Wednesday, May 13, 2026
भूत वूत !
भूत वूत !
आज एक मस्त जोक वाचला. अशी वदंता होती एका गावांत की शेजारच्या गावात भूतांची वस्ती खूप वाढलीय म्हणे. म्हणून त्यांची शहानिशा करण्यासाठी एक शहाणा त्या गावात पाय ठेवतो. तिथे त्याला एका विहिरीतून पाणी काढणारा माणूस दिसतो. तो त्या माणसाला विचारतो की आम्ही असं ऐकलंय् की तुमच्या गावात खूप भुतें राहतात म्हणे. तिथला माणूस उत्तरतो की मी मरून चाळीस वर्षं झालीत पण मला तरी कुणीच भूत दिसलं नाही बुवा !
या निमित्त मला आठवले माननीय बाळासाहेब भारदे यांचे विचार. श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा यांवरील त्यांचे व्याख्यान. मला केवळ त्यांची व्याख्यानेच नव्हे तर प्रत्यक्ष वार्तालाप करण्याचाही अनुभव लाभला. त्यांनी आपल्या व्याख्यानात अचानक श्रोत्यांना प्रश्न केला की तुमच्यापैकी कुणी भूत पाहिलंय् का ! खरंतर अगदी लहानपणापासून आपल्यातील प्रत्येकाने भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या असतील आणि त्या वयात त्या खऱ्याही वाटल्या असतील. मात्र कुणी भूत पाहिलंय का या प्रश्नाला कुणाचेच होकारार्थी उत्तर अशक्य असले तरी कपोलकल्पित वर्णन आपसूक येते कित्येकांचे मुखातून ! अगदी हिरीरीने ते म्हणतील की खरंच भुतें असतात बरं का, आम्ही प्रत्यक्ष पाहिली नसली तरी. आता याला आपण श्रद्धा किंवा विश्वास म्हणू की निव्वळ अंधश्रद्धा ?
वास्तविक सर्वसामान्यांच्या धारणा या भौतिक जगापुरत्या मर्यादित असल्याने या जगाबाहेरचे अस्तित्व कुणालाच माहीत नसते, केवळ एकच अपवाद म्हणजे द्रष्टा आत्मज्ञानी पुरूष. अर्थात तो या किडुकमिडुक बाबींकडे कशाला लक्ष देईल म्हणा ! प्रश्न आहे आपणासारख्या सर्वसामान्यांचा. तर मग भुत वूत खरंच असतात काय हो ?
भिडू, अब आयेगा मझा ! !
रहाळकर
१३ मे २०२२६