे ! पन हे बी क्वचित कंधीतरी ! एरवी पोरासोरांच्या उगाचच काळज्या करत बसने हे काही पटत नाही बुवा मस्नी


ते बी असून दे ! म्यां म्हंतो की नाकातोंडावर गच्च पट्टी बांधून, दो गज नव्हे बारा गज दूरी ठिऊन अधूनमधून भेटलो तर गप्पा नै का मारता येत्याल ? पाहा बुवांनो (नि बायांनो ) , करून पहा हे साहस. काही होत नै आपलेले कारन खूप खूप पुन्य आहे तुमचेपाशीं


बहोत बहोत धन्यवाद !


बावधनचे रहाळकर आजोबा 

२० फेब्रुवारी २०२१



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?