Tuesday, May 19, 2026

 

पसायदान…..!

 पसायदान…..

ज्ञानेश्वरी ही शांतीकथा आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील या कथेंतशांतरसहा यजमान आहे, तरअद्भुतरसहा शांतरसाच्या घरीं पाहुणचाराला आला आहे. तसेचकरूण’, ‘वीर’, ‘रौद्र’, ‘वत्सलअशा विविध रसांनीही त्या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळवला आहे.

ज्ञानेश्वरीतील निरूपण हेधर्मकीर्तनआहे. अठरा अध्यायी गीतेतील सातशे श्लोकांवरील निरूपण असे ज्ञानेश्वरीचे स्वरूप आहे. संस्कृत भाषेवरील या गीताचे मायमराठीतील प्रवचन अतिशय काव्यमय आहे, रसाळ आहे, अमृतमधुर आहे. इथे पांडित्याचे प्रदर्शन नाही, मतमतांचा गलबला नाही; हीभावार्थ-दीपिकाआहे ! या दीपिकेच्या सौम्य, शीतल प्रकाशांत श्रीमद्भगवद्गीतेचा भावार्थ  ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओंव्यांतून समजावून सांगितला आहे. मात्र ते करत असतांना त्यांनी श्रोत्यांशी मनमोकळा हृदयसंवाद साधला आहे खास


ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय हा कळसाध्याय म्हटला जातो  आणि ज्ञानदेवांनीपसायदानलिहून या अध्यायाचा समारोप केला आहे. केवळ नऊ ओंव्यात त्यांनी हे पसायदान सादर केले आहे. तथापि ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार ओव्यांचा जणूकाही सारांश पसायदानांत आला आहे. मंदिराच्या कळसाचे जरी दर्शन घडले तरी प्रत्यक्ष दर्शन घडले अशी भक्त भाविकांची श्रद्धा असते. ज्ञानेश्वरीचे समग्र पारायण आणि आकलन घडले नाही आणि केवळ पसायदान नीट समजून घेतले तरी ज्ञानेश्वरीचीएक तरी ओंवी अनुभवावीया संदेशाचे मर्म उकलते


() “आतां विश्वात्मकें देवें / येणें वाग्यज्ञें तोषावें / तोषोनि मज द्यावें / पसायदान हें //“ - 

वाचेने केलेल्या या यज्ञामुळे विश्वाच्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वराने आतां संतुष्ट व्हावे. संतुष्ट होऊन त्याने मला पुढीलप्रमाणे प्रसादाचे दान द्यावे


() “जे खळांची व्यंकटी सांडो / त्या सत्कर्मी रती वाढेल / भूतां परस्परें पडो / मैत्र जीवाचें //“- 

दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होवो ; चांगल्या कामाच्या बाबतींत त्यांच्या मनातील आवड वृद्धिंगत व्हावी ; प्राणिमात्रांची एकमेकांशी जिवाभावाची मैत्री जडावी.


() “दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्यें पाहो / जो जे वांछील तो तें लाहो / प्राणिजात //“- 

पापाचा अंधार जावा ; पातकाचा म्हणजे दुष्ट कृत्याचा अंधार दूर व्हावा ; स्वधर्मरूपी सूर्याने विश्व उजळून टाकावे ; भूतमात्र ज्या कशाची इच्छा करतील ते त्यांना प्राप्त व्हावे


() “वर्षत सकळमंगळीं / ईश्वरनिष्ठांची मांदियाळी / अनवरत भूमंडळीं / भेटतू भूतां //“- 

सकळ मंगळाचा म्हणजे संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वर-निष्ठांची मांदियाळी म्हणजे समुदाय या पृथ्वीतलावर सर्व प्राण्यांना अनवरत म्हणजे निरंतर भेटत राहो


() “चलां कल्पतरूंचे आरव / चेतना-चिंतामणींचे गांव / बोलते जे अर्णव / पीयूषाचे //“- 

(चलां=हलते, चालते; आरव=उद्यानें ; अर्णव=समुद्र ; पीयुष=अमृत

सज्जन हे चालत्या बोलत्या कल्पवृक्षांची उद्यानेच असतात ; कल्पिलेल्या किंवा इच्छिलेल्या वस्तू देणारे वृक्ष असे सज्जनांच्या बाबतींत म्हणता येईल. ते चैतन्यमय अशा चिंतामणिचे गांवच्या गांव असतात. सज्जन म्हणजे अमृताने भरलेले बोलके समुद्रच असतात


