Wednesday, May 06, 2026
सत्यस्य सत्यम् !
सत्यस्त सत्यम् !
आजच्या ‘गीता-रहस्य’च्या सत्रांत काही छान मुद्दे ऐकतां आले. त्यांत सत्य, अहिंसा वगैरे बाबींवरील लोकमान्यांचे विचार ऐकल्यानंतर जमलेल्या जवळजवळ प्रत्येक श्रोत्याने आपापली मतें थोडक्यात पण प्रभावीपणे मांडलीं आणि सर्वांनाच हे सत्र मनापासून आवडल्याचे जाणवले. आज गैरहजर असलेल्या सुहृदांसाठी त्याचा गोषवारा सादर करीत आहे.
मात्र या निमित्त आठवली खूप वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा. ब्रह्मदेवाने एकदा केलेल्या श्रीकृष्णाच्या खऱ्या स्वरूपाचे वर्णन होते ते. तो म्हणतो - “सत्य व्रतं सत्य परं त्रिसत्यम्, सत्यस्य योनीं निहितं च सत्यम्, सत्यस्य सत्यं ऋत् सत्य नेत्रम्, सत्यात्मकं त्वं शरणं प्रपन्ना: “ !
ब्रम्ह्याला याहून कमी दर्जाच्या स्तुतीने समाधान झाले नसते आणि ‘सत्य’ हेच नाम त्याला उपयुक्त वाटून त्य साक्षात्काराने तो एवढा पुलकित झाला की प्रत्येक श्वासागणिक तो सत्यम् सत्यम् असा घोषा करीत राहिला.
मात्र काही काळाने भगवंतांनी आपले खरे स्वरूप स्वत:च त्याला बोलून दाखवले- ‘मी मानव नाही नि अतिमानव ही नाही; यक्ष नाही की राक्षसही नाही; ब्राह्मण नव्हे की क्षत्रिय नव्हे, वैश्य नि शूद्र नव्हे; मी ब्रह्मचारी नाही गृहस्थ वा वानप्रस्थी नाही, ‘मी’ आहे सत्यबोधक - सत्यं शिवं सुंदरम्’ !”
कथा संपली.
कालचे सत्र गीतारहस्याच्या दुसऱ्या प्रकरणापासून अर्थात ‘कर्मजिज्ञासा’ पासून सुरू झाले. अर्जुनाचे मोहग्रस्त होऊन आलेल्या द्विधा मनस्थितीचे विश्लेषण करताना लोकमान्यांना काही पाश्चात्य ग्रंथकारांची नोंद घ्यावीशी वाटली. त्यांत विल्यम शेक्सपीयरचा हॅम्लेट जशा विमनस्क अवस्थेत सापडला त्याचा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका नाटकातील ‘करॉयलनेस’ चाही संदर्भ देताना लोकमान्य ‘कर्तव्या’वर भाष्य करताना आठवण करून देतात की फार दूर जायची गरज नाही, महाभारत या एकाच ग्रंथांत असे कित्येक दाखले ठायीठाईं विखुरलेले सापडतील.
आपले कर्तव्य बजावत असताना ‘गुरूं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् / आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन् // - ‘बेशक ठार करावा’ ! (असे शास्त्र सांगते - मनु. ८/३५०)
हाच न्याय आत्मसंरक्षणार्थही लागू पडतो.
‘अहिंसा’ या विषयावर लिहिताना देखील ‘कर्तव्याकर्तव्यावर लोकमान्यांचा भर आहे. अहिंसेबरोबरच क्षमा, शांती, दया वगैरे गुणांवरही आपल्याला सहज पटेल असे लिहून गेलेत लोकमान्य. ते म्हणतात की ‘नेहमीच क्षमा किंवा नेहमीच तापटपणा श्रेयस्कर होत नाहीत ! म्हणूनच बाबांनो, यांसाठी देखील अपवाद सांगितले आहेत आपल्या धर्मशास्त्रांनी !
सत्र संपतासंपतां ‘सत्य’ या विषयावर गाडी पोहोचली आणि त्यासाठी कदाचित अनेक सत्रें अपुरी पडतील म्हणून काल अल्पविराम घेतला !
तथापि, ‘सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् / यद् भूताहितमत्यन्तं एतत्सत्यं मतं मम //‘ या वचनाने पुढील सत्र घेणार आहोत !
रहाळकर
५ मे २०२६.