() “चंद्रमें जे अलांछन / मार्तंड ते तापहीन / ते सर्वांहि सदा सज्जन / सोयरे होतु //“- 

सज्जन हे कलंकहीन चंद्राप्रमाणे असतात, ते तापहीन मार्तंड म्हणजे प्रखर ऊष्णता विरहित सूर्य असतात. असे हे सज्जन सर्वांचे सोयरे म्हणजे आप्तजन व्हावेत


() “किंबहुना सर्वसुखीं / पूर्ण होऊनि तिहीं लोकीं / भजिजो आदिपुरूखीं / अखंडित //“- 

फार काय सांगावे, समाजातल्या सर्व लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण व्हावे. सर्व लोकांना त्रैलोक्यांत सर्व सुखें लाभावीत. आदिपुरूषाच्या म्हणजे विश्वाच्या आरंभस्थानीं असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी त्रैलोक्याने अखंड भक्ती करावी


() “आणि ग्रंथोपजीविये / विशेषीं लोकीं इये / दृष्टादृष्य विजयें / होआवें जी //“- 

आणि अहो, विशेषेंकरून या जगामध्यें (गीता) हा ग्रंथ ज्यांचे जीवनसर्वस्व होऊन राहिला आहे अशा व्यक्तींनी इहलोकींच्या आणि परलोकींच्या भोगांवर विजयी व्हावे !


() “येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो / हा होईल दानपसावो / येणें वरें ज्ञानदेवो / सुखिया झाला //“- 

तेव्हा विश्वाचे प्रभुराय अर्थात ज्ञानदेवांचे थोरले बंधू आणि सद्गुरूही असलेले निवृत्तिनाथ म्हणाले, ‘ज्ञानदेवा हा दानप्रसाद सफल संपूर्ण होईल. तू मागितलेले प्रसादाचे देणे तुला मिळेल’. 

हा आशीर्वाद ज्ञानदेवांना श्रीगुरूंकडून मिळाला, त्यामुळे ज्ञानदेव मनोमनीं सुखावले


भरोनि सद्भावाची अंजुळी / मियां वोंविलीं फुलें मोकळीं / अर्पिली अंघ्रियुगुलीं / विश्वरूपाच्या //“ 


समारोप—— 

प्रसादस्तु प्रसन्नता’ - प्रसाद देणारा प्रसन्न मनाने प्रसाद देतो आणि प्रसाद घेणारा त्यापासून संतोष पावतो.


श्रीज्ञानेश्वरांचे पसायदान वैदिक प्रार्थनेची आठवण करून देणारे आहे. ती प्रार्थना अशी आहे - “सर्वेत्र सुखिन: सन्तु / सर्वे सन्तु निरामया: / सर्वे भद्राणि पश्यन्तु / मा कश्चिद् दु:खमाप्नुयात् // ‘ 

जगातील सर्वजण सुखी असावेत, सर्वजण आरोग्यसंपन्न असावेत; सर्वांना हितकारक आणि मंगलमय प्रसंग आणि घटना पाहायला आणि अनुभवायला मिळाव्यात, कोणाच्याही वाट्याला दु: येऊ नये


पसायदानाचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे. श्रीराम, श्रीकृष्ण किंवा शिवशंकर अशा एखाद्या विविक्षित देवाचे आराधन करता श्रीज्ञानेश्वर महाराज सर्वांच्या अंतर्यामी निवास करणाऱ्या विश्वात्मक देवाला आळवीत आहेत. कोणत्याही धर्माला, जातीला किंवा देशकालाच्या पलीकडे जात त्यांनी सर्वांच्या मंगलाची कामना या पसायदानात आहे. या प्रार्थनेतून त्यांनी लोक-कल्याणाचा भव्य आदर्श उभा केला आहे. त्यांनी अपेक्षिलेला आदर्श कधीतरी फलद्रुप होईल का

सौ. उषा रहाळकर

१९ मे २०२६.   



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